''चला चला, लवकर आटपा बरं जेवणं.... आज श्रुतिका आहे नं?'' आजीने वेगळी आठवण करून दिली नाही तरी दर मंगळवार आणि शुक्रवार म्हणजे रेडियोवरच्या श्रुतिकेचे वार हे समीकरण कितीतरी वर्षे माझ्या मनात पक्के घर करून होते.
ही गोष्ट आहे साधारण १९८२ ते १९९० च्या काळातील. कदाचित त्याही अगोदर पासून नभोवाणीवर श्रुतिका अस्तित्वात असाव्यात. परंतु १९८२ मध्ये आमचा जुना, खटारा, धूळ खात पडलेला व फेंदर्या मिशांच्या झुरळांचे वसाहतस्थान बनलेल्या लाकडी अंगकाठीचा रेडियो एकदाचा निकालात निघाला व त्याजागी जुना ट्रान्झिस्टर आला. या नव्या काळ्या चौकोनी डब्यातून कर्कश खरखरीऐवजी सुमधुर आवाजातील गाणी आम्हाला पहिल्यांदाच ऐकू येऊ लागली. सकाळी उठल्यावर चिंतन मालिका आणि अभंगवाणी ऐकायची जशी सवय झाली तशीच मंगळवार व शुक्रवारच्या श्रुतिकेचीही चटक आपोआप लागली.
एकदा श्रुतिका सुरू झाली की रेडियोचा आवाज मोठा व्हायचा. त्या नाट्यातील शब्द अन् शब्द कळावा यासाठी कानांत अगदी प्राण आणून कथानक ऐकले जायचे. आजीच्या पुढ्यात कोणतीतरी भाजी निवडायला असायची किंवा तिने शनिवारी करायच्या बिरड्या सोलायला घेतलेल्या असायच्या. हातातून सटकणार्या व खोलीत चहूदिशांना उड्डाण करणार्या बुळबुळीत सालीच्या बिरड्यांनाही ती त्यावेळी गोळा करायला जायची नाही. एकीकडे हात झपाझप चालू तर दुसरीकडे सारे लक्ष त्या श्रुतिकेतून उलगडणार्या नाट्याकडे! एखादा अवघड, दु:खी किंवा नाट्यमय प्रसंग असला की आजीच्या सोबत आमचेही श्वास रोखले जात. एखादा गूढ, रहस्यमय प्रसंग असेल तर आमच्या हृदयाचे ठोकेही वाढलेले असत.
तो काळ कृष्णधवल दूरदर्शनचा होता. आमच्याकडे नुकताच टी. व्ही. संच खरेदी झाला असला तरी रेडियोची सर तेव्हाच्या टी.व्ही. ला येणे शक्यच नव्हते! रोज पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत साथसोबत करणारा रेडियो कोठे आणि सकाळ- संध्याकाळी मर्यादित प्रक्षेपण असणारा टी.व्ही. कोठे! विविधभारतीवरील 'बेला के फूल', 'छायागीत', 'आप की फर्माइश' कार्यक्रम जितके जिव्हाळ्याने ऐकले जायचे तितका स्नेह, जिव्हाळा टी.व्ही. बद्दल उत्पन्न होणे अजून बाकी होते. बाहेर नाट्यगृहांत जाऊन तिकिटाचे पैसे भरून नाटके पाहावीत असे वातावरण घरी नव्हते. शाळेला सुट्टी लागली की मगच आमचे पालक आम्हाला सिनेमा, सर्कस आणि बालनाट्य दाखवत असत. त्यामुळे नभोनाट्य किंवा श्रुतिका हा रेडियोवर आठवड्यातून दोनदा सादर केला जाणारा कार्यक्रम आमच्यासाठी मनोरंजनाची पर्वणी असे.
किती तरी सुंदर सुंदर श्रुतिका या काळात आम्ही अगदी तन्मयतेने ऐकल्या. एकच कलाकार तरुण, मध्यमवयीन व म्हातार्या व्यक्तीचे आयुष्याच्या विविध टप्प्यांमधील संवाद म्हणतो हे तेव्हा आम्हाला कोणी सांगितले असते तरी ते आमच्या मनांना पटले नसते. श्रुतिका ऐकताना आम्ही कथानकात रंगून तर जातच असू. पण मग त्याच वेळी बरेच प्रश्नही पडायचे. एका वेळी रेकॉर्डिंग स्टुडियोत एवढे सगळे लोक कसे काय मावत असतील? ते पार्श्वसंगीत वाजवणारे कलाकार पण त्यांच्या शेजारीच बसले असतील का? या लोकांना कार्यक्रम करून घरी जायला कित्ती उशीर होत असेल, नाही का? वगैरे वगैरे. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण अगोदर केलेले असू शकते यासारख्या गोष्टी तेव्हा आमच्या ध्यानी-मनीही नसत. हो, आणि त्याच बरोबर बालसुलभ शंकाही असायच्या जोडीला. 'त्यांना मध्येच शिंक आली किंवा ढेकर आली तर ते काय बरं करत असतील?', 'मध्येच वीज गेली तर मग त्यांचा कार्यक्रम बंद पडेल का?' अशा शंकांनी मने आशंकित झाली तरी श्रुतिकेत व्यत्यय येऊ नये म्हणून गप्प बसत असू. कलाकारांची नावे श्रुतिकेत सर्वात शेवटी सांगत असत. ती नावे जाहीर झाली की, ''हां, मला वाटलंच होतं हं, अमक्यातमक्याची भूमिका तेच करत असणार म्हणून! काय सुरेख म्हणतात ना ते संवाद!'' वगैरे डायलॉग्जही चालायचे.
माझ्या आजोबांना खरे तर श्रुतिका ऐकायला आवडत असावे. परंतु वरकरणी मात्र ते तसे दाखवत नसत. जणू काही आपला त्या श्रुतिकेशी संबंधच नाही अशा थाटात त्यांच्या आवडत्या खुर्चीत ते नजरेसमोर वर्तमान-पत्र धरून बसलेले असत. पण रेडियोच्या आवाजाची पातळी जरा कमी झाली की त्यांची, 'जरा आवाज वाढव गं!' ची सूचना आजी गालातल्या गालात हसत अमलात आणत असे. त्या काळात चुकून त्यावेळी जर कोणी पाहुणे घरी आले तर स्वाभाविकपणे आम्ही रेडियोचा आवाज कमी किंवा बंद करत असू. पण मग रात्रभर आणि दुसर्याही दिवशी श्रुतिकेतील नाट्यात नंतर काय घडले असेल याची चुटपूट लागून राहायची. अनेकदा त्या नाट्यांचे विषय प्रौढांसाठीचे, धीरगंभीर असत. आम्हाला बालवयाच्या श्रोत्यांना ते झेपत नसत. मग श्रुतिका संपली रे संपली की आमची आजीच्या डोक्याशी भुणभूण सुरू होई.... ''आजी, अमक्या शब्दाचा अर्थ काय गं?'' ''आजी, तो बुवा असं का म्हणत होता गं?'' ''ए आजी, ती बाई अशी विचित्र का रडत होती गं?'' एक ना दोन.
आजी आपली कशीबशी आमच्या प्रश्नांना तिला जमेल तशी उत्तरे द्यायची, आणि फारच निरुत्तर झाली की, ''चला, झोपा आता! फार प्रश्न विचारत बसता!'' म्हणून रागावायची. कधी तिने तिच्या आवाक्यातील उत्तर दिले तरी आमच्या मनाचे समाधान व्हायचे नाही. मग झोपाळलेल्या डोळ्यांनी अंथरुणावर पडल्या पडल्या त्याबद्दल विचार करताना कधी तरी झोप लागायची.
एखाद्या रात्री श्रुतिकेचा विषय गूढ, रहस्यमय, भय उत्पन्न करणारा असेल तर मग त्या रात्री मला अंधाराचीही भीती वाटायची. ''ए आजी, आज छोटा दिवा तसाच राहू देत ना!'' म्हणून तिला गळ घालण्यापासून ते रात्रीतून बाथरुमला जायचे झाल्यास तिला बिचारीला झोपेतून जागे करून बाथरुमच्या दारापर्यंत सोबत करायला सांगण्यापर्यंत सर्व प्रकार चालायचे. पण दुसर्या दिवशी आजीने इतरांसमोर हसत हसत त्याविषयीचा उच्चार केला की नाकाच्या शेंड्यावर भला थोरला राग मात्र यायचा!
आजी-आजोबा वर्षातून दोन-तीनदा आमच्या गावी राहायला जायचे. एकदा तिथे गेले की साधारण महिनाभर मुक्काम असायचा त्यांचा तिथे. जाताना ते सामानात घरातील तो एकुलता एक ट्रान्झिस्टर सोबतीला घालून न्यायचे. ते दोघे घरी नसले की आम्हा लहान मंडळींना मनसोक्त दंगा करता यायचा. पण मग दर मंगळवारी व शुक्रवारी आजीची, रेडियोची व श्रुतिकेची खूप खूप आठवण यायची. आजोबांच्या देहान्तानंतर आजी एकटीच गावी जाऊ लागली. तेव्हाही तिच्या सोबतीला रेडियो असायचा. गावच्या शेणाने सारवलेल्या कौलारू घरात दिवेलागणीनंतर निजेस्तोवर कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात त्याची मंद सुरातील साथ तिला निश्चितच आश्वस्त करत असणार!
पुढे पुढे दूरदर्शनचे प्रस्थ जसजसे वाढले तसतसा माझा श्रुतिका ऐकण्यातील उत्साह कमी होऊ लागला. दूरदर्शनवरील वेगवेगळ्या विषयांवरील मालिका, मनोरंजनपर कार्यक्रमांचे आकर्षण वाढू लागले. घरात टी.व्ही.चा आवाज वाढला आणि त्यापुढे रेडियोचा आवाज क्षीण झाला. पण आजीने शेवटपर्यंत रेडियोची साथ सोडली नाही. टी.व्ही.चा आवाज तिला नकोसा झाला की ती रेडियो अगदी कानाशी धरून श्रुतिका ऐकायची. तिला त्रास होत असला तरी ती आम्हाला त्याबद्दल काही बोलायची नाही. पण चपापून मग आम्हीच टी.व्ही.चा आवाज कमी करायचो. कधी तरी ती आदल्या दिवशीची श्रुतिका किती छान होती ते रंगून सांगायची. त्या वेळी आपण तिची श्रुतिका ऐकण्यात साथ-सोबत केली नाही म्हणून उगाचच मनात अपराधी वाटायचे.
आजीनंतर श्रुतिका ऐकणेही इतिहासजमा झाले. परंतु त्या काळात श्रुतिकेच्या रूपाने आम्हाला जे काही मिळाले त्याचे मूल्य अनमोल आहे.
श्रुतिका ऐकता यावी म्हणून एकत्र येऊन चटचट उरकलेली कामे, 'आज काय ऐकायला मिळणार' याविषयी उत्कंठा, एकही शब्द चुकू नये म्हणून कानांत प्राण आणून केलेले श्रवण, श्रुतिकेतील पात्रांच्या संवादांशी एकरूप होणे, सादरकर्त्यांच्या आवाजांवरून त्यांच्या वया-रूपाविषयी मनात बांधलेले अंदाज, समृद्ध कथांना त्या थोडक्या वेळात ताकदीने सादर करण्याचे कलावंतांचे कसब, काही गंभीर कथानकांना ऐकून मनात निर्माण झालेले द्वंद्व, अस्वस्थता, विचारचक्र.... या सर्वाची तुलना आता रिमोटवरच्या बटणासरशी शेकडो चॅनल बदलण्याची सुविधा असलेल्या अद्ययावत टी.व्ही.शी चुकूनही करवत नाही. शिवाय श्रुतिकेशी आमच्या नकळत आमचे बाल्य जोडले गेले. विविध भावबंध जुळले गेले. आता फक्त त्यांच्या रम्य आठवणी मागे उरल्या.
-- अरुंधती
No comments:
Post a Comment