Monday, October 29, 2012

सिद्दी संगीत

गुलामगिरी, दास्यत्व, पराधीनता यांतून येणारी हतबलता तर काही ठिकाणी हतबलतेतून अंगच्या मूळ ताकदीतून येणारी लढाऊ वृत्ती यांचा अर्थ पुरेपूर जाणणारी व मूळ आफ्रिकन वंशाची जमात गेली अनेक शतके भारतात वास्तव्य करून आहे. आज तुम्ही व आम्ही जेवढे भारतीय आहोत तेवढीच ही जमातही भारतीय आहे. परंतु आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शरीरयष्टी, रूपरचना, मूळ आफ्रिकन प्रथा व संगीत यांमुळे आजही भारतीय प्रजेमध्ये हे लोक वेगळे कळून येतात. त्यांना 'सिद्दी' किंवा 'हबशी' म्हणून संबोधिले जाते. आज भारतात त्यांची संख्या पन्नास ते साठ हजार यांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येते. या वैशिष्ट्यपूर्ण लोकांनी त्यांच्या पूर्वापार सांगीतिक परंपरा किती जरी जपल्या तरी स्थानिक भारतीय संगीत, भाषा व प्रथांशी त्यांचा कालपरत्वे मेळ झाला आहे. सिद्दी लोकांच्या परंपरा, भाषा, राहणी, समजुती व संगीताचा अभ्यास करू जाता संस्कृती कशा प्रकारे मूळ धरते, प्रवाहित होते, विकसित होते किंवा दिशा बदलते याचे जणू एक चित्रच समोर उभे राहते.
सिद्दी स्त्री व मुलगी
असे सांगितले जाते की भारतात सिद्दी लोकांनी इ.स. ६२८ मध्ये भडोच बंदरात पहिले पाऊल टाकले. पुढे इस्लामी अरब टोळ्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्येही अनेक सिद्दी फौजेचा भाग म्हणून भारतभूमीत आले. परंतु सैन्याचा भाग म्हणून आलेल्या सिद्दींपेक्षाही गुलाम, नोकर, खलाशी व व्यापारी म्हणून आलेल्या सिद्दींचे प्रमाण जास्त धरले जाते. हे सर्वजण पूर्व आफ्रिकेतून इ.स. १२०० ते १९०० या कालखंडात भारतात येत राहिले व इथेच स्थायिक झाले. १७ व्या शतकात पोर्तुगीज व्यापार्‍यांनी सिद्दींना भारतातील अनेक राज्यकर्त्यांना, संस्थानांना व राजांना गुलाम म्हणून विकल्याची नोंद आढळते. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सिद्दी लोकांची गुलाम म्हणून विक्री झाली.

भारताच्या पश्चिम भागात, खास करून गुजरातेत सिद्दी लोकांना आपल्या अंगभूत ताकदीमुळे व इमानदारीमुळे स्थानिक राजांच्या पदरी मारेकरी म्हणून नेमण्यात आले. काहींना शेतमजूर, नोकर म्हणून पाळण्यात आले. ज्या सिद्दींना असे आयुष्य नको होते त्यांनी घनदाट जंगलांच्या आश्रयाला जाणे पसंत केले. त्यातील काहींनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील जंजिर्‍यावर व जाफराबाद येथे आपली सत्ताकेंद्रेही उभी केली. दिल्लीवर मुघलांची सत्ता येण्याअगोदरच्या काळात (इ.स. १२०५ ते १२४०) रजिया सुलतानाचे पदरी असलेला जमालुद्दीन याकूत हा प्रसिद्ध सरदार सिद्दी जमातीपैकीच एक होता असे सांगण्यात येते. गुलामी ते सरदारकी असा त्याचा प्रवास होता.

सत्तासंघर्षामध्ये सिद्दी जमातीने कायम मराठ्यांपेक्षा मुघलांचीच जास्त करून साथ दिली. परंतु सिद्दी लोकांमधील मलिक अंबर या इतिहास प्रसिद्ध व्यक्तिमत्वाने आपल्या मर्दुमकीने मुघलांना जेरीस तर आणलेच, परंतु मराठ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या गनिमी काव्याच्या लढ्याची सुरूवात मलिक अंबरने महाराष्ट्रात केली. इथियोपियाहून आईबापांनी गुलामगिरीत विकलेल्या व जागोजागच्या गुलाम बाजारांमधून विक्री होत भारतात पोचलेल्या मलिक अंबरने अहमदनगरच्या निझामाच्या पदरी चाकरी केली व त्याचा बाकीचा इतिहास, पराक्रम, त्याने बांधलेल्या कलापूर्ण वास्तू व औरंगाबाद येथे त्याने तेव्हा विकसित केलेली 'नेहर' जलव्यवस्था यांबद्दल इतिहासकार कौतुक व्यक्त करतात.

भारतातील अनेक सिद्दी लोक हे टांझानिया व मोझांबिक येथील लोकांचे वंशज असून त्यांच्या पूर्वजांना पोर्तुगीजांनी भारतात आणले. यातील बहुसंख्य लोकांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला असून फारच कमी लोक हिंदू धर्म लावतात. त्याचे मुख्य कारण पारंपारिक हिंदू वर्ण व्यवस्थेत त्यांना कोठेच स्थान नसणे!

भारतातील तीन प्रांतांमध्ये प्रामुख्याने सिद्दी लोकांच्या वसाहती आढळतात. गुजरात, कर्नाटक व हैद्राबाद हे ते प्रमुख प्रांत होत. गुजरातेत गीर जंगलाच्या आजूबाजूला सिद्दी लोकांच्या वसाहती आढळतात. त्यांचे पूर्वज हे जुनागढच्या नवाबाच्या पदरी गुलाम होते. पोर्तुगीजांनी त्यांना गुलाम म्हणून जुनागढच्या नवाबाला विकले होते.


येथील सिद्दींनी स्थानिक गुजरातेतील चालीरीती, संगीत, भाषा इत्यादी जरी आत्मसात केले असले तरी त्यांच्या काही काही प्रथा, समजुती, संगीत व नृत्य या त्यांच्या मूळ संस्कृतीतून आलेल्या आहेत व त्यांनी त्या प्रयत्नपूर्वक जपल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे त्यांचे 'गोमा संगीत'. किंवा गोमा नृत्य! ह्याचे मूळ पूर्व आफ्रिकेतील बंटू लोकांच्या आवडत्या एन्गोमा ड्रमिंग व नृत्यामध्ये असल्याचे सांगतात. या लोकांसाठी गोमा नृत्य हे फक्त मनोरंजन किंवा विरंगुळ्याचे साधनच नाही, तर ते त्यांच्या मूळ धार्मिक किंवा आध्यात्मिक समजुतींनुसार महत्त्वाचे आहे. नृत्याच्या परमक्षणांना नर्तकांच्या अंगात त्यांचे पूर्वज संत-आत्मे प्रवेश करतात अशी त्यांची श्रद्धा आहे.

गुजरातेतील सिद्दी लोकांचे हे गोमा नृत्य :



कर्नाटकात सिद्दींची संख्या सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येते. उत्तर कर्नाटकाच्या यल्लापूर, हलियाल, अंकोला, जोयडा, मुंडगोड, सिरसी तालुक्यांत, बेळगावच्या खानापूर तालुक्यात आणि धारवाडच्या कालघाटगी या ठिकाणी प्रामुख्याने सिद्दींची वस्ती आढळते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक सिद्दींनी पाकिस्तानात जाणे पसंत केले व ते कराचीत स्थायिक झाले. कर्नाटकातील सिद्दी हे प्रामुख्याने पोर्तुगीज, अरब व ब्रिटिश व्यापार्‍यांनी १६ ते १९ व्या शतकाच्या काळात गोव्याला गुलाम म्हणून आणलेल्या मूळच्या इथियोपिया व मोझांबिक येथील आफ्रिकन लोकांचे वंशज आहेत. त्यातील काहींना गुलामगिरीतून मुक्त करण्यात आले तर काहींनी पळून स्वतःची सुटका करून घेतली व जंगलांचा आश्रय घेतला.
यल्लापूरच्या सिद्दींमध्ये, त्यांच्या नाच-गाण्यांमध्ये व श्रद्धा समजुतींमध्ये त्यांच्या पूर्वजांचा वारसा पुढे चालविलेला दिसून येतो. एम टी व्ही साऊंड ट्रिपिन् कार्यक्रमात यल्लापुरातील सिद्दी लोकांवर झालेला हा कार्यक्रम : https://www.youtube.com/watch?v=JT-ODZ7YX30

त्यांच्यावरचा हा एक व्हिडियो :



हैद्राबादचे सिद्दी हे त्या भागात १८ व्या शतकात स्थायिक झाल्याचे सांगण्यात येते. हे सिद्दी निझामाच्या पदरी घोडदळात काम करत असत. त्यांचे संगीत हे 'हैद्राबादी मर्फा संगीत' (ज्याला 'तीन मार' म्हणूनही संबोधिले जाते) म्हणून विशेष प्रसिद्ध आहे व हैद्राबादेत ते खास सिद्दींच्या लग्नसमारंभांत किंवा अन्य प्रसंगी वाजविले जाते. ढोलक, स्टीलची कळशी व लहान 'मर्फा' ढोल यांसोबत लाकडी 'थापी' असा मर्फा वाद्यवृंदाचा संच असतो. मर्फातही तीन उपप्रकार आहेत. काही फक्त पुरुषांसाठी आहेत तर काही प्रकार पुरुष व स्त्रिया दोघांसाठी आहेत. यातील नृत्यप्रकारात तलवार व काठ्यांचा वापर करण्यात येतो. मात्र या कलाप्रकाराला ओहोटी लागल्याचे सांगण्यात येते.

केनियातील वृत्तवाहिनीने प्रसारित केलेले सिद्दी लोकांविषयीचे हे वार्तांकन :



आजच्या काळात बहुसंख्य सिद्दींची आर्थिक व सामाजिक स्थिती ही निम्न स्तराची आहे असे सांगतात. शिक्षणाचा अभाव, गरीबी, पिढ्यानुपिढ्या लादलेली गुलामगिरीची मानसिकता यांमुळे या लोकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी वेळ लागतो आहे. तसेच त्यांची सामाजिक परिस्थितीही फार चांगली नाही. भारतीय भाषा, आचार, वेशभूषा व संस्कृतीशी बर्‍याच प्रमाणात आदानप्रदान केले तरी सिद्दींना मुख्य लोकधारेने फारसे सामावून घेतलेले दिसत नाही. नव्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व कळले असल्यामुळे मेहनतीच्या जोडीला शिक्षणाचा मेळ घालून ते आयुष्यात पुढे येण्याच्या खटपटीत दिसतात.

(* चित्रे व माहिती आधार : विकिपीडिया, हिंदू वृत्तपत्रातील बातमी, The African Dispersal in the Deccan: From Medieval to Modern Times By Shanti Sadiq Ali, बी बी सी इन पिक्चर्स : इंडियाज आफ्रिकन कम्युनिटीज)

Wednesday, October 17, 2012

उबुंटू


विश्व संगीताच्या अभ्यासाचे दरम्यान माझी ओळख एका सुंदर शब्दाशी झाली. तो शब्द म्हणजे ''उबुंटू''. 



Umuntu Ngumuntu Ngabantu: “A person is a person because of people.” (झुलू म्हण)

उबुंटू या शब्दाला आफ्रिकेत खोसा समाजात, बंटू भाषांमध्ये मोठे महत्त्वाचे स्थान आहे व त्या शब्दाची वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी रूपे आहेत. जसे बोथो, उटू, उन्हू इत्यादी. उबुंटू हे एक प्रकारचे तत्त्वज्ञान किंवा जीवनशैली म्हणता येईल. त्याचा अर्थ ढोबळपणे, ''मी आहे, कारण आम्ही आहोत,'' असा होतो. त्यानुसार समाजात प्रत्येकाचे स्थान महत्त्वाचे आहे, आणि ''माझं अस्तित्व इतरांच्या अस्तित्वामुळे आहे,'' हा त्यातील मुख्य विचार मानला जातो. त्यानुसार उबुंटू जीवनशैलीला अनुसरणार्‍या माणसाला इतरांमधील गुणांमुळे  किंवा त्यांच्या क्षमतेमुळे कधीच असुरक्षित वाटत नाही. कारण तो स्वतः पूर्णतेचा एक अंश आहे, त्या पूर्णतेचा एक भाग आहे हे त्याला ठाऊक असते. तो स्वतःला इतरांचा एक भाग मानतो. आणि त्यामुळे इतरांची मानहानी ही त्या व्यक्तीचीही मानहानी ठरते. इतरांचे शोषण त्याचे शोषण ठरते. इतरांचे दु:ख त्याचे दु:ख ठरते. तुम्ही माणूस म्हणून एकट्याने जगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला इतरांची, माणसांची, समाजाची गरज असते. तुमचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. उबुंटू मुळे तुमच्यात उदारता येते. मनाचे मोठेपण येते. आपण एकमेकांशी जोडले गेल्याची भावना येते. अनेकदा आपण स्वतःचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करतो. पण उबुंटू मध्ये तुम्ही व इतर माणसे भिन्न नाहीत. एकाच्या कृतीने बाकीच्यांवरही प्रभाव पडतो. मग तो प्रभाव चांगला असो की वाईट! तुम्ही चांगली कृती केलीत तर त्याचा फायदाही सार्‍या जगाला होतो.

नेल्सन मंडेला उबुंटूचा अर्थ सांगताना म्हणतात : पूर्वीच्या काळी यात्रेकरू प्रवास करताना एखाद्या खेड्यात थांबायचे. तिथे गेल्यावर यात्रेकरूला कोणापाशी अन्न, पाणी मागायची गरज पडत नसे. कारण खेड्यातले सर्व लोक त्याला अन्न, पाणी आणून देत. त्याचे मनोरंजन करत. हा झाला उबुंटूचा एक भाग. याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी स्वतःचा विचारच करायचा नाही! त्याचा अर्थ असा घ्यायचा की तुमच्या समाजाचा विकास व्हावा यासाठी तुम्ही हे करायला तयार आहात का?  



एक प्रकारचे ''कम्युनिटी स्पिरिट'' ज्याला म्हणता येईल असे हे तत्त्वज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्त्य जगातही बरेच प्रसिद्ध पावले असे म्हणता येईल. २००४ सालच्या ''इन माय कंट्री'' चित्रपटात उबुंटू ही मुख्य विचारधारा असल्याचे सांगितले जाते, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही त्यांच्या भाषणात समाजाचे महत्त्व सांगताना उबुंटूचा उल्लेख केला आहे.



संगणकीय प्रणालीच्या जगातही ''उबुंटू'' हे नाव प्रसिद्ध झाले आहे. प्रसिद्ध पॉप गायिका मॅडोनाने उबुंटूचे इंग्रजी भाषांतर असलेले ''आय अ‍ॅम बिकॉझ वुई आर'' हे शीर्षक आपल्या आफ्रिकेतील मलावीच्या एड्स आणि एच आय व्ही ग्रस्त अनाथ मुलांवर तयार केलेल्या माहितीपटासाठी वापरले.



उबुंटू शब्दाशी निगडित एक छोटीशी पण सुरेख गोष्ट मध्यंतरी वाचनात आली.



आफ्रिकेत काम करणार्‍या एका मानववंशशास्त्रज्ञाने तो काम करत असलेल्या खोसा समाजातील लहान मुलांना खेळताना पाहिले. त्याने एका झाडाखाली एक टोपली ठेवली. टोपलीत मधुर चवीची फळे होती. तो या मुलांना म्हणाला, तुमची शर्यत लावूयात. तुमच्यापैकी जो पळत पळत जाऊन त्या टोपलीपाशी पहिला पोचेल त्याला सर्वात जास्त फळे मिळतील. मुलांनी होकार दिला. शास्त्रज्ञाने शर्यत सुरू केल्यावर सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळेजण पळत पळत एकाच वेळी त्या टोपलीपाशी पोचले. अर्थातच फळांचा प्रत्येक मुलाला समान वाटा मिळाला. त्या शास्त्रज्ञाला मुलांच्या त्या वागण्याचे फार कुतूहल वाटले. त्याने विचारले, ''तुम्ही अशा प्रकारे का पळालात? तुमच्यापैकी एक कोणीतरी शर्यत जिंकू शकला असता!'' त्यावर मुलांनी फळांवर ताव मारत उत्तर दिले, ''उबुंटू, जर बाकीचे दु:खी असतील तर आमच्यापैकी कोणी एक कसा काय बरे आनंदी होऊ शकेल?'' :-)

(उबुंटूबद्दल आणखी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Ubuntu_(philosophy) येथे उपलब्ध आहे. चित्र आंतरजालावरून साभार)

Monday, October 08, 2012

धोबिणींचा गानवृंद!


काबाडकष्टांच्या आयुष्यात, संघर्ष - गरिबीचे जीवन जगत असताना त्याला जर संगीताची किनार लाभली तर सार्‍या आयुष्यात सर्व तर्‍हेच्या प्रसंगात ते संगीत साथ देते हे खरेच आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशांमधील कष्टकरी जमाती आपल्या श्रमांचा भार हलका करण्यासाठी, मनाला विरंगुळा देण्यासाठी संगीताचा आधार घेताना दिसतात. त्या संगीतातून त्यांच्या भावना, आयुष्यातील चढउतार, गमतीच्या गोष्टी, लोककथा, दंतकथा इथपासून ते केवळ यमक जुळवण्यापुरती केलेली मजेशीर रचना असे सर्व प्रकार दिसतात.

ब्राझीलमधील जेक्विटिनहोन्हा खोर्‍यातील धोबिणींनी आपल्या कष्टाच्या, एकसुरी आयुष्यातून विरंगुळा, रंजनाचे चार क्षण शोधले आणि त्याची परिणिती त्या बायकांचा एक सुरेखसा गानवृंद तयार होण्यात झाली!
ब्राझीलच्या मिनास जेराइस राज्यात वसलेल्या उत्तर पूर्व भागातील या बायका म्हणजे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या गाण्यांचे चालते-बोलते भांडार आहेत! मूळ आफ्रिकेतून त्यांच्या पूर्वजांनी या देशात आणलेले पिढ्यानुपिढ्या समृद्ध करणारे आफ्रिकन धर्तीचे संगीत, सांबा, फ्रेवोस, ड्रमिंग, अफोक्सेस, लोकसंगीत यांचा व्यवसायाने धोबिणी असणार्‍या या स्त्रियांकडे मोठा संचयच आहे म्हणा ना!




आयुष्यात या स्त्रियांनी काय नाही पाहिलेय? त्यांचे पूर्वज ब्राझीलमध्ये गुलाम म्हणून आले. इ.स. १५३० ते १८५० या काळात ब्राझीलमध्ये चाळीस लाख गुलामांची आयात झाली. पुरुषांची शारीरिक ताकद जास्त म्हणून स्त्रियांपेक्षा पुरुष गुलाम जास्त आणले जायचे. पुरुषांना उसाच्या शेतांमध्ये राबविले जायचे तर बायका घरमालकांच्या व मालकिणींच्या हाताखाली राबायच्या, त्यांची मुले सांभाळायच्या, स्वैपाकी म्हणून काम करायच्या, मालकाच्या घरात कष्टाची कामे करायच्या. शिवाय रस्त्यावर खाद्यपदार्थही विकायच्या. पुरुष गुलामांपेक्षा त्यांची गुलामगिरीतून लवकर मुक्तता व्हायची. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या आपल्या मालक-मालकिणीच्या जास्त जवळच्या संपर्कात असायच्या. गुलामगिरीतून मुक्त झाल्या की मग या स्त्रिया धोबीण, स्वैपाकी, आया, नोकराणी म्हणून काम करायच्या. एकोणिसाव्या शतकात त्यांच्या वाटची गरिबी, कष्ट, मोलमजुरी चुकले नाहीत. शिवाय त्या समाजात अतिशय निम्न स्तराचे आयुष्य त्यांच्या वाट्याला आले होते. परंतु जसजशा उच्चवर्गातील स्त्रिया मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी झटू लागल्या तसतशा या कृष्णवर्णीय स्त्रिया आपल्या सामाजिक व राजकीय हक्कांसाठी झगडू लागल्या. इ.स. १९३२ मध्ये त्यांच्या निरक्षरतेमुळे त्यांना मतदानाचे हक्क नाकारण्यात आले. इ.स. १९४० च्या दरम्यान त्यांनी आपले संघटन करण्यास सुरुवात केली. ज्या जमिनीवर त्यांची घरे होती ती जमीन सरकार हिरावून घेऊ लागल्यावर या बायकांनी आपल्या हक्कांसाठी त्वेषाने लढा दिला. परिणामी त्यांना समाजात व त्यांच्या धर्मात प्रबळ स्थान मिळाले.

कँडोंब्ले हा त्यांनी आफ्रिकेतून आपल्याबरोबर आणलेला खास धर्म! पश्चिम आफ्रिकेच्या योरुबा परंपरेच्या व कॅथलिक धर्माच्या संगमातून निपजलेला हा धर्म. या धर्मात येथील स्त्रियांना अतिशय मानाचे स्थान आहे. त्याचे एक कारण सांगितले जाते की गुलामगिरीच्या काळात गुलाम स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत जास्त मोकळीक असल्याने त्या त्यांच्या धार्मिक परंपरा जतन करू शकल्या व गुलामीव्यतिरिक्त केलेल्या कामाच्या पैशांतून धार्मिक समारंभांसाठी निधी गोळा करू शकल्या. आपल्या धर्माच्या चर्चमध्ये त्या ''हाय प्रिस्टेस'' किंवा उच्च पुजारिणीची भूमिका बजावत होत्या. शिवाय सुरुवातीपासून त्या स्वतःचे स्वतः कमावत होत्या. आर्थिक स्वावलंबन व धर्मातील प्रबळ स्थान यांमुळे या स्त्रियांचे त्यांच्या समाजातील स्थानही पुढचे राहिले.

मात्र त्या तुलनेत त्यांची आर्थिक स्थिती फार काही सुधारलेली दिसत नाही. आजही या स्त्रिया समाजातील धनवान लोकांकडे नोकर, मदतनीस, आया, स्वैपाकी म्हणून काम करताना दिसतात. त्यांचे कष्ट सुटलेले नाहीत. पण त्यांच्या समाजात व धर्मात त्यांचे स्थान निर्विवादपणे सशक्त आहे.

धोबिणी

श्रीमंत, धनाढ्य लोकांचे कपडे हाताने धुऊन त्यांना कोळशाच्या इस्त्रीने कडक इस्त्री करायच्या व्यवसायात असणार्‍या धोबिणींना अनेकदा स्वतःचे अंग झाकायला पुरेसे कपडे नसत. तासन् तास नदीच्या पाण्यात कपडे धुवायचे, ते वाळवायचे व त्यांना सुरेखशी इस्त्री करायची, या एकसुरी कामात त्यांना आनंद देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्याजवळची गाणी! आपल्या मोकळ्या किंवा किनर्‍या आवाजात ही गाणी गात कपडे धुताना त्यांचा कष्टाचा भारही जरासा हलका होत असे. त्यांच्यापाशी जी गाणी होती ती पोर्तुगीज, आफ्रिकन, कृष्णवर्णीय, भारतीय परंपरांचा मेळ असणारी!

अल्मेनाराच्या धोबिणी

प्रसिद्ध संगीतकार लेननच्या ''Lavadeira Do Rio'' (नदीकाठच्या धोबिणी) या गाण्यातील काही ओळींचा अनुवाद किती समर्पक आहे!

Ah! Washerwoman of the river!
Many sheets to wash
One more skirt to go
When the soap runs out
But she runs to the water's edge
And sees the surf shine
She hears the wild racket
Of the waves that beat the shore
Ah, oh, the wind blew
Ah, oh, the leaf fell...


'Beating Clothes, Singing Life'

गानवृंदातील स्त्रिया

अल्मेनाराच्या सेंट पीटर भागात इ.स. १९९१ मध्ये कम्युनिटी लाँड्री बांधली गेल्यावर या बायका प्रसिद्ध संगीतकार, संशोधक व गायक कार्लोस फरीयास याच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आल्या व आपल्या गाण्यांचे समूहगायन करू लागल्या. त्यांनी अल्मेनाराच्या धोबिणींची सामाजिक संघटना स्थापन केली. त्यात पन्नासापेक्षा जास्त बायकांचा सहभाग होता. त्यांच्या गानवृंदाचे जसजसे नाव होऊ लागले तसतशा ब्राझीलच्या निरनिराळ्या शहरांतून त्यांना कार्यक्रमांसाठी, उत्सवांसाठी आमंत्रणे येऊ लागली. त्यांनी ब्राझीलच्या भागांबरोबरच पोर्तुगाल, पेरू, युरोपचे दौरेही केले. ''बाटुकिम ब्राझिलेरो'' (२००२) व अ‍ॅक्वा (२००५) या त्यांच्या संगीत अल्बम व पुस्तकांतून त्यांनी आपल्या समृद्ध वारशाला लोकांसमोर आणले. संगीताद्वारे समाजात सामावले जाण्याचा त्यांचा 'Beating Clothes, Singing Life' हा कार्यक्रम स्थानिकांनी व परदेशातील संगीत रसिकांनी उचलून धरला. 




या धोबिणींच्या वेगवेगळ्या गाण्यांचे अल्बम्स रेकॉर्ड झाले, त्यावर पुस्तके निघाली. कार्यशाळा होऊ लागल्या.  आपल्या कार्यक्रमांतून त्या फक्त आपल्या परंपरागत गाण्यांची झलकच दाखवतात असे नव्हे; तर त्या आपल्या आयुष्याची, संघर्षाची, कष्टांची कथाही सांगतात. नदीकाठच्या कथा ऐकवून लोकांचे मनोरंजन करतात. आपल्या खुमासदार संवादांनी कार्यक्रमात रंगत आणतात. आपल्या कलेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांच्या लोकांशी संवाद साधतात. त्यांना आवाहन करतात. ड्रम्स, गिटार्स, फ्लूट्स च्या साथीने या बायकांचे भरदार आवाज श्रोत्यांना वेगळ्याच दुनियेची सफर घडवून आणतात. आज कम्युनिटी लाँड्रीद्वारे चाळीस बायका या धोबीकामाद्वारे आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. त्यातील बारा ते पंधरा बायका धोबिणींच्या गानवृंदात गातात. आपली सुख-दु:खे लोकांबरोबर वाटतात.



कार्यक्रमाच्या शेवटी पाण्याला आशीर्वाद देण्याचा विशेष सोहळा असतो. या सोहळ्यात गानवृंदातील सर्व स्त्रिया रस्त्यांतून गाणी गात, वाद्ये वाजवत एक चैतन्यपूर्ण मिरवणूक काढतात. ही मिरवणूक त्या त्या ठिकाणच्या नदी, तळी, कारंजी, जलाशयांपर्यंत वाजत-गाजत जाते व तिथे या स्त्रिया फुलांची उधळण करतात.

या कार्यक्रमाला ब्राझील सरकारच्या सांस्कृतिक खात्याने विशेष मान्यता दिली असून त्यांना वेळोवेळी गौरवण्यात आले आहे. आयुष्यभर इतरांची धुणी धुऊन जीवनाचे गाणे गाणार्‍या बायकांची ही आयुष्याकडे बघण्याची दृष्टी, त्यांची कला आणि ताकद ही नक्कीच कौतुकास्पद आहे.  

*********************************************

माझी सहाध्यायी मिशेल ब्रूकचे पुन्हा एकदा ब्राझीलच्या या चिरतरुण गानवृंदाची ओळख करून दिल्याबद्दल विशेष आभार!

(* पोर्तुगीज भाषेतील शब्दांचे उच्चार दिल्यापेक्षा थोडे वेगळे असण्याची शक्यता आहे.)
(चित्रे अल्मेनाराच्या सांस्कृतिक संकेतस्थळावरून साभार)