Tuesday, January 04, 2011

भांग

'बगड बबं बबं बम लहरी ऽऽ'' कैलाश खेरचा मनमोकळा स्वर कँटीनच्या म्युझिक सिस्टीममधून मदमस्त घुमत होता. चहाच्या पेल्यांच्या तळव्यांनी चिकट झालेल्या टेबलावर ठेवलेल्या काचेच्या पेल्यातील चहामृत प्राशन करत सर्व मित्रमंडळी एकेक लंब्या चवड्या बाता मारण्यात गर्क होती.
''गेल्या शिवरात्रीला आम्ही मित्रांनी भांग-पार्टी केली. काय सॉलिड मजा आली यार.... मी म्हणे व्हरांड्याच्या खांबाला धरून शोलेचे डायलॉग्ज म्हणत बसलो होतो.... मला तर काही आठवत पण नाही यार... हॅ हॅ हॅ!'' आमच्या ग्रुपमधील एकाचा नुकताच झालेला दोस्त सांगत होता. बाकीचे सर्व नग त्याचं बोलणं भक्तिभावाने ऐकत होते. मला नकळत हसू फुटले. भांगेच्या नावासरशी जुन्या धूळ साठलेल्या काही आठवणी जाग्या झाल्या...
भांगेशी माझा संबंध तसा प्रत्यक्षात येईल असे कधी वाटले नव्हते. शंभुनाथ महादेवाचे ते एक आवडते पेय आहे, उत्तरेकडे महादेवाचा प्रसाद समजून महाशिवरात्रीला भांगेचे सेवन करतात इतपत माहिती होती म्हणा! आणि हो, राजेश खन्ना व मुमताजला भांग प्यायल्यावर ''जय जय शिव शंकर'' गात थिरकताना पाहून हे नक्कीच काहीतरी ढँटढँ प्रकरण आहे हा माझा समज पक्का झाला होता. सदाशिव पेठेच्या वरणभाताच्या वट्ट ब्राह्मणी साच्यात लहानाचे मोठे झाल्यावर भांग हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर पाल पडल्यागत दचकणारी व किंचाळणारी मंडळी पाहिली होती. अशीच मंडळी भोवताली असताना मला ह्या आयुष्यात तरी ''भांग'' नामक वनस्पतीचे किंवा वनस्पती-निर्मित द्रव्याचे सेवन तर सोडाच, दर्शन तरी होईल की नाही ही शंकाच होती. कुतूहल होते आणि भीतीही! पण एका प्रसंगाने मला भांगेच्या करामतीची नुसतीच ओळखच नव्हे तर पुरती ओळख-परेड करून दिली. ते चोवीस तास कायमचे हरवले ते हरवलेच!!
एक बोचर्‍या थंडीने गारठलेली दुपार. लग्नाच्या पंगतीसाठी गारढोण फरशांवर अंथरलेल्या सतरंज्यांच्या पट्टीवर बसून मी आमच्या पंगतीकडे मिठाईची ताटे कधी वळताहेत ह्याची चातकाच्या आतुरतेने वाट बघत होते. सकाळपासून गुलगुलीत बाळसेदार पदार्थांचे तबियतीने सेवन चालू होते तरीही जेवायच्या वेळेपर्यंत भुकेने जीव गोळा व्हावा इतकी थंडी होती बाहेर! पंगतीत पाठीला पाठ लावून सुटाबुटातील, उंची शेरवानी-सफारीतील पुरुष, नखशिखान्त नटलेल्या काही स्त्रिया आणि बरीच छोटी छोटी मुले आमच्यासोबत जेवायला होती. एकमेकांना आग्रह करकरून भोजनाचा आस्वाद घेणे चालू होते.
समोरच्या पत्रावळी-द्रोणांत तर्‍हेतर्‍हेचे फरसाण, नमकीन, ढोकळा, कडक पुर्‍या, रस्सा-भाजी, कढी, पापड वगैरे पदार्थ दुर्लक्षित पडून होते. मला प्रतीक्षा होती ती त्या जेवणाचा मानबिंदू ठरलेल्या, तोंडात ठेवता क्षणी अलगद विरघळणार्‍या, पांढर्‍या शुभ्र बर्फाप्रमाणे दिसणार्‍या, अतिशय रुचकर अशा खोबर्‍याच्या मलईयुक्त बर्फीची! नेमका तोच पदार्थ सोडून बाकीचे सर्व पदार्थ समोर हजेरी लावत होते. तेवढ्यात अंगावरच्या सुवर्णालंकारांच्या आणि हातभर जरतारी पल्लूच्या ओझ्याने वाकलेली लग्नघरातील थोरली सून तिच्या नणंदेसह हातात पुर्‍यांची टोकरी घेऊन आमच्यापाशी येऊन पत्रावळीत पुरी वाढू लागली.
''भाभीजी, मुझे वह सफेदवाली मिठाई चाहिए | '' मी निर्लज्जपणे माझी मागणी नोंदविली.
तत्परतेने एक वाढपी पंगतीतून वाट काढत आमच्यापाशी आला आणि हातातील ताटातून ती मिठाई मला वाढू लागला. मी मागितल्यावर शेजारी-पाजारी बसलेल्या अनेकांनीही ती मिठाई हौसेने वाढून घेतली. बघता बघता माझ्या समोरच वाढप्याच्या हातातील मिठाईचे ताट रिकामे झाले. काही म्हणा, ही ''सफेदवाली'' मिठाई लग्नाच्या पंगतीत भलतीच हिट झाली होती!
आमचे मातृदैवत माझ्या डाव्या बाजूला बसले होते. मला नजरेने दाबत होते. तरीही नि:संकोचपणे मी त्या बर्फीचे अजून काही तुकडे पुन्हा मागणी करून वाढून घेतले. शिवाय वर, ''वाह! क्या मिठाई बनी है |'' अशी दाद द्यायला विसरले नाही! पंगत चालू राहिली. माझा त्या सफेद मिठाईचा मनसोक्त समाचार घेणेही चालूच राहिले.
मध्य प्रदेशात महाराष्ट्राच्या सीमेच्या अगदी नजीक, तापी नदीच्या काठावर वसलेल्या बर्‍हाणपुरातील हा ऐन थंडीचा मोसम. विलक्षण धुके, पाऊस, गारपीट असे टिपीकल ''ओलें''वाले वातावरण. दिवसेंदिवस सूर्याचे दर्शन दुर्मिळ. गारठलेले शहर व शहरवासी. धुक्याच्या आच्छादनात गुरफटलेला आसमंत. आणि ज्या हवेत सर्वसामान्य बर्‍हाणपुरवासिय बाहेरही पडणार नाहीत अशा हवेत भल्या सकाळी साडेसहाचा लग्नाचा मुहूर्त ठेवलेला!
त्या पहाटे अतिशय कष्टांनी, प्रयत्नपूर्वक ऊबदार रजयांच्या बाहेर पडून पुण्याहून खास ह्या लग्नासाठी आलेले आमचे चौकोनी कुटुंब मोठ्या मुश्किलीने सजून धजून तयार तर झाले... पण त्या गारठलेल्या हवेत लॉजच्या बाहेर पाऊलही टाकवत नव्हते. बरं, मुहूर्त गाठणे तर महत्त्वाचे होते. अखेर वडिलांच्या एका ज्येष्ठ स्नेह्यांच्या मुलाचे लग्न होते ते! मग काय!! भल्या सकाळी लेफ्ट राईट करत आमची परेड निघाली रस्त्याने वाजत-गाजत! ओस पडलेल्या रस्त्यावर आमच्या पावलांचा आवाज उगाच मोठा वाटत होता. एरवी नाक्या-नाक्यावर उभे असणारे टांगेवालेही धुकं-थंडीने गारठून गायब झाले होते.
''हे काय... आत्ता येईल कार्यालय!'' वडिलांनी धूर्त राजकारण्याच्या आवेशात दिलेल्या ह्या आश्वासनावर विसंबून मी व माझी बहीण एकमेकींना ढकलत ढकलत मार्गक्रमणा करत होतो. अगदी दोन मिनिटांचा रस्ता दहा-पंधरा मिनिटे चालले तरी कसा संपत नाहीए ह्यावर विचारमंथन करण्याएवढी अवस्थाही नव्हती आमची! थंडीने बधीर झालेली शरीरे आणि मेंदू तर अगोदरच थंडीने गोठलेला व अर्धनिद्रेत!
आपण लग्नस्थळी जाऊ तेव्हा आपणच तिथे पहिले पोहोचणारे निमंत्रित असू हा आमचा भ्रम कार्यालयाच्या दारातच गळून पडला. आमच्या अगोदर तिथे दोनशे-अडीचशे डोकी रंगीबेरंगी फेटे, शेरवान्या, चमचमणार्‍या साड्या- अलंकारांच्या व उंची पर्फ्युम्सच्या दरवळात वावरत होती. आत शिरल्यावर सुरुवातीचे नमस्कार - चमत्कार, आगत - स्वागत झाले. मग मात्र जवळपासच्या दोन-तीन खुर्च्यांवर टेकून व स्वतःला शालीत गुरफटून मी व भगिनीने तत्परतेने दोन-तीन डुलक्या काढल्या. लग्न आर्य समाज पद्धतीने लावले जात होते, ते आमच्या पथ्यावरच पडले. कारण ह्या लग्नात फार बजबजाट - गोंधळ नसतो. लहान मुलांचा, कोर्‍या नव्या कपड्यांचा आणि माफक कुजबुजीचा आवाज सोडला तर शांत वातावरण. त्यात फक्त पुरोहितांचा काय तो गंभीर स्वर. माझे डोळे जे मिटले ते साडेसाताला मातेने बाहेर वाजत असलेल्या बँडच्या पार्श्वसंगीताच्या लयीत मला गदगदा हालवून ''लग्न लागलं आहे, नाश्त्याला गरम गरम इम्रती, बटाटेवडे आणि पहुवा (पोहे) आहेत. खाणारेस का?'' असे म्हटल्यावरच टक्कन् उघडले.
माझ्या वयाची मुले-मुली तिथे जवळपास नव्हतीच. होती ती माझ्यापेक्षा लहान बच्चे कंपनी. मग त्यांच्याबरोबर जरा दंगा, खेळ, गप्पा यांत थोडा वेळ गेला. प्रीतीभोज सुरु होण्यास अजून बराच अवधी होता. अचानक आमच्या पिताश्रींना आम्हाला बर्‍हाणपुरातील काही प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याचे सुचले! आमची अकरा नंबरची बस पुन्हा एकदा मजल दरमजल करत निघाली. रस्त्यांवर अगदीच शुकशुकाट होता. बुरहानपुरचा किल्ला आणि तेथील राजेशाही हमामखाना ओस पडले होते. आधीच सुसाट सुटलेले वारे त्या भग्नावशेषांना, खंडहरांना अजूनच गूढ, गारठवणारी डूब देत होते.... तेथील दु:खी, वेदनामय इतिहासाची झाक सार्‍या वातावरणात भरून राहिली होती. तब्बल दोन - अडीच तास पायपीट केल्यावर पिताश्रींना आम्हा श्रमल्या-थकल्या व भुकाळलेल्या जीवांची दया आली. कार्यालयात परत येईस्तोवर भोजनाची वेळ झाली होती. मला तर भीम-बकासुराच्या गोष्टीतील बकासुराप्रमाणे भूक लागली होती. मग काय, आने दो और मिठाई!!!
भरपेट जेवण झाल्यावर मी तिथेच पंगतीत ''आता मी अजिबात चालणार नाहीए,'' हे जाहीर करून टाकले. मोठ्यांनाही जेवण अंमळ जडच झाले असावे. कारण कधी नव्हे तो हेडक्वार्टर्सकडून माझी टांगासवारीची मागणी संमत झाली आणि आमची उचलबांगडी त्वरित कार्यालयाच्या दाराशी उभ्या असलेल्या एका टांग्यात झाली. परतीचा प्रवास अजिबात न आठवण्याइतपत आम्ही झोपाळलो होतो. लॉजवर आल्यावर जेमतेम आवरले आणि गुबगुबीत गाद्यांवर, रजयांमध्ये गुरफटून घेऊन जे देह लोटून दिले ते......
...... दुपारची चार-साडेचाराची वेळ.
दारावर जोरजोरात धडका का बसत आहेत म्हणून मी डोळे चोळत अंथरुणातून उठून बसले. खोलीचे पडदे ओढलेले, अंधार भरून राहिलेला.... शेजारी बहीण व आई-बाबा अजून निद्राधीनच होते. बाबांना हालवले पण ते काहीतरी पुटपुटत पुन्हा घोरासुराला शरण गेले. मग आईला हालवले. दोघींनी मिळून बाबांना उठविले.
''अहोऽ, बघा बरं कोण दार बडवतंय ते.... कधीचे वाजवताहेत दार...'' पिताश्रींना आम्ही दरवाजाच्या दिशेने जवळपास ढकललेच!
त्यांनी जांभई देत, डोळे चोळत दार उघडले. समोर लॉजचा मॅनेजर, एक सुटाबुटातील उंचेपुरे गृहस्थ व त्यांच्या सोबत केसांचा बॉब असलेली एक स्त्री उभे होते. मॅनेजरने हसून मान डोलवली आणि तो चालता झाला. समोरील दांपत्य मात्र अवघडले होते... ''ओह्ह.... आप लोग आराम कर रहे थे.... बहुत देर से हमने यहां का फोन ट्राई किया, कोई जवाब नही मिला... तो फिर आप को लेने हम खुद आये....''
एव्हाना वडिलांची झोप बर्‍यापैकी हटली होती. कारण समोरचे गृहस्थ म्हणजे तेथील नगर निगमचे उच्चपदस्थ अधिकारी श्रीयुत देवडा होते व सोबत असलेल्या बाई त्यांच्या अर्धांगिनी होत्या.
आम्ही लगबगीने उठून आमच्या खोलीत त्यांचे स्वागत केले. जमेल तसा पसारा आवरला व दडपला. दोघेही बिचारे आमच्या झोपेत व्यत्यय आणल्याने जरा संकोचले होते.
वडिलांना तेवढ्यात सुचले, ''चलिए, हम लोग गरमागरम चाय पीते है.... '' लॉजच्या रूम सर्व्हिसने लगेच आलं, वेलदोडा वगैरे घातलेला मसाला चहा पुरविला. तो वाफाळता चहा पीत असताना आमचे गोठलेले मेंदू हळूहळू वितळू लागले होते.
''हमने आप सब की कल शाम बहुत राह देखी डिनर के लिए...'' मिसेस देवडा सांगत होत्या, ''लेकिन आप लोग तो आये नही, ना कुछ खबर.... तो मैने देवडा साब को बोला भी.... आप ने जरूर कुलकर्णी साब को डिनर के लिए ठीक से इन्व्हाईट नही किया होगा.... शायद बुरा मान गए वह....''
आमच्या पिताश्रींचा चेहरा एव्हाना भांबावल्यासारखा झालेला... त्यांनी श्रीयुत देवडांकडे वळून पृच्छा केली, '' देवडा साब, अगर आप बूरा न माने तो एक बात पूंछू?'' त्यांच्या रुकारासरशी वडिलांनी बिचकतच विचारले, ''आप ने तो आज के दिन खाने पे बुलाया था नं? मैने आप को बोला भी था शायद की आज दोपहर शादी का इतना हेवी खाना खाने के बाद हम लोग डिनर कर पाएंगे या नही, पता नही...''
आता देवडासाहेबही बुचकळ्यांत पडलेले दिसू लागले. ''माफ कीजिये जनाब, लेकिन शादी तो कल थी...''
''आँ??!!!'' आमच्या चौघांच्या चेहर्‍यावर एक निर्बुद्ध प्रश्नचिह्न.
''क्या मजाक कर रहे है देवडाजी.... अभी तो दोपहर को आए हम शादी का खाना खा के....'' आई न राहवून उत्तरली.
जरा वेळ हे वाग्युद्ध असेच चालू होते. शेवटी देवडांनी लॉजच्या मॅनेजरला बोलावले.
''भाईसाब, इनको बताइए जरा आज कौन सी तारीख है....''
मॅनेजराने सांगितलेली तारीख ऐकल्यावर आमची पार दाणादाण उडाली! ह्याचा अर्थ काल दुपारी दीड - दोनच्या दरम्यान परत आल्यावर आम्ही जे झोपलो ते थेट आजच्या तारखेला दुपारी चार वाजता उठलो??? कसं शक्य आहे हे? थंडी असली, जास्त जेवण झालं म्हणून काय झालं? इतकी गाढ कुंभकर्णाची झोप कशी काय लागली? मधल्या काळात वाजलेला फोन, ठोठावले गेलेले दार.... काही म्हणजे काहीही ऐकू न येण्याइतपत??
त्या सायंकाळी देवडा पती-पत्नींच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या खास मध्य प्रदेशी शैलीच्या आदरातिथ्याचा आनंद घेतला. पण डोके अजून जडावलेलेच होते. आपले चोवीस तास असे झोपेत कसे काय गेले ह्याचे समाधानकारक उत्तर मिळत नव्हते.
एवढी काळझोप कशी काय लागली?
डोक्याचा मद्दडपणा, अंगात जाणवणारा जडशीळपणा अजून का जात नाहीए?
दुसरे दिवशी सकाळी आम्ही राहत असलेल्या लॉजच्या खालील प्रल्हाद भोजनालयातील प्रसंग. नाश्त्याचे वेळी परवाच्या लग्नाला आलेले आणि वडिलांच्या ओळखीचे एक सद्गृहस्थ भेटले. आम्हाला पाहिल्यावर आपल्या पांढर्‍या झुबकेदार मिशांतून मिश्किलपणे हसत ते माझ्या वडिलांना विचारू लागले...'' क्या कुलकर्णी साब.... हमने तो सुना की शादी की मिठाई बहुत पसंद आयी आपको? सुना है की गहरी नींदमें आप देवडाजी के यहां डिनर करना भी भूल गए.... हा हा हा.... ''
एव्हाना वडिलांना काहीतरी काळेंबेरे असल्याचा दाट संशय येऊ लागला होता.
त्यांनी भुवया उंचावून, डोळे बारीक करून ''आपण त्या गावचेच नाही'' असा चेहरा केला. पण समोरचे सद्गृहस्थ त्यांच्यापेक्षा वीस-पंचवीस पावसाळे जास्त पाहिलेले असल्यामुळे मागे हटणार्‍यातील नव्हते.
''कमाल है भई, आप को किसी ने बताया नही....'' समोरच्या वाफाळत्या मलईदार मसाला दुधाचा एक घुटका घेऊन त्या सद्गृहस्थांनी आपले वाक्य तसेच हवेत तरंगत सोडून दिले.
एव्हाना वडिलांच्या चेहर्‍यावर तेच ते चिरपरिचित गोंधळलेले भाव येऊ लागले होते.
''क्या... क्या बात बतानी चाहिए थी?'' वडिलांचा पेचात पडलेला स्वर.
''अरे जनाब, जैसी यहां की शादी खास होती है वैसे ही शादी की मिठाई भी खास होती है.....''
''तो?'' वडिलांचा प्रश्न.
''अरे भई, अब भी समझे नहीं?'' वडिलांची मुंडी नकारार्थी हालताना पाहून त्यांनी डोळे मिचकावून वडिलांना जवळ यायची खूण केली.
''क्या?''
''अरे भाया, समझा करो.... यह मिठाई ऐसी वैसी नही होती.... हमारे यहां उसमें भंग मिलाते है शादी ब्याह के वक्त! अब यह मत कहना कि आप भंग वगैरा जानते नही.... वही जय भोलेनाथ वाली.... तो शादीकी भंगवाली मिठाई खाके बहुत मस्त हो जाते है लोग... महा स्वादिष्ट जो होती है ऐसी मिठाई... जितनी खाओ उतनी कम लगती है.... भंग का असर जो होता है...''
एव्हाना त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असलेल्या मातृदैवताचा चेहरा प्रेक्षणीय झाला होता!
''काऽऽय? भांग?? अहो, ते भांगच म्हणताहेत ना? म्हणजे त्या परवाच्या लग्नाच्या मिठाईत भांग होती? आपण सगळ्यांनी भांग घातलेली मिठाई खाल्ली??'' मातृदैवत वडिलांची बाही खेचून फुसफुसू लागले. वडिलांच्या चेहर्‍यावर मात्र गेले दोन दिवस तरळत असलेले प्रश्नचिन्ह निवळून आता तिथे तरल साक्षात्काराचे तेज विलसू लागले होते. धाकट्या बहिणीला ''एवढं मोठं काहीतरी घडलं आणि तरीही कोणीच आपल्याला काही कसं सांगितलं नाही?'' ह्याची चुटपूट लागलेली स्पष्ट दिसत होती. पुढच्या प्रवासात तिने एका हलवायाच्या दुकानाच्या पिछाडीस भांग घोटा पाहून ''मला आत्ताच्या आत्ता भांगेची गोळी पायजेल ऽ ऽ'' म्हणून भर-रस्त्यात भोकाड पसरला आणि आजूबाजूच्या लोकांचे यथेच्छ मनोरंजन केले तो किस्सा वेगळाच!!
आणि मी? लग्नाच्या पंगतीत आधी खास आग्रहाने मागवून घेऊन व नंतर नंतर वाढप्याला निर्लज्जपणे पुकारून खादडलेल्या बर्फ्यांचे एक नव्हे, दोन नव्हे, ते अनेक पांढरे शुभ्र तुकडे मला मोठ्या प्रेमाने माझ्या अवतीभवती ''भांग...भांग'' ओरडत भांगडा करताना पुढचे अनेक दिवस स्वप्नात छळत होते!
--- अरुंधती

Wednesday, November 24, 2010

नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम

अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्‍या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस.

अशीच एक अद्भुतरसाने भारलेली कविता वाचनात आली. कवितेची नायिका आहे माता तृप्ता. शीख संप्रदायाचे संस्थापक श्री गुरू नानक यांचे मातृत्व लाभलेली वत्सल स्त्री. तसे बघावयास गेले तर तृप्ता माता ही शीख संप्रदायाची आद्य जननीच! सध्या पाकिस्तानात असलेल्या तलवंडी गावात माता तृप्ता व पिता मेहता कालू यांच्या पोटी गुरू नानक यांचा इ. स. १४६९ मध्ये कार्तिक महिन्यात जन्म झाला. नुकताच गुरू नानक जयंती सोहळा व प्रकाश पर्वाचा उत्सव देशोदेशीच्या सर्व शीख बांधवांनी साजरा केला. इतिहासाने ज्या ज्या व्यक्तींची द्रष्टे, संतशिरोमणी किंवा ज्ञानी म्हणून नोंद घेतली त्यांमध्ये गुरू नानकांचे स्थान व कार्य वादातीत आहे. एका महान कर्तृत्वशाली, साक्षात्कारी संतमहात्म्याच्या जन्माच्या जशा कहाण्या असतात तशाच त्या गुरू नानकांच्या जन्माचे बाबतीतही आहेत. माता तृप्ताला नानकांचा गर्भ उदरी जोपासताना झालेले भास, तिला दिसलेली स्वप्ने, संकेत इत्यादींचे उल्लेख शीख वाङमयात येतात. तृप्ता मातेबद्दल तपशिलांत फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु ती स्वभावाने अतिशय सत्शील, कनवाळू व प्रेमळ असल्याचे उल्लेख आढळतात.



अमृता प्रीतमच्या प्रतिभाशाली लेखणीतून, कल्पनेच्या भरारीतून माता तृप्ताने गुरू नानकांच्या वेळी गर्भार अवस्थेत पाहिलेली स्वप्ने ''नौ सपने'' ह्या दीर्घ कवितेतून आपल्या भेटीला येतात. उदरीचा गर्भ तृप्ता मातेला विविध प्रकारे आपल्या अस्तित्वाचे, दिव्यत्वाचे संकेत देत राहतो. नऊ महिन्यांची ही नऊ स्वप्ने. उदरीचा गर्भ जसजसा आकार घेत जातो तसतसा स्वप्नांत आणि माता तृप्ताच्या मनोवस्थेत घडून येणारा बदल अमृताने मोठ्या नजाकतीने वर्णिला आहे. प्रत्येक स्वप्न तृप्ता मातेला पोटातील अंकुराविषयी काही ना काही दृष्टांत देत राहते. संकेत, भास-आभास, स्वप्न व संवाद यांचे हे तलम वस्त्र शब्दांमध्ये गुंफताना कवितेमधून ठायी ठायी अमृतामधील मातृत्वही डोकावताना दिसते. त्या काळातील स्त्रीच्या रोजच्या आयुष्यातील घटनांचा मोठ्या खुबीने वापर करून अमृता कवितेचे रंगही अधिक गडद-गूढ करत जाते. चंद्र-सूर्य-तारका, नदी-सरोवर, वृक्ष-वने आदींचे रूपक तिने रेखाटलेल्या शब्दचित्राचे सौंदर्य अजूनच खुलविते. तिने कवितेत योजलेले काही शब्द आणि त्यांचा प्रतीत होणारा अर्थ अधिक गहिराईचे संकेत देत मनात रुंजी घालत राहतात.

अमृताच्या आत्मचरित्रात हे काव्य तिला आपल्या आयुष्यातील एका प्रसंगावरुन स्फुरल्याचे ती सांगते. स्वतःचा दूरगावी गेलेला मुलगा जेव्हा आईशी संवाद साधतो तेव्हा त्या आईची होणारी अवस्था अमृतामधील माता आणि कवयित्री ज्या तरलतेने व ताकदीने अनुभवते तीच तरलता तिच्या ''नौ सपने'' कवितेतून रसिकांना खुणावत राहते. एका तेजस्वी गर्भाला उदरी पोसताना माता तृप्ताने नक्की काय अनुभवले असेल? काय स्वप्ने पाहिली असतील? येणार्‍या काळाच्या खुणा तिला जाणवल्या असतील का? त्या गर्भाने तिला काही संकेत दिले असतील का? या सार्‍या प्रश्नांचा वेध घेत अमृताची कविता एक वेगळाच अनुभव देऊन जाते.  



माता तृप्ताचे माध्यमातून अमृता जणू गर्भार अवस्थेतून जाणार्‍या स्त्रीच्या मनीचे बोल बोलते. पोटात दिसामासाने वाढणारा जीव आपल्या हुंकारातून मातेला मूक साद घालत असतो. तिच्या स्वप्नांत, विचारांत, अस्तित्वात व्यापून राहिलेला असतो. ''नौ सपने'' कवितेत त्या स्त्रीची ही अवस्था अमृता सुंदर रीतीने वर्णन करते.

त्या कवितेचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न  :  

नऊ स्वप्नं

भाग १

तृप्ता दचकून जागी झाली
ऊबदार दुलई हळूच सारखी केली
लाल लज्जेसमान पदर
सावरला तिने खांद्यावर

आपल्या धन्याकडे पाहिले
मग शुभ्र बिछान्यावरच्या
चुणीप्रमाणे हलकेच लाजली

आणि म्हणू लागली
आज माघाची रात्र
मी नदीत पाऊल ठेवले

गारठलेल्या थंड रात्री
कोमट पाणी नदीचे पात्री

अलौकिक काही झाले
पाण्याला अंगस्पर्श होताच
नदीचे दूध झाले!

त्या जादुई नदीत
मी दुधात न्हाले

या तलवंडी (गावा)त
ही कोणती नदी?
हे कसलं स्वप्नं?

आणि नदीत चंद्र तरंगत होता
मी चंद्राला ओंजळीत ठेवलं, घोट घेतला

आणि नदीचं पाणी
माझ्या रक्तात मिसळत गेलं
आणि तो प्रकाश
माझ्या उदरी तरंगत राहिला

-----------------------
भाग २

फाल्गुनाच्या कटोऱ्यात सात रंग मिसळले
पण मुखाने काही ना वदले

ह्या मातीच्या देहाचं सार्थक होतं
जेव्हा कोणी उदरी आश्रयाला येतं

हा कसला जप? हे कसलं तप?

की मातेला ईश्वराचा साक्षात्कार
गर्भाचे ठायी होतो....

---------------------------

भाग ३

कोवळ्या गर्भाची मळमळ
जीव घाबरा झाला केवळ

ताक घुसळायला बसले तर भासले जणू लोणी वर आले
मातीच्या घड्यात हात घातला
तर सूर्याचा वृक्ष निपजला

हा कसला भोग? कसला हा संयोग?

आणि चैत्राचे पुढे सरकणारे दिवस
हे असलं कसलं स्वप्नं?
-----------------------------

भाग ४

माझ्यात आणि गर्भात
हे स्वप्नांचं अंतर

जीव माझा फुलला आणि काळीज घाबरंघुबरं
वैशाखात कापलं जाणारं
हे कोणतं पीक होतं
सुपात पाखडायला घेतलं
तर सूप चांदण्यांनी भरून गेलं....

---------------------

भाग ५

आज रात्रीचा हा तरल समय
आणि ज्येष्ठाचा महिना
हा कोणता आवाज होता?

जळीस्थळी
जणू एक नाद उमटे
हे मोह-मायेचे गीत
की ईश्वराच्या कायेचे संगीत?

कोणता दैवी सुगंध होता?
की माझ्या नाभीचा गंध होता?
मी घाबरले
शंका घेत राहिले
आणि त्या आवाजाच्या रोखाने
वनांच्या वाटा धुंडाळत राहिले

हा कोणता आवाज
कोणतं हे स्वप्नं?
कितीसं परकं?
कितीसं आपलं?

मी एक हरिणी
जशी बावरी होत राहिले
आणि माझ्या गर्भाला
कान लावून ऐकत राहिले
--------------------------------

भाग ६

आषाढाचा महिना
तृप्ताला आपोपाप जाग आली
जसे उमलणारे फूल
जसा पुढे सरकणारा दिवस

''हे माझं जीवन
कोणत्या सरोवरांचं पाणी
मी आत्ताच इथे
एका हंसाला बसलेलं पाहिलं

हे कसलं स्वप्नं?
की जाग आल्यावरही वाटतंय
जणू माझ्या गर्भात
त्याचा पंख फडफडतोय..... ""
-------------------------------------

भाग ७

कोणता वृक्ष वा मनुष्य
नाही माझ्या जवळ
तरीही कोणी माझ्या झोळीत
घातला हा नारळ?

मी नारळ वाढविला
तर लोक मलई न्यायला आले
कोवळ्या नारळाचे पाणी
मी कटोऱ्यात ओतले

ना कोणा सांगितले ना कळवले
ना आप-परभाव केला
दाराशी असंख्य लोक आले
पण नारळाची मलई
तरीही संपली नाही

असा कसा हा नारळ?
असे कसे हे स्वप्नं?
आणि स्वप्नाचे धागे किती लांबच लांब?

छातीतला हा पाऊस,
मी छातीला हात लावला
तर ते नारळाचं पाणी
दुधासारखं ठिबकू लागलं

-------------------------------

भाग ८

हा कसला भाद्रपद?
ही कसली जादू?

सगळ्याच गोष्टी न्याऱ्या
ह्या गर्भीच्या बाळाचं अंगडं-टोपडं
शिवणार तरी कोण?

ही कसली सूत्रकाठी?
हे कसले माप?
जसे काही काल मी सारी रात्र
किरणांना विणत होते...

आश्विनाच्या महिन्यात
तृप्ता होती जागी आणि विरागी

''हे माझ्या जीवना!
तू कोणासाठी काततो आहेस हा मोहाचा धागा!

मोहाच्या तारेत आकाश गुंडाळता येत नाही
सूर्य बांधता येत नाही
सत्यासारखी एक जी गोष्ट
त्याचं अंगडं-टोपडं ना बेतता येतं ना शिवता येतं... ''

आणि तृप्ताने टेकविला माथा
आपल्या गर्भाचे ठायी
उमगले स्वप्नांचे मर्म मला
ना हा परका ना अपुला

कोणी मृत्युलोकीचा योगी
अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला
शेकत गर्भाची धुनी...

------------------------

भाग ९

माझ्या कार्तिक धर्मी,
माझं जीवन सुकर्मी
माझ्या गर्भाची धुनी
कातते पुढचा धागा जीवनी

देहाचा दीप उजळला
प्रकाशाचा किरण स्पर्शिला
धरतीच्या दाईला बोलावा
माझा प्रसवकाळ आला...

(पूर्ण)

**********************************************************************************************************************

मूळ काव्य येथे वाचा. 


--- अरुंधती 


(छायाचित्रे सिखविकीवरून साभार)

Saturday, November 20, 2010

म्हातारपणीची प्रार्थना

काल ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्‍यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्‍या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए. त्या प्रार्थनेचा मी केलेला स्वैर भावानुवाद येथे देत आहे :

देवा तुला माहीत आहे
माझं वय वाढत आहे...

वायफळ बडबड करण्यातून
प्रत्येक विषयावर माझे मत नोंदविण्याच्या
घोर निष्फळ अट्टहासातून
वाचव रे आता मला बाबा!

प्रत्येकाचे आयुष्य सुधारण्यापासून
इतर लोकांच्या भानगडी निस्तरण्याच्या मोहातून
मला वाचव रे बाबा!

लांबलचक तपशीलवार गोष्टींचे
पाल्हाळ लावण्याच्या सवयीतून
माझं रक्षण कर रे बाबा!

फाफटपसारा न मांडता
थेट मुद्द्याचंच बोलायचं
बळ दे रे मला बाबा!

माझ्या तोंडून
माझ्या अनंत शरीर वेदना आणि दु:खांचं
अव्याहत रडगाणं सुरू झालं की...
माझे ओठ शिवून टाकायची व्यवस्था कर रे बाबा!

वर्षं उलटत आहेत तसतशी त्या वेदनांची व्याप्ती
आणि माझी त्यांच्याबद्दल बोलण्याची हौस....
दोन्हीही वाढतच चाललं आहे!
आणि माझं त्यांच्याविषयीचं प्रेमदेखील....

मलाही शिकव धडा
की कधी कधी...
माझंही चुकू शकतं!

मला विचारी बनव रे देवा, चोंबडा बनवू नकोस.
परोपकारी बनव, हुकूमशहा बनवू नकोस.

माझ्याकडील शहाणपणाची आणि अनुभवांची महाकाय पोतडी
वापरता न येणे म्हणजे कित्ती कित्ती वाईट!

पण काय करू रे देवा....

शेवटापर्यंत हवेत ना मलाही
कोणी तरी हक्काचे सखे साथी!


-- अरुंधती

मूळ प्रार्थना वाचायची असल्यास येथे वाचा. 

Monday, November 15, 2010

शिक्षणाची किंमत

''ए, कँटिनमधून चहा आणा रे कोणी तरी! '' दिप्या बेंबीच्या देठापासून कोकलत आपला विशाल देह चिमुकल्या कट्ट्यावर कसाबसा तोलत बसला होता. गेल्या पाच मिनिटातील त्याची ही आठवी आरोळी होती. आणि इतक्या वर्षांनीही दिप्या दि ग्रेट शिपिंग कॉर्पोरेशन डिरेक्टरकडे कोणीही ढुंकून लक्ष देत नव्हते! एवढ्या वर्षांनी कॉलेजचे जुने मित्र-मैत्रिणी भेटले की हे चालायचेच.... आणि आज तर आम्ही सगळेजण मुद्दामहून आपले कॉलेज चौदा वर्षांनीही तसेच दिसते का, ते खास पाहायला आलो होतो! समोर कॉलेजची नवी इमारत मोठ्या दिमाखात उभी होती. तिच्या जागी असणाऱ्या आधीच्या जुन्या खुणा पार बुजून गेलेल्या. बघावे तिथे बांधकाम, पायवाटा भासावेत इतपत चिंचोळे रस्ते आणि गर्द हिरव्या झावळ्यांच्या शोभेच्या झाडांनी व्यापलेला परिसर. कधी काळी धूळ, माती आणि विटांचा ढिगारा उरापोटावर बाळगणारे पार्किंग गायब झाले होते. नव्या पाट्या, नवे बांधकाम आणि शिकणारी नवी पिढी....
"'माहितेय का? आजकाल तीन लाख मोजावे लागतात आपल्या कॉलेजातून आपल्यासारखी डिग्री घ्यायला.... '' सुशा पचकला.
''क्कॉय? '' काहीजणांच्या चेहऱ्यावर धक्कामिश्रित आश्चर्य होते. पण तीन-चार जण ''त्यात काय?!! सगळ्याच शिक्षणाचा खर्च वाढलाय! '' अशा आविर्भावात खांदे उडवत होते.
''आपल्या वेळेला वर्षाला आपण दोन हजार भरायचो. पाच वर्षांमध्ये जास्तीत जास्त दहा-बारा हजार भरले. आणि आता तेवढा खर्च फक्त दोन महिन्यांच्या शिक्षणाला येतो.... माय गॉड! टू मच.... '' एवढा वेळ गप्प बसलेला परेरा उद्गारला. मग कोणीतरी आपल्या लेकाच्या ट्यूशन फीचा विषय काढला.... गप्पांची गाडी मुलांच्या शाळांचा खर्च, क्लास फी इत्यादीवर वळली.
सर्वच जण उत्तम कमावणारे, संपन्न घरातील असल्यामुळे त्यांच्या चर्चा सर्वसामान्य शाळा, साधारण विद्यार्थ्यासंदर्भात नव्हत्याच मुळी.... आपल्या मुलाच्या शाळेत कोणत्या अत्याधुनिक सोयी आहेत, वर्गात किती मुले आहेत, कोणत्या बोर्डाचे शिक्षण आहे, शाळेचा कॅफेटेरिया किती मस्त आहे वगैरे विषयांभोवती त्यांच्या गप्पा घोळत होत्या.
मला मात्र राहून राहून परवाच भेट झालेल्या एका दूरच्या आप्तांनी सांगितलेली आठवण अस्वस्थ करत होती.

आता अतिशय समृद्ध, सुखसंपन्न आयुष्य जगत असणाऱ्या ह्या गृहस्थांचे बालपण व तारुण्य एका लहानशा खेडेगावात गेले. अंगभूत हुशारी व जिद्द यांच्या जोरावर त्यांनी शाळेत कायम उत्कृष्ट गुण मिळवले. ज्ञानलालसा तर होतीच... पण त्या खेड्यात शाळा कॉलेजाची, वाचनालयाची सोय नव्हती. रोज तालुक्याच्या गावी शाळेत जायचे म्हणजे तासा-दोन तासांची पायपीट. तरीही मोठ्या नेटाने शालांत परीक्षा ते उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. आता त्यांना शहरात जाऊन पुढचे शिक्षण घेणे शक्य होणार होते. पण राहायचे कोठे? खायचे काय? रस्त्यावर तर राहणे शक्य नव्हते. डोक्यावर छत आणि किमान एका वेळचे अन्न एवढी जरी सोय झाली तरी त्यांच्या शिक्षणाचा पुढचा मार्ग खुला होणार होता. शेवटी एका नातेवाईकांच्या छोट्याशा घरात रात्रीच्या जेवणाची व अंथरुणाची सोय तरी झाली. दिवसभर ते घराबाहेर राहून कॉलेज करायचे, वाचनालयात किंवा अभ्यासिकेत उशीरापर्यंत बसून पुढील नोटस काढायच्या आणि रात्री मुक्काम गाठायचा असे ते आयुष्य. कष्ट तर पाचवीलाच पुजलेले. पुढे एका जुनाट वाड्याच्या कोपऱ्यातील अंधाऱ्या खोलीत एका शिक्षकांनी त्यांची राहायची फुकट सोय करून दिली. त्याबदल्यात मालकांच्या मुलाची शिकवणी घ्यायची. ते कामही त्यांनी आनंदाने केले. सकाळी मालकांच्या मुलीला शिकवले की फीम्हणून प्यायला धारोष्ण दूध मिळायचे. तेवढाच दिवसभरासाठी पोटाला आधार. त्या वाड्यात वीज नव्हती. मग रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात अभ्यास करायचा.... असे करत करत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. कायम आपली उत्कृष्ट श्रेणी राखली. पुढे परदेशात जाऊन उत्तम नाव केले. खोऱ्याने पैसा कमावला. पण कोठेतरी बालपणीच्या शिक्षणाची ती कसरत, ती आबाळ, करावी लागलेली पायपीट त्यांना त्या समृद्ध आयुष्यातही अस्वस्थ करत होती.
कालांतराने त्यांनी आपल्या गावाच्या रहिवाशांशी आपल्या गावी शाळा सुरू करण्याबद्दल बोलायला सुरुवात केली.
गावात तोपर्यंत तसा विचार कोणीच केलेला नव्हता. हा मुलगा म्हणजे खरे तर गावातील पहिलाच, जो उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला आणि तिथे स्थायिक झाला. बाकीच्या ग्रामस्थांचे शिक्षण म्हणजे ते जेमतेम दहावी किंवा बारावी पास झाले तरी डोक्यावरून पाणी! बहुतेकांनी सातवी - आठवीतच शिक्षणाला रामराम ठोकून पोटापाण्याची वाट धरलेली. अशा वातावरणात शाळा काढायचा उत्साह तसा यथा तथाच होता. परंतु हार न मानता त्या गृहस्थांनी आपले प्रयत्न नेटाने चालू ठेवले. शेवटी गावातील एकाने पुढाकार घेऊन मालकीच्या जमिनीत दोन खोल्या बांधून दिल्या आणि शाळेची सुरुवात झाली.

आज त्या सद्गृहस्थांच्या भक्कम आर्थिक आधारामुळे त्या ठिकाणी शाळेची इमारत उभी आहे. मुलांना दुसऱ्या गावी न जाता आपल्याच गावात शिकायला मिळत आहे. गरीब, कष्टकरी, मजूर कुटुंबांमधील मुलेही तिथे येऊन ज्ञान संपादन करत आहेत.
एखादा माणूस असता तर एवढे करून झाल्यावर शांत बसला असता! पण ह्या गृहस्थांचे तसे नाही.... आपल्याला जे हाल सोसायला लागले, जे कष्ट सहन करायला लागले तसे पुढच्या पिढीला करायला लागू नयेत म्हणून ते आजही त्या शाळेच्या प्रगतीसाठी झटत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे त्या शाळेतील मुलांचा उत्कर्ष कसा होईल ह्यासाठी कार्यरत आहेत. तसेच इतर काही शाळांच्या मुलांसाठीही त्यांचे प्रयत्न चालूच असतात.
एका सुजाण माणसाने आपल्याला मिळालेल्या शिक्षणाची किंमत जाणली. वाचवलेल्या प्रत्येक रुपयातून एक भव्य स्वप्न बघितले. आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाल उज्ज्वल व्हावा, त्यांना आपल्यासारख्या अडीअडचणी, वाईट परिस्थितींचा सामना करावा लागू नये ह्यासाठी आपल्या कष्टाच्या, घामाच्या पैशाला त्यांनी माणसांमध्ये, ज्ञानात गुंतविले. आज त्या गुंतवणुकीची गोड फळे अनेक गरीब कुटुंबांमधील विद्यार्थी चाखत आहेत.

इकडे आमच्या ग्रुपच्या गप्पा रंगात आल्या होत्या.
''आपण सगळेजण कसले सॉल्लिड क्लासेस बुडवायचो, नाही? लेक्चर बुडवून कँटिनमध्ये चकाट्या पिटायच्या मस्त.... '' ग्रुपमध्ये कोणीतरी जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत होते.

मला क्षणभर स्वतःची शरम वाटली. आपल्या आईवडीलांनी कष्टाने मिळवलेल्या पैशाने आपल्या शाळा-कॉलेजांचे खर्च भागले. ते करत असताना त्यांनीही कोठेतरी झळा सोसल्या, कोठेतरी काटकसर केली, स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केले. आपल्याला कधीही कोणत्या शैक्षणिक खर्चासाठी ''नाही'' म्हटले नाही. उलट आपण होऊन वह्या-पुस्तके-शैक्षणिक साहित्याचा वर्षाव केला आपल्यावर! आणि हे सर्व स्वखुशीने, आनंदाने केले त्यांनी! आपल्या मुलांनी उत्तम शिकावे, भरपूर ज्ञान मिळवावे, आयुष्यात यशस्वी व्हावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. पण आपण फक्त परीक्षेपुरता अभ्यास करत राहिलो. ज्ञान संपादन वगैरे बरीच लांबची गोष्ट.... आपल्याला त्या ज्ञानाची किंमतच कधी कळली नाही....अगोदरच्या पिढ्यांनी शिक्षण मिळवण्यासाठी जे हाल सोसले, जे परिश्रम घेतले त्यापैकी आपण काडीनेही सहन केले नाहीत. आज त्यांच्या त्या कष्टांमुळे आपण सुंदर दिवस बघत आहोत. नाहीतर बसलो असतो असेच कोठेतरी अंधारात चाचपडत.... त्यांच्या त्या श्रमांचे ऋण आहे आपल्यावर.... जे फेडायचा आपण यथाशक्ति प्रयत्न करायलाच हवा.... एकवेळ स्वतःसाठी नाही तर त्या उगवत्या ताऱ्यांसाठी. मनात असे अनेक विचार झोके घेत होते.

''गेल्या वर्षी माझ्या मुलीचा वाढदिवस मी एका अनाथाश्रमात साजरा केला. खूप छान वाटलं गं... आणि तेव्हापासून ठरवलं, की आपण दर वर्षी किमान दोन गरजू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची! तू पण करून बघ.... खूप छान वाटतं गं.... '' माझी एक मैत्रीण दुसरीला सांगत होती. माझेही कान त्या संभाषणाच्या दिशेने टवकारले गेले. ती सांगत होती, सुरुवातीची काही वर्षे तिच्या मुलीसाठी तिने वाढदिवसाच्या मोठमोठ्या पार्ट्या दिल्या. पण हळूहळू लक्षात येऊ लागले की हे लोण संपणारे नाही. हौसेला मोल नसते. आणि कितीही करायला गेले तरी ते अपुरेच वाटते. त्यात समाधान नाही. आणि त्या पार्ट्यांतही एक प्रकारचा रटाळपणा येऊ लागला होता. नवीन काही करावे ह्या विचारात असतानाच तिचा एका अनाथाश्रमाशी संबंधित व्यक्तीशी परिचय झाला. त्यांच्या सांगण्यावरून ती एकदा त्या आश्रमाला भेट देऊन आली आणि तेथील मुलांच्या निरागस डोळ्यांमध्ये तिचे हृदय हरवून बसली. पुढे आपल्या लेकीलाही तिथे घेऊन गेल्यावर तिच्या लेकीनेच आपला वाढदिवस तिथे साजरा करायची इच्छा बोलून दाखवली. आणि एका वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली....
कट्ट्यावर शेजारी बसलेल्या आणि हे संभाषण लक्ष देऊन ऐकत असलेल्या एका मित्राने कुतूहलाने ह्या मैत्रिणीकडे इतर तपशिलाची चौकशी करायला सुरुवात केली. बघता बघता सगळेच ऐकू लागले. त्या मैत्रिणीच्या अनुभवाला ऐकल्यावर बाकीच्या लोकांनीही असेच उपक्रम करण्याची इच्छा असल्याचे आवर्जून सांगितले. प्रत्येकालाच आत कोठेतरी ते जाणवत होते. वेगवेगळ्या गावांमध्ये, राज्यांमध्ये विखुरलेल्या व आपापल्या उद्योग-व्यवसायांमध्ये यशाच्या नव्या पायऱ्या चढणाऱ्या आमच्या सहाध्यायींच्या डोक्यात आता आपल्या गावी जाऊन कोणा गरजू विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च करायची योजना सुरू झाली होती.


कॉलेजात लेक्चर्सना अभावानेच आपली हजेरी लावणारे, उंडारण्यात पटाईत असणारे एकेकाळचे उनाड पण आता जबाबदार असणारे विद्यार्थी ज्ञानाचा हा प्रवाह खेळता ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रेरित झाले होते.
लवकरच निरोप घ्यायची वेळ झाली. एकमेकांचे फोन नंबर्स, ईमेल्स इत्यादी टिपून सगळेजण परत निघाले.
निघताना माझ्या मनात विचार होते, आम्हाला कॉलेजात असताना आमच्या शिक्षणाची किंमत कळली नसेल कदाचित. पण आता ती नक्कीच जाणवू लागली आहे. हरकत नाही! झालाय थोडा उशीर... पण अजून करण्यासारखे खूप काही आहे. ही तर सुरुवात आहे.... आपल्याला मिळालेली शिक्षणाची संधी आपण जितक्या जणांना उपलब्ध करून देऊ शकू तितका ज्ञानाचा हा प्रवाह अनेक अंधाऱ्या खोपट्यांमध्ये, चंद्रमौळी झोपड्यांमध्ये पोहोचेल आणि त्या घरातील मुलाबाळांचे आयुष्य बदलू शकेल. आपल्यापासून इतरजण स्फूर्ती घेतील आणि ही मालिका चालू ठेवण्यात त्यांचे योगदान देतील. मिळालेल्या ज्ञानाची किंमत तशी कधीच मोजता येणार नाही.... पण कोणाच्या तरी शिक्षणाची किंमत मोजून त्या ज्ञानाचे नक्कीच उतराई होता येईल.

--- अरुंधती

(हाच लेख तुम्ही http://mfdiwaliank.blogspot.com/2010/10/shikshanachi-kimmat.html येथेही वाचू शकता.)

Sunday, October 24, 2010

अग्निहोत्र : शेतीसाठी समृद्ध वरदान!

मध्यंतरी एका परिचितांच्या ओळखीतील शेतावर जायचा योग आला. हिरवेगार शिवार, डोलणारी पिके, रसरशीत फळे - भाज्या पाहून मन प्रसन्न झाले. शेतमालकांनी आपल्या शेतीत आपण अग्निहोत्राचा दैनंदिन प्रयोग रोज करत असल्याचे व तेव्हापासून पिकाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून सांगितले. ह्या अगोदरही मी अग्निहोत्र कसे करतात, का करतात, त्याचे वातावरणासाठी - शेतीसाठी व आरोग्यासाठी उपयोग इत्यादींविषयीची मार्गदर्शक भाषणे व प्रात्यक्षिके पाहिली होती. परंतु ज्या शेतजमीनीत असे अग्निहोत्र अनेक महिने नित्यनियमाने होत आहे असे शेत बघण्याचा योग बऱ्याच काळानंतर जुळून आला. अग्निहोत्राचा नित्य सराव शेतीसाठी खरोखरीच उपयोगी पडू शकतो हे जाणवले. तेव्हा पासून ही माहिती आपल्या इतर मराठी शेतकरी बांधवांपर्यंत विनासायास कशी नेता येईल ह्यावर माझे विचार मंथन सुरू झाले. आंतरजालावर मराठीत काही माहिती उपलब्ध होते का, हे धुंडाळले. परंतु हाती विशेष काही आले नाही. इंग्रजी व अन्य विदेशी भाषांमध्ये (जर्मन, फ्रेंच, पोलिश इ. ) मात्र विपुल माहिती उपलब्ध आहे. विज्ञान किंवा शेती हा काही माझा प्रांत नव्हे. परंतु तरीही माझ्या अल्पमतीला अनुसरून अग्निहोत्राविषयीची मला मिळालेली व शेतकरी बंधूंसाठी तसेच पर्यावरण प्रेमींसाठी उपयुक्त वाटणारी माहिती आपल्या समोर ठेवत आहे!  (जाणकारांनी ह्या माहितीत भर घातली तर स्वागतच आहे!)

मानवाच्या व जीवसृष्टीच्या इतिहासात सूर्य व अग्नी यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सूर्याने औष्ण्य दिले, प्रकाश, प्राणऊर्जा, अन्न दिले तर अग्नीने भयमुक्त केले, अन्न रांधता येणे शक्य केले व पोषण केले. त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अनुसरून जगातील बहुविध संस्कृतींमध्ये सूर्य व अग्नी वंदनीय मानले गेले असून त्यांना देवत्व बहाल केलेले आढळते. त्यांचा आदरसन्मान, त्यांचे प्रती कृतज्ञता आणि त्यांची उपासना हा त्यामुळे अनेक संस्कृतींचा अविभाज्य भाग न बनला तरच नवल!

भारतात शेती व गोधनाच्या दृष्टीने अग्नी व सूर्य फारच उपयोगी! कदाचित त्यामुळे भारतीय संस्कृतीतही सूर्योपासना व अग्नीपूजा पुरातन कालापासून दिसून येते. ह्या उपासना व पूजांमधील एक भाग म्हणजे अग्निहोत्र. अग्नी व सूर्याची आराधना. प्रजापतीला अभिवादन. बल, पुष्टी, औष्ण्य, ऊर्जा यांची आराधना. अग्निहोत्राची सुरुवात नक्की कोणी, कशी, केव्हा केली याविषयी बरेच संशोधक बरेच काही सांगू शकतील. परंतु त्यापेक्षाही महत्त्वाची आहे ती अग्निहोत्राची शेतीसाठीची उपयुक्तता. भारतातील व भारताबाहेरील विविध विद्यापीठे, संशोधकांनी व कृषी तंत्रज्ञांनी केलेल्या आधुनिक, विज्ञानाधारित संशोधनानुसार अग्निहोत्राचा शेतीला खूप चांगला फायदा होतो हे निष्पन्न झाले आहे. एका शेतीप्रधान देशासाठी असे संशोधन व त्याची उपयुक्तता अमूल्य आहे.



पूर्वी अग्निहोत्र हे परंपरा, रूढींच्या जोखडात अडकले होते. परंतु आताचे त्याचे स्वरूप सर्वसामान्य माणसास अनुसरण्यास व समजण्यास सोपे, सहज झाले आहे. शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आपल्या शेतीसाठी अग्निहोत्र करू शकतात. त्याला कसलेही बंधन नाही. अग्निहोत्र ही एक प्रकारची विज्ञानाधारित, शास्त्रशुद्ध वातावरण-प्रक्रियाच आहे असे म्हणता येईल. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान ह्यांच्या आधारे अग्निहोत्राचे सभोवतालच्या वातावरणावर, पिकांवर, जमिनीच्या कसावर, पाण्यावर होणारे परिणाम अभ्यासू जाता हा प्रकार खूपच लाभदायी व पर्यावरणपूरक आहे हे संशोधकांच्या लक्षात आले आणि सुरू झाली अग्निहोत्राचा पूरक वापर करून कसलेली शेती.

ह्या आधुनिक अग्निहोत्रात काय असते तरी काय?

१. सूर्योदय व सूर्यास्त ह्या दोन वेळांना हे अग्निहोत्र करतात.
२. त्यासाठी लागणारी सामग्री अतिशय कमी खर्चात, शेती व्यवसायात सहज उपलब्ध होणारी, पर्यावरणपूरक असते. अग्निहोत्राचे तांबे धातूचे पिरॅमिड आकारातील पात्र भारतात माफक किमतीत सामान्यतः पूजा भांडार, भांड्यांच्या दुकानात सहज उपलब्ध होऊ शकते.
३. अग्निहोत्राला लागणारा वेळ सकाळ-सायंकाळ मिळून जास्तीत जास्त अर्धा तास, व त्याचे होणारे फायदे मात्र दूरगामी आहेत.
४. सर्व परिवार अग्निहोत्रात सामील होऊ शकतो. त्याला संख्या, जाती, धर्म, लिंग, पंथाचे बंधन नाही.
५. अग्निहोत्र करताना उच्चारण्याचे मंत्र अतिशय सोपे असून परदेशी लोकही ते सहज पाठ करू शकतात.



साहित्य :

१. तांबे धातूचे ठराविक आकाराचे पिरॅमिड पात्र
२. गायीच्या शेणाची गोवरी, गायीचे तूप, हातसडीचा अख्खा तांदूळ (महिनाभरासाठी पावशेर तांदूळ पुरेसा)
३. काडेपेटी
४. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेचे नेमके वेळापत्रक.
५. काटक्या वापरायच्या असल्यास वड, पिंपळ, बेल, उंबर, पळस यांच्या वाळक्या काटक्या.




अग्निहोत्राचा प्रत्यक्ष विधी : 

स्थळ : शेताच्या मध्यात एखादे खोपटे बांधून तिथे हे अग्निहोत्र केल्यास त्याचा उत्तम फायदा होतो.

सूर्याला सन्मुख बसावे. (सकाळी पूर्वेस व सायंकाळी पश्चिमेस तोंड करून) समोर तांब्याच्या पिरॅमिड पात्रात गोवरीचा छोटा तुकडा तळाशी ठेवून त्याच्या भोवती गोवरीचे इतर तुकडे रचत जाणे, ज्यामुळे मध्यात थोडा खळगा तयार होईल. मग एका गोवरीच्या तुकड्याच्या टोकाला थोडे तूप लावून तो आगकाडीने पेटविणे व तो तुकडा अग्निहोत्र पात्रात ठेवणे. अग्निहोत्र प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही मधल्या खळग्यात कापूर वडी ठेवू शकता. नेमक्या सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी गायीच्या तुपात भिजलेले दोन चिमटी तांदूळ (अक्षता) ह्या पेटत्या अग्नीला अर्पण करणे. दोन्ही वेळा भिन्न मंत्र म्हटले जातात. दोन्ही वेळा अग्नीत अक्षता अर्पण केल्यावर ते तांदूळ पूर्णपणे जळेपर्यंत तुम्ही बसले असाल त्याच जागी डोळे मिटून स्थिर, शांत बसू शकता.

१. सूर्योदयाचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र : 

सूर्याय स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) सूर्याय इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥

२. सूर्यास्ताचे वेळी अग्निहोत्र करताना म्हणावयाचा मंत्र : 

अग्नये स्वाहा । (चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ अग्नीत घालणे) अग्नये इदं न मम ॥ प्रजापतये स्वाहा । (अग्नीत चिमूटभर तूपमिश्रित तांदूळ घालणे) प्रजापतये इदं न मम ॥



अग्निहोत्र हे वातावरण, जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी व मानवास आरोग्यदायी असून दोषनिर्मूलनाचे, शुद्धीकरणाचे काम करते असा अभ्यासकांचा दावा आहे. मंत्रांसहित अग्निहोत्राचे परिणाम फक्त पिकावरच नव्हे, तर मानवी आरोग्यावर, मनस्थितीवर सकारात्मक पद्धतीने दिसून आले आहेत. मंत्र म्हणजे मनाला जे तारतात ते. संस्कृत मंत्रांची कंपने/ तरंग व त्यांचा मानवी चेतासंस्थेवरील, जीवसृष्टीवरील सकारात्मक परिणाम ह्यांवर संशोधन चालू आहेच! अग्निहोत्रात म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचाही सभोवतालच्या जीवसृष्टीवर व मानवी आरोग्यावर -स्वास्थ्यावर चांगला परिणाम दिसून आला आहे.

रोज अग्निहोत्र करून जोपासलेल्या, कसलेल्या शेतीचा भारतातील वेगवेगळ्या कृषी संशोधन संस्था, अभ्यासक व भारताबाहेरील तज्ञांनी अभ्यास केल्यावर त्यांनी खालील प्रमाणे निष्कर्ष काढले :

१. अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पोषक वायूंचे प्रमाण परिणामकारक रितीने वाढले. (इथिलीन ऑक्साईड, प्रॉपिलीन ऑक्साईड, फॉर्मॅल्डिहाईड, ब्यूटाप्रोपियोलॅक्टोन) त्या भागातील पॅथोजेनिक बॅक्टेरियाजचे प्रमाण ९६% ने घटले व हवा शुद्ध होण्यास मदत झाली. अग्नीत आहुती घातल्यावर गायीच्या तुपामुळे ऍसिटिलीन तयार होऊन त्यामुळे प्रदूषित हवा शुद्ध होण्यास मदत होते.

२. पिकाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ.

३. कृषी रसायनांच्या फवारणीच्या खर्चात घट.

४. चव, रंग, पोत व पोषणमूल्यांच्या दृष्टीने सरस पीक.

५. अधिक टिकाऊ व निर्यातीस अनुकूल उत्पादन.

६. कमी काळात जास्त पीक. एका वर्षात अधिक वेळा पीक घेऊ शकता.

७. अग्निहोत्रात वापरल्या जाणाऱ्या तुपाची सूक्ष्म स्तरावर प्रक्रिया होऊन त्यामुळे वनस्पतींना हरितद्रव्य उत्पन्न करण्यास मदत मिळते.

८. मधमाश्या अग्निहोत्र केलेल्या क्षेत्रातील पिकाकडे, झाडांकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होताना दिसून आले आहे. त्यामुळे परागसिंचनास मदत होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

९. अग्निहोत्रातील राख घन, द्राव, जैव-रसायनांच्या रूपात किंवा बायोसोल सारख्या स्वरूपात शेतात वापरल्यास पिकाला अधिक पोषण देण्यास, तसेच कीड व रोगांपासून त्यांचा बचाव करण्यास मदत करते असेही दिसून आले आहे.

अग्निहोत्र वापरून केलेल्या शेती/ पिकात खालील प्रमाणे फरक दिसून आला :

टोमॅटो : ( अगोदर, कृषी रसायने वापरून) : आकार - ७ सेंमी, वजन -८५ ग्रॅ., जाडी - १३ सेंमी, चव - बेचव,पोत - निस्तेज, रंग - फिकट लाल  , दर झाडागणिक उत्पादन - १ ते २ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - १२ आठवडे.
टोमॅटो : ( अग्निहोत्र वापरून) :    आकार - १० सेंमी, वजन - १२० ग्रॅ., जाडी - २० सेंमी, चव - चांगली , पोत - टणक , रंग -गडद लाल, ,दर झाडागणिक उत्पादन - ३ ते ४ किलो, लागवडीपासून सुगीचा काळ - ७ आठवडे.

आंबा : (अगोदर, कृषी रसायने न वापरता) : १०,००० किलो प्रती हेक्टर ( ८,९२५ पाऊंडस/ एकर)
(अगोदर, कृषी रसायने - कीटकनाशके व खते वापरून): ३०,००० किलो/ हेक्टर ( २६,७०० पाऊंडस/एकर)
(अग्निहोत्र वापरून) : ८४,००० किलो प्रती हेक्टर ( ७४,८०० पाऊंडस/ एकर)

केळी : 
१. पाचव्या पिढीतील केळीची बाग, फळाचा आकार लहान आणि कमी उत्पादन.
२. बाग फुसॅरियम (Fusarium)  ह्या बुरशीने ७०% ग्रस्त.
३. ४०%  moco Pseudomona Solanace.
४. एका झाडापासून जास्तीत जास्त ६ ते ७ नवीन झाडे तयार.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ८ ते १२ महिने.

चार महिने अग्निहोत्राचा शेतात/ बागांमध्ये नियमित वापर केल्यावर :
१. सर्व बागेचे एकसंध पुनरुज्जीवन.
२. रोग व कीड यांचा अभाव.
३. केळीचे घड आकाराने व वजनाने जास्त मोठे. सरासरी १२० केळी.
४. एका झाडापासून १० ते १२ नव्या झाडांची निर्मिती.
५. लागवडीपासून उत्पादनाचा काळ ६ महिने.

भाताच्या पिकाच्या बाबत, अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत होते का या विषयी बेंगळुरू येथील विवेकानंद योग संशोधन संस्थेने केलेल्या पाहणी व निष्कर्षांबद्दलचा हा दुवा :

अग्निहोत्राने बीज अंकुरित होण्यास मदत
http://nopr.niscair.res.in/bitstream/123456789/9356/1/IJTK%203(3)%20231-239.pdf


तसेच मायक्रो-बायॉलॉजिस्ट व संशोधक यांनी वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग करून अग्निहोत्राची वातावरणासाठी व पिकांसाठीची उपयुक्तता सिद्ध केली आहे. अग्निहोत्र व सूक्ष्म-जीव (मायक्रोब्ज), अग्निहोत्राची राख व पाण्यात विरघळणारी फॉस्फेटस, अग्निहोत्र व द्राक्षे, अग्निहोत्र व व्हॅनिला वनस्पती यांविषयी केलेल्या प्रयोगांमधून त्याचे महत्त्व व उपयुक्तता अधोरेखितच झाली आहे. ह्या प्रयोगांविषयीचा दुवा :

http://www.agnihotra.org/content/scientific-experiments-agnihotra

अग्निहोत्राचे अन्य उपयोग :

१. अनेक मनोकायिक आजारांवर, जुन्या दुखण्यांवर तसेच नशाखोरीतून सुटण्यासाठी पूरक व उपयुक्त.

दुवा : http://www.indianjpsychiatry.org/temp/IndianJPsychiatry293247-2347415_063114.pdf

दुवा : http://www.homa-hof-heiligenberg.de/homa-therapie_eng.html

२. ध्यान, एकाग्रता यांसाठी पोषक.

३. आरोग्यास उपयुक्त, प्रतिकारशक्ती वाढविते, ताण कमी करते, सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी पूरक.

अग्निहोत्र व होम उपचार ( होमा थेरपी) विषयी आंतरजालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्याचा अनेक देशी-विदेशी लोक लाभ घेत आहेत. अग्निहोत्रा विषयीची अनेक संकेतस्थळेही उपलब्ध आहेत.
कर्नाटकातील एका शेतकऱ्याची ही अनुभव गाथा व आपल्या शेतातील अग्निहोत्राच्या प्रयोगानंतर त्याने अनुभवलेले बदल ह्या विषयीचा अजून एक लेख :


अभय मुतालिक देसाई यांचा आत्मनिर्भर शेतीचा शास्त्रीय प्रयोग


http://www.organiser.org/dynamic/modules.php?name=Content&pa=showpage&pid=304&page=10 

श्री. देसाई ह्यांनी आपल्या शेताच्या मध्यावर अग्निहोत्रासाठी छोटेसे खोपटे बांधले. त्याचा उपयोग फक्त अग्निहोत्र करणे व मंत्रोच्चारण करणे एवढ्यासाठीच केला. रोज सूर्योदय व सूर्यास्त समयी अग्निहोत्र केल्याने त्यांना कशा प्रकारे आपल्या शेतीत सुधारणा घडवता आली ह्याचा आढावा त्यांचा लेख घेतो.

हिमाचल प्रदेशातील शेतकर्‍यांनी अग्निहोत्र शेती करण्यास सुरुवात केल्याची ही बातमी : http://www.thaindian.com/newsportal/feature/himachal-pradesh-farmers-adopt-centuries-old-homa-farming-method_100238829.html

यूट्यूबवरही ह्याविषयीच्या ध्वनिचित्रफीती उपलब्ध असून त्या अवश्य पाहाव्यात : 

श्री. रवी वाडेकर, रत्नागिरी ह्यांची मुलाखत


श्री. रमेश तिवारी ह्या उत्तर प्रदेशातील आंबा उत्पादकाची परदेशी वृत्तवाहिनीवर अग्निहोत्र शेतीबद्दलची बातमी


ठाण्याच्या श्री. व्यंकटेश कुलकर्णी या कृषी उत्पादकाची मुलाखत


दक्षिण जर्मनीतील हाल्डेन्होफ अग्निहोत्र शेती


श्री. अभय मुतालिक देसाई, कर्नाटक यांची मुलाखत


श्री. वसंत परांजपे यांची मुलाखत व अग्निहोत्र प्रात्यक्षिक


भारतातील गरीब शेतकऱ्याला परवडणारी, त्याला सहज करता येणारी व अनुभवसिद्ध अशी ही अग्निहोत्राची पद्धती जर आधुनिक शेतकऱ्याने अवलंबली तर परंपरागत ज्ञानाचा व्यवहारी उपयोग करून त्याला आपले व घरादाराचे आयुष्य तर समृद्ध बनवता येईलच, शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते एक फार मोठे योगदान ठरेल. सर्वसामान्य माणसालाही अग्निहोत्र करणे सहज शक्य असून रोज किमान एका वेळी अग्निहोत्र करता आले तरीही ते लाभदायकच आहे!

अग्निहोत्राविषयी अधिक माहितीसाठी : 

तपोवन, मु.पो. : रत्नपिंपरी, तालुका : पारोळा, जि : जळगाव, महाराष्ट्र, भारत

दूरभाष : +९१ २५९७ २३५ २०३, +९१ २५९७ २८६ ०९१.

मोबाईल : श्री. अभय परांजपे : +९१ ९९८१३ ५२४६३.

ईमेल : tapovan3@yahoo.com

वेबसाईट : http://www.tapovan.net/



--- लेखिका : अरुंधती

(माहितीस्रोत : आंतरजाल व अन्य)

Saturday, October 16, 2010

कहाणी गणेशाची - वृक्षसंवर्धनाची!


ऐका देवा गणेशा, तुझी कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे.


एक आटपाट नगर होतं. हिरवीगार झाडी, निसर्गरम्य टेकड्या, नितळ जलाशय आणि स्वच्छ हवेचं त्याला वरदान होतं. आटपाट नगरातले लोक खूप हुशार, शिकलेले, व्यासंगी होते. पोटा-पाण्यासाठी हिंडताना ते बाहेरच्या देशांमध्ये गेले. काही जण तिथेच राहिले, काही परत आले. येताना त्यांनी आपल्याबरोबर छान छान बिया, रोपे आणली. रंगीबेरंगी फुलांची, नक्षीदार पानांची. मायदेशी परतल्यावर त्यांनी मोठ्या हौसेने ती रोपे रुजवली. प्रेमाने त्यांना जोपासले. न्हाऊ-माखू घातले. खतांचा चारा दिला. सूर्यप्रकाशाचा खाऊ दिला. बघता बघता त्या रोपांचे मोठे मोठे देखणे वृक्ष झाले. येणार्‍या जाणार्‍यांचे मन मोहवू लागले. प्रत्येकाला हवेहवेसे वाटू लागले. मग इतर लोकांनीही आधीचे जुने वृक्ष पाडले व ह्या नव्या वृक्षांच्या बिया आपल्या अंगणात, शेतांमध्ये, टेकाडांवर, जलाशयांकाठी आणि रस्त्यांच्या कडेला पेरल्या. त्यांचेही मोठे वृक्ष तयार झाले. वृक्षांना लगडलेल्या रंगीबेरंगी घोसांनी, नक्षीदार पानांनी आटपाट नगर आता अजूनच देखणे दिसू लागले.
पण मग हळूहळू लोकांना फरक जाणवू लागला. त्या देखण्या वृक्षांवर पक्षी फिरकत नव्हते. किडे-मुंग्या-फुलपाखरे-अळ्या, जणू सर्व प्राण्यांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. बघता बघता आटपाट नगरातली पशु-पक्ष्यांची संख्या रोडावली. नव्या परदेशी वृक्षांच्या आजूबाजूची जमीन वैराण होऊ लागली. त्यांच्या छायेत इतर झाडे-झुडूपे उगवेनात. जणू निसर्गदेवतेचा कोपच झाला. भूदेवी नाराज झाली, जलदेवता रुष्ट झाली, वायूदेवता अडून बसली, सूर्यदेवता आग ओकू लागली. आटपाट नगरातले नागरिक चिंतेत पडले. त्यांना काय करावे ते सुचेना. त्यांनी संकटनाशक गणराजांची करुणा भाकली. मनोमन त्यांचे ध्यान केले. ह्या संकटातून बाहेर पडल्यास नेटाने पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प घेतला. भक्तांची तळमळ पाहून गणराय प्रसन्न झाले. त्यांनी नागरिकांना दृष्टांत दिला. ''आजपासून सगळीकडे देशी झाडे लावा. आपल्या मातीतल्या झाडांचे संवर्धन करा. आपल्या देशातील रोपे, बीजांचे जतन करा. दिखाव्याला भुलू नका. आपल्या देशात प्रचंड वनसंपत्ती आहे, तिचे जतन करा. लाकूडफाट्यासाठी, बांधकामासाठी वृक्षतोड करणे, गायराने उध्वस्त करणे थांबवा. वृक्षांना आणि प्राणिमात्रांना आपल्या स्वार्थाचा बळी करू नका. झाडे लावायचा वसा घ्या. उतू नका, मातू नका, दिला वसा टाकू नका. असे सलग पाच वर्षे करा. तुमचा हेतू पूर्ण होईल, सुख पुन्हा दारी येईल.''
आटपाट नगरातील रहिवाशांनी गणपतीबाप्पाच्या सांगण्यानुसार काम करायला सुरुवात केली. तज्ञांचा सल्ला घेऊन सगळीकडे देशी झाडांची लागवड सुरू झाली. मनोभावे त्यांना पाणी घातले. जैविक खताचा खाऊ दिला. सूर्यप्रकाशाचा चारा दिला. थंडीवार्‍यापासून संरक्षण केले. चार-पाच वर्षांमध्ये झाडे छान फोफावली. त्यांना फुले-फळे बहरू लागली. हां हां म्हणता त्यांच्यावर पक्षी विसावू लागले, आपली घरटी बांधू लागले. त्यांच्या किलबिलाटाने सारा परिसर चैतन्यमय झाला. किडे, मुंग्या, फुलपाखरे, गुरे-ढोरे वृक्षांच्या छायेत रमू लागले. भूदेवी प्रसन्न झाली. जलदेवता खळाळून हसली. वायुदेवतेच्या फुंकरीसरशी वृक्ष तालात डोलू लागले. सूर्यदेवता स्नेह बरसू लागली. निसर्गदेवता पुन्हा एकदा आटपाटनगरावर प्रसन्न झाली होती. आटपाटनगरीचे नागरिक मनोमन आनंदले. त्यांनी एकमुखाने गणरायाचा जयजयकार केला व आपल्या संकल्प-सिद्धीसाठी नव्या जोमाने काम करू लागले.
आटपाट नगरीच्या लोकांच्या मनीचा हेतू जसा साध्य झाला, तसा तुमचा-आमचा होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.
(हा लेख मायबोली गणेशोत्सव २०१० साथी मायबोली संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित) 

Saturday, September 11, 2010

कान्ह्याची बासुरी






पावसाच्या आठवांत 
माझा जीव चिंब झाला
निथळत्या अंगणात
गंध दरवळ ओला

तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी वसुंधरा माय
बीजे तृप्त हुंकारली

सृष्टी झाली झाली दंग
गान वृक्षांचे आगळे
साज मोत्यांचे लेऊन
उभे पूजेला ठाकले

असे भिजले गं मन
जशा श्रावणाच्या सरी
काया झाली हलकीशी
निळ्या कान्ह्याची बासुरी....

--- अरुंधती 

(छायाचित्र साभार : विकिपिडिया) 

Thursday, September 02, 2010

दंगल - ए- खास

''ए बच्ची, अंदर जा, अंदर जा....''
माझ्या बालमूर्तीला उद्देशून लॉजचा मॅनेजर खेकसला तशी मी घाबरून त्या जुनाट लॉजच्या लाकडी दरवाज्यातून आत स्वागतकक्षात गेले आणि आईला घट्ट बिलगून बसले. बाहेर जोरजोरात कानडी भाषेतील घोषणा ऐकू येत होत्या. सकाळच्या रम्य, शांत प्रहरी त्या घोषणांचा असंतुष्ट सूर वातावरण ढवळून काढत होता.



गणपतीच्या सुट्टीतले ते सुंदर, सोनेरी दिवस. शाळेच्या सुट्ट्यांचा फायदा घेऊन माझे व धाकट्या बहिणीचे गाठोडे बांधून आई-वडील आम्हाला दक्षिण भारताच्या सफरीसाठी घेऊन गेले होते. मी होते जेमतेम दहा - अकरा वर्षांची तर बहीण आठ वर्षांची! नाहीतरी आमच्या घरी गणपती नसतात, त्यामुळे सुट्टीतील ही मनसोक्त भटकंती आमच्या खास पसंतीची होती. माझ्या वडिलांची प्रवास करतानाची खासियत म्हणजे कोणतीही आगाऊ आरक्षणे न करता सरकारी लाल डब्यातून प्रवास करणे! त्यांच्या मते त्यामुळे जास्त सुटसुटीतपणे आणि आरामात प्रवास करता येतो! कर्नाटकात तेथील सरकारी बसेसमधून प्रवास करत करत आम्ही आता बेळगावात, माझ्या लाडक्या गावात पोचलो होतो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे लवकरात लवकर मुक्कामाला आमच्या नेहमीच्या पै लॉजला जायचे, फ्रेश होऊन, खाऊन-पिऊन मस्तपैकी तण्णावून द्यायची आणि दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा पुण्याला परतीच्या प्रवासाला निघायचे असा साधारण बेत होता.

पहिली माशी शिंकली ते पै हॉटेलच्या आवारातच! तेथील मॅनेजरने नम्रपणे सांगितले की हॉटेलच्या सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे तिथे राहण्यास जागा उपलब्ध नव्हती. आता आली का पंचाईत! एवढ्या वर्षांच्या बेळगावाच्या सफरींमध्ये आम्ही पै एके पै करत राहायचो. इतर कोणती चांगली हॉटेल्स, लॉज वगैरेही ठाऊक नव्हती. गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे असेल कदाचित, पण इतर दोन-तीन ठिकाणीही चौकशी केल्यावर सर्व रूम्स फुल असल्याचे कळाले.

मी व बहीण एव्हाना दमून कुरकुरायला लागलो होतो. विना- आरक्षणाच्या प्रवासाचा शीण तर होताच, शिवाय कडकडून भूकही लागली होती. शेवटी आमची अवस्था बघून तेथील बस स्टॅन्डपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका गल्लीतील जुनाट लॉजमध्ये जागा उपलब्ध आहे असे कळल्यावर वडिलांनी त्या रात्रीचा मुक्काम तिथेच करायचे निश्चित केले. शेवटी एका रात्रीचा तर प्रश्न होता! मुक्कामी पोचून अंघोळी वगैरे उरकेपर्यंतच मी व बहीण जाम पेंगुळलो होतो. जुन्या पध्दतीच्या वाड्याचेच लॉजमध्ये रूपांतर केले असल्यामुळे स्वच्छता, सोयी इत्यादींबाबत सगळाच आनंदीआनंद होता. पण इथे भूक आणि झोप ह्यांपलीकडे पर्वा होती कोणाला? कसेबसे पुढ्यात आलेले अन्न खाल्ले आणि थकलेले देह बिछान्यावर लोटून दिले.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठायला जरा उशीरच झाला! प्रवासाचा शीण चांगलाच बोलत होता! शेवटी पोटात कोकलणार्‍या कावळ्यांच्या जाणीवेने जाग आली. आठ वाजत आले होते. आदल्या दिवशी केलेल्या चौकशीनुसार सकाळी साडेनवाला पुण्याला जाणारी एक एस. टी. बेळगाव स्टॅन्डवरून सुटते असे कळले होते. बस पकडायच्या उद्देशाने घाईघाईतच आवरले आणि सामान बांधून तयार झालो. खालच्या स्वागतकक्षात आमच्या बॅगा, पिशव्या इत्यादी आणून वडिलांनी तिथेच काउंटरजवळ झोपलेल्या मुलाला उठवून चेक- आऊट केले. आम्हाला तिथेच थांबण्याची सूचना करून ते रिक्षा बघण्यासाठी बाहेर गेले.

वस्तुतः एस्. टी. स्टॅन्डच्या जवळची जागा म्हणजे रिक्षांचा सुळसुळाट हवा. पण त्या सकाळी ना रस्त्याने रिक्षा फिरत होत्या, ना नेहमीची वर्दळ होती. लॉजच्या तिरसट मॅनेजरला विचारल्यावर त्याने कन्नडमध्ये काहीतरी अगम्य बडबड केली, जी आम्हाला काहीही झेपली नाही. वडिलांना बाहेर जाऊन दहा मिनिटे कधीच होऊन गेली होती. काहीशा अर्धवट झोपेत, अस्वस्थपणे आम्ही त्यांची स्वागतकक्षातील बाकड्यावर बसून वाट बघत असतानाच बाहेरून घोषणांचे आवाज येऊ लागले. माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना! चुळबुळत, ऊठ-बस करत शेवटी मी आईच्या तीक्ष्ण नजरेतून हळूच सटकले आणि बाहेर रस्त्यावर डोकावले. 
लाल झेंडे घेतलेली बरीच माणसे संचलनात जातो तशी समोरच्या रस्त्यावरून ओळीने घोषणा देत चालत होती. गळ्यात कसल्यातरी पट्ट्या, मळकट कळकट वेष, हातात फलक....  त्यांच्या घोषणा कानडीत असल्यामुळे माझ्या डोक्यावरून जात होत्या. पण हा काही साधासुधा मोर्चा नव्हता, एवढे मात्र त्या लोकांच्या त्वेषावरून कळत होते. तेवढ्यात त्या लॉजच्या मॅनेजरने मला हटकले आणि माझी रवानगी आत झाली.

मी आत येऊन आईला घाबरलेल्या अवस्थेत बाहेरच्या प्रसंगाचे वर्णन करत होते तोच माझे वडील धापा टाकत आत आले.

''रिक्षा मिळाली?'' आईने विचारले. त्यावर वडिलांनी नकारार्थी मान हालवली व धपापत्या स्वरात म्हणाले, ''रिक्षा चालू नाहीएत आज! लवकर चला, आपल्याला एस्. टी. स्टॅन्ड्ला चालत जावं लागणार आहे!'' त्यांच्या स्वरातली काळजी मला तेव्हा उमगली नाही. 

आमच्याकडे दोन सूटकेसेस आणि तीन शोल्डर बॅग्ज होत्या. सामानाने ठासून भरलेल्या. वडिलांनी दोन सूटकेसेस दोन्ही हातात घेतल्या, आईने जड असणारी शोल्डर बॅग घेतली आणि आम्हा दोघी बहिणींकडे वजनाने तशा हलक्या, पण सामानाने भरलेल्या शोल्डर बॅग्ज सांभाळायला दिल्या. आता दहा मिनिटे लेफ्ट राईट करत हा अवजड डोलारा सांभाळत जायला लागणार होते!! त्याला इलाज नव्हता!  

आम्ही लॉजच्या बाहेर पडतो न् पडतो तोच एकदम जोरात आरडाओरडा झाला..... बघतो तो काय, गल्लीच्या एका टोकाला अजून एक लाल झेंडेधारी लोकांचा घोळका जोरजोरात घोषणा देत, हातात दगडधोंडे आणि अजून काय काय घेऊन आमच्याच दिशेने पळत येत होता. आम्ही घाबरून लॉजच्या दिशेने पाहिले तर लॉजचा मॅनेजर दारावरची पत्र्याची शटर्स खाली ओढत होता. आजूबाजूची दुकाने धडाधड बंद होत होती. संकटाचा वास आल्यागत गल्लीतील कुत्रीदेखील माणसांबरोबरच लपायला जागा शोधत होती. काही सेकंदांचाच खेळ, पण बघता बघता दगड भिरभिरू लागले. ''पळा......'' वडील जोरात ओरडले! आमच्या हातातल्या अवजड बॅगा पेलत आम्ही बस स्टॅन्डच्या दिशेने पळू लागलो. आम्ही पुढे, मागे आक्रमक जमाव असा तो सीन होता. दगड भिरभिरत होते, माझे काळीज सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या गतीने धडधडत होते, डोक्यात काहीच शिरत नव्हते, फक्त जीव वाचवून पळायचे आहे एवढेच कळत होते!! पळता पळता बॅगेच्या बंदात पाय अडकून माझी बहीण थोडी धडपडली. तिला सावरून पुन्हा पळायला लागेस्तोवर तो चिडलेला जमाव अजूनच जवळ आला होता. एक दगड तर बॅगेला चाटूनही गेला. खाकी गणवेशातील, हेल्मेट घातलेले पोलिसही आता त्या जमावाच्या पाठीमागे हातातले दंडुके परजत पळत येत होते. 
माझे वडील पुन्हा एकदा गरजले, ''पळा सांगतोय ना, जोरात पळा!!''

अंगाला घामाच्या धारा लागलेल्या..... कानशिले गरम झाली होती.... छाती थाडथाड उडत होती.... पायात गोळे येत होते.....चपला घासून पायाचे तळवे जळत होते.... अंतर संपता संपत नव्हते.... डोळ्यांना समोरचे नीट दिसतही नव्हते! पण आता पळालो नाही तर आपली धडगत नाही ह्याचीही खात्री होती! आमच्या पुढ्यात आमच्यासारखीच काही सैरावैरा धावणारी माणसे होती. बस स्टॅन्डकडे जाणारा तो एकमेव रस्ता असल्यामुळे बाजूच्या गल्लीत वगैरे जाण्याचा प्रश्नच येत नव्हता!
पळत असतानाच समोर एक टोकदार शिंगे असलेली, जमावामुळे बिथरलेली म्हैस आली! तिला चुकवता चुकवता पुन्हा एकदा दगडफेक करणारी माणसे आमच्यापासून काही पावलांच्या अंतरावर....



असे म्हणतात की संतप्त जमावाला माणुसकी नसते! त्यांना फक्त राग, सूड, हिंसा कळते. त्याचे मूर्तिमंत प्रत्यंतर ह्या जमावाकडे बघून येत होते. मागच्या पोलिसांनी लाठीमार चालू केल्यामुळे ते अजूनच बिथरले होते. त्यांच्यापासून दूर पळतानाही मला मागे वळून ते किती अंतरावर आहेत हे बघण्याचा मोह आवरत नव्हता.... तर, मला मागे वळून बघत वेळ व्यर्थ घालवताना पाहून वडील चिडून ''पुढे बघ,'' असे ओरडत होते! सगळा कोलाहल नुसता!!

एस. टी. स्टॅन्ड नजरेच्या टप्प्यात आला मात्र, आणि थकलेल्या पायांची गती आपसूक वाढली. अजून काही पावले, आणि आमची दगडफेकीतून तात्पुरती का होईना, सुटका होणार होती! हातातले सामान कसेबसे सावरत, ठेचकाळत, धडपडत आम्ही एकदाचे एस टी स्टॅन्डच्या आत घुसलो तेव्हा दगडफेक करणारा जमाव बर्‍यापैकी मागे पडला होता. आता पुढची काही मिनिटे तरी धोका नव्हता. काही क्षण त्या सुटकेच्या भावनेत सुन्न मनाने उभे असतानाच वडील पुन्हा एकदा ओरडले, ''तिसऱ्या नंबरची बस..... धावा!! ''
आगारात समोरच उभी असलेली ती बस आटोकाट भरून ड्रायव्हरच्या प्रतीक्षेत उभी होती. टपावर सामानाची आणि बसमध्ये प्रवाशांची एकच गर्दी होती! पण ती बस व्हाया पुणे जाणारी होती. अधेमधे एखादा-दुसरा थांबा, आरक्षण नसल्यामुळे उभ्याने करायला लागणारा गर्दीतला प्रवास ह्या कशाकशाचा विचार न करता आम्ही तिरासारखे गाडीत घुसलो! मिळेल त्या जागेवर बॅगा ठेवल्या आणि धापा टाकत, श्वास सावरत, घाम पुसत बस सुरू व्हायची वाट पाहू लागलो. दोनच मिनिटांत बसचालक आला आणि प्रवाशांनी दुथडी भरून वाहत असलेली ती  बस डचमळत एकदाची रस्त्याला लागली. 

पुढचा अर्धा तास आम्ही कोणीही एकमेकांशी बोललो नाही. कधी नव्हे ते इतके जीव खाऊन पळाल्यामुळे पोटात प्रचंड दुखत होते..... छातीची धडधड अजून थांबली नव्हती.... पळताना उशीर झाला असता तर त्या संतप्त जमावाच्या हाती आपले काय झाले असते ही कल्पनाच करवत नव्हती..... त्या संकटाच्या तुलनेत त्यानंतर उभ्याने करायला लागलेला बसचा प्रवास कस्पटासमान होता. बसच्या खिडकीतून आत येणारी अस्पष्ट वाऱ्याची झुळूक घामट हवेतही शरीराला आणि मनाला आल्हाद देत होती. आपण सुरक्षित आहोत, हातीपायी धड आहोत आणि एका जीवघेण्या परिस्थितीतून सुटून आपल्या घरी परत चाललो आहोत ह्याचेच मनाला हायसे वाटत होते! 

दंगल, दंगल म्हणजे काय असते ह्याचा माझ्या आयुष्यातील तो एक अविस्मरणीय अनुभव होता! संतप्त, चिडलेला, आक्रमक जमाव इतक्या जवळून बघायला मिळेल, दगडफेकीचा -लाठीमारीचा असा अनुभव मिळेल असे आयुष्यात वाटले नव्हते! आणि हे सगळे अनुभवूनही आम्ही सर्वजण हातीपायी धड, सुरक्षित होतो हेच एक नवल होते! त्या विस्मयाला उराशी बाळगत आणि दंगलीच्या त्या जीवघेण्या आठवणीला मनातून दूर झटकतच आम्ही पुण्याला घरी परतलो.     

-- अरुंधती

Saturday, August 07, 2010

पॅलेस, कोर्टकेस, सुवर्णमोहोरा आणि मी

"आल्या का गं मॅडम?'' कोर्टरूमच्या आतून माझ्या मैत्रिणीने खुणेनेच विचारलं.
माझी मुंडी तिसर्‍यांदा नकारार्थी हालताना बघून तिने चेहरा वाकडा केला आणि कोर्टरूमच्या पुढील बाजूची तिची खड्या पारशाची पोझ घेत पुन्हा एकदा आमच्या दाव्याचा क्रमांक साधारण कधी, किती वाजता येईल याची तेथील लिपिकास विचारणा करू लागली. 
वेळ दुपारची. दिवस पावसाळ्याचे. कोर्टाच्या ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या कोर्टरूम्समध्ये ओलसर दमट हवेबरोबर पावसाळी आभाळामुळे आज जरा जास्तच अंधार दाटला होता. मधूनच सतावणार्‍या, गुणगुणणार्‍या माशांना संथ लयीत गरगरणारे पंखे अजिबात उडवून लावू न शकल्याने त्या मला आजही नेहमीसारख्याच छळत होत्या. पण आज माझे ह्या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष नव्हते. कोर्टरूममध्ये आज पक्षकारांची जास्त गर्दी नव्हती. तरीही आतील मोकळी बाकडी मला जरा वेळ टेकण्यासाठी खुणावत नव्हती. त्याचे कारणही तसेच होते. 

आज आमच्या मॅडमची, म्हणजे वकील बाईंची एका खास केसची तारीख होती. आणि थोड्याच वेळात वकील बाई त्यांच्या भारताच्या राजकारणातील विख्यात पक्षकाराच्या तितक्याच जगद्विख्यात मातोश्रींबरोबर कोर्टरूममध्ये हजर होणार होत्या. माझी नेमणूक आत कोर्टरूममध्ये त्यांच्या येण्याची वर्दी देण्याच्या कामी झाली होती. त्यामुळे मी आपली कोर्टरूमच्या बाहेरच्या पॅसेजामध्ये एका पायावरून दुसर्‍या पायावर करत त्यांची अधीरपणे वाट बघत होते. 

ह्या आज येणाऱ्या पक्षकार मला आतापर्यंत टी. व्ही., वर्तमानपत्रे, मासिके इत्यादींतून माहिती व छायाचित्रांच्या रूपात भेटलेल्या. राजघराण्याची परंपरा, एकेकाळचे बलाढ्य संस्थान, शेकडो वर्षांचा शौर्याचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर काळात उचललेली प्रगतीची व विकासाची पावले आणि त्या जोडीला असलेले कर्तृत्ववान, तेजस्वी व्यक्तिमत्त्व! शिवाय भारताच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या ह्या राजस्त्री प्रत्यक्षात कशा दिसत असतील, बोलत असतील ह्याबद्दल नकळत माझ्या मनात खूप उत्सुकता दाटली होती. खरे सांगायचे तर मी त्यांना प्रत्यक्षात भेटणार आहे ह्यावर विश्वासच बसत नव्हता. पण वास्तवातील जगात कधी कधी असे योगही जुळून येऊ शकतात! आम्ही विद्यार्थीदशेत करायच्या सक्तीच्या इंटर्नशिपसाठी आमच्या वकील मॅडमकडे चार-सहा महिन्यांसाठी रुजू होतो काय, ह्याच दरम्यान त्यांच्या अखत्यारीत असलेल्या ह्या ''हाय-प्रोफाइल''केसची सुनावणीची तारीख पडते काय, आणि आमच्या वकील मॅडम आम्हा दोघी मैत्रिणींना त्या केसच्या सुनावणीस हजर राहण्याची परवानगी देतात काय.... सगळेच गमतीशीर! पण आयुष्यात असेही योगायोग येऊ शकतात यावर विश्वास ठेवायला लावणाराच तो दिवस होता! 


''आल्या का गं मॅडम?'' मैत्रिणीने पुन्हा एकदा तिच्या आतल्या पोझिशनवरून विचारले. मी पॅसेजच्या दिशेने नजर टाकली तर खरेच आमच्या वकील मॅडम एका देखण्या, वृद्ध बाईंबरोबर येताना दिसल्या. मी लगेच आत वर्दी दिली आणि त्यांना रिसीव्ह करायला सज्ज झाले. त्या बाईंच्या मागोमाग थोडे अंतर राखून अजून दोन तीन सुटाबुटातील माणसे चालत होती. बहुधा त्यांचे सेक्रेटरी व शरीररक्षक असावेत. त्या समोर आल्यावर मी थोडे हसून आमच्या मॅडमच्या 'सर्व व्यवस्थित?'च्या खुणेला नजरेनेच प्रतिसाद दिला आणि त्या दोघींबरोबर आत शिरले. थोड्या वेळातच त्या बाई साक्षीदाराच्या कठड्यात उभ्या राहिल्या. त्यांना तत्परतेने कोणीतरी बसायला खुर्ची आणून दिली. पण त्या उभ्याच होत्या. अंगावर तलम पांढरी शुभ्र कशीदाकाम केलेली उंची साडी, दोन्ही खांद्यांवरून व डोक्यावरून ओझरता पदर, कानात व हातात लखलखणारे हिरे, गळ्यात मोत्याचा सर आणि पायात मॅचिंग उंच टाचांच्या चपला! त्यांची पर्स त्यांचा असिस्टंट सांभाळत होता. वृद्धत्वातही आपले गोरे गुलाबी सौंदर्य, मृदू तेजस्वी कांती आणि चेहर्‍यावरचे सात्त्विक परंतु राजबिंडे भाव सांभाळणार्‍या त्या स्त्रीकडे मी मोठ्या कुतूहलाने बघत होते. त्या मंद हास्यामागे काय विचार चालले असतील, कोणत्या चिंता दडलेल्या असतील यांचा अदमास घेत होते. इस्टेट, प्रॉपर्टीसंबंधीच्या आणि कौटुंबिक कलहाचे - मतभेदांचे प्रतिबिंब दाखवणार्‍या कोर्ट केसेसमध्ये अनेकदा आढळून येणार्‍या टेन्शनचा लवलेशही त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नव्हता.   सौम्य शब्दांमध्ये, हळू आवाजात त्यांनी वकिलांनी व कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. आमच्या वकील मॅडमने त्यांची साक्ष - उलटतपासणी घेतली आणि थोड्याच वेळात त्यांचे तेथील काम संपले. कोर्टरूममधून निघताना मॅडमने त्यांची आम्हा दोघी ज्युनिअर्सशी ओळख करून दिली. त्यांनी मान हालवून आमच्याकडे बघत हसून आमचे अभिवादन स्वीकारले आणि आपल्या असिस्टंटसोबत आमच्या मॅडमशी बोलत बाहेर जाऊ लागल्या. अर्थात आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्याची परवानगी नव्हती! ज्युनिअरशिपचे काही संकेत पाळावेच लागतात ना! शिवाय आत कोर्टरूममध्ये लिपिकाचे डोके खाण्याची जबाबदारी आमच्यावरच असल्याने आम्ही मुकाट तिथेच थांबलो, पण जरा चुटपुटतच!   

----------------------------------------------------------------------------------------

''परवा मॅडम कसल्या कडक दिसत होत्या, नै? एकदम टॉप टू टो मॅचिंग!!'' माझ्या मैत्रिणीच्या उद्गारांसरशी मी हातातल्या कागदांच्या चळतीतून डोके वर काढले. आम्ही वकील मॅडमच्या घरातील ऑफिसमध्ये खाली कार्पेटवर फतकल मारून बसलो होतो. मॅडम रात्री साडेसात-आठ वाजताच वरती त्यांच्या फ्लॅटमध्ये निघून गेल्या होत्या. आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये नऊ वाजेपर्यंत बसायची परवानगी देऊन! हो, कारण गेले दोन दिवस आम्ही त्यांना ''आम्हाला 'त्या' केसची कागदपत्रे दाखवा ना मॅडम!! '' म्हणून पुरते छळले होते.... त्याचा परिणाम म्हणून की काय, त्यांनी शेवटी कंटाळून कागदपत्रांची एक मोठीच्या मोठी चळत पाहण्याची परवानगी आम्हाला देऊ केली होती. अर्थातच त्या हाय प्रोफाइल केसचे महत्त्वाचे तपशील त्यात नव्हते! परंतु ज्या प्रॉपर्टीज, इस्टेटीवरून ती केस कोर्टात दाखल झाली होती त्या प्रॉपर्टीज व त्या राजघराण्याच्या भारतात असलेल्या विविध जमिनी, महाल, इमारती, जडजवाहीर इत्यादींची भली मोठी जंत्री त्या कागदपत्रांमध्ये होती. मग काय, जणू खजिनाच हाती लागल्याच्या थाटात आम्ही तेव्हा बऱ्यापैकी गोपनीय असलेली ती माहिती अधाश्यासारखी वाचून काढत होतो.

''मला त्या बाईंचे कानातले हिऱ्याचे टॉप्स फार आवडले! कसले लखलखत होते!!'' इति मी. हो, खोटं कशाला बोलू, त्या रात्री स्वप्नात मला ते लखलखणारे तेजस्वी हिरेच दिसत होते!

''हो, परवापासून बघते आहे, तू सारखी त्या बाईंच्या पेहरावाचीच स्तुती करते आहेस! आपल्या मॅडमदेखील त्या दिवशी कित्ती मस्त मॅचिंग करून आल्या होत्या हे मी चौथ्यांदा बोलते आहे... पण तुझं लक्षच नसतं! '' मैत्रीण फणकारली.

''अगं हो गं, कळलं मला! ए, तू त्या पॅलेसचं वर्णन वाचलंस का गं? समुद्राच्या किनाऱ्यावर असा पॅलेस.... कसलं सहही वाटत असेल ना तिथे? मी काही वर्षांपूर्वी त्या पॅलेसचे एका मासिकात फोटो पाहिले होते. काय सॉल्लिड आहे ना? '' मी अजून पॅलेसेस, महाल, प्रासादांच्याच दुनियेत होते.

''हो तर, आणि ही बघ, माझ्या हातातली ही यादी.... सोन्याचे, हिरे-पाचू-माणिक-पोवळ्याच्या दागिन्यांची वर्णनं वाच जरा.... डोळे फिरताहेत नुसती वर्णनं वाचून.... प्रत्यक्षात काय दिसत असतील!!! '' मैत्रिणीने हातातली कागदांची चळत पुढे केली. 

पुढची काही मिनिटे आम्ही अशाच हातातली कागदपत्रे चाळण्यात मग्न होतो. त्या यादीत त्यांच्या घराण्यातील पारंपारिक जुन्या दागदागिन्यांचीही तपशीलवार वर्णने होती. ती भावनाशून्य, तंत्रशुद्ध, निर्विकार वर्णने वाचतानाही माझ्या नजरेसमोर त्या वस्तू प्रत्यक्षात कशा दिसत असतील याच्या विविध शक्यता तरळत होत्या.

''ए, तू खरं त्या बाईंशी थोडं बोलायला हवं होतंस....'' माझी तंद्री भंग करत मैत्रिणीने मला ढोसले. ''ती तू मला एकदा सांगितलेली त्यांच्या घराण्यातील सासूबाईंची आणि तुझ्या पणजोबांची गोष्ट त्या बाईंच्या कानावर घालायला हवी होतीस!'' मैत्रिणीच्या ह्या उद्गारांसरशी मी तिच्याकडे ''वेड लागलं नाही ना तुला? '' अशा आविर्भावात पाहिल्यावर ती थोडा वेळ शांत बसली. मग पुन्हा फुसफुसली, ''सांग ना ती गोष्ट परत! ''

''हं, '' मी निःश्वास सोडला. ''त्यांना माहीतच असेल गं ती गोष्ट! मी काय वेगळं सांगणार? हां, त्या पणजोबांची मी पणती आहे एवढं तरी सांगता आलं असतं.... पण तितका वेळ मिळायला तर पाहिजे ना त्यांच्याशी बोलायला! इथे आपल्याला त्यांच्याशी एक वाक्य बोलायचीही चोरी होती!! '' मैत्रिणीने माझ्याकडे ''यह नही सुधरेगी,'' सदृश भाव चेहऱ्यांवर आणून खेदाने पाहिले! तिच्या मते अशी संधी मागून मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते. ''गोष्ट सांगते आहेस ना? '' तिने पुन्हा एकदा ढोसले. 

''हं, ऐक. माझ्या पणजोबांनी, म्हणजे आजीच्या वडीलांनी एकदा कोंकणात एका चिमुरड्या परकरी मुलीला पायात आपट्याच्या पानांचे तोडे घालून खेळताना पाहिलं. माझे पणजोबा आपले कोंकणातले साधेसुधे भिक्षुकी करणारे कुडमुडे ज्योतिषी! थोडीफार शेती, भिक्षुकी आणि ज्योतिषाच्या आधारावर ते स्वतःचे घर चालवायचे. तर असेच एक दिवस ही मुलगी त्यांना खेळताना दिसली. त्यांनी त्या मुलीची लक्षणे पाहून तिच्या घरच्यांना सांगितले की भविष्यात ही मुलगी राज्ञीपद भूषवेल. त्या लोकांचा विश्वास बसला की नाही कोणास ठाऊक! पण खरोखरीच पुढे काही वर्षांनी त्या मुलीला राजघराण्यातून मागणी आली आणि ती राणी झाली. मात्र ही गोष्ट इथेच संपत नाही.... '' मी बोलण्यात जरा उसंत घेतली.



''मग, पुढे? '' मैत्रिणीचा उत्सुक स्वर.

''पुढे काय, माझ्या पणजोबांना आपण असे कोण्या मुलीचे भविष्य सांगितले होते ह्याचाही विसर पडला होता. परंतु त्या मुलीच्या घरचे लोक ही गोष्ट लक्षात ठेवून होते. तिचे राजघराण्यात लग्न ठरल्याबरोबर माझ्या पणजोबांना त्या लग्नकार्याला उपस्थित राहण्याचे पद्धतशीर सन्मानपूर्वक आमंत्रण करण्यात आले. एवढेच नव्हे तर कोंकणातल्या त्यांच्या गावापासून त्या संस्थानाच्या राजधानीपर्यंतच्या लांबच्या प्रवासाची सर्व व्यवस्थाही राजघराण्यातर्फे करण्यात आली. पणजोबांना तिथे लग्नाचे सर्व विधी, उत्सव पार पडेपर्यंत आठ दिवस मोठ्या आदरातिथ्याने ठेवले गेले. माझे पणजोबा पडले अगदी साधे, बेताच्या परिस्थितीतले गृहस्थ! त्यांच्याकडे तिकडच्या थंडीसाठी आवश्यक गरम कपडेही नव्हते! मग त्यांच्यासाठी तिथे खास शिंपी बोलावून त्यांच्या मापाच्या गरम कपड्यांची सोय केली गेली, त्यांना पांघरायला मऊ, उबदार रजया दिल्या गेल्या. अगदी परत निघताना त्यांना मानाने लोटा भरून सुवर्णमोहोरा देऊ केल्या गेल्या. पण पणजोबा स्वभावाने अगदी निरिच्छ, साधेसुधे होते. त्यांना विलक्षण संकोच वाटला. ब्राह्मणाला काय करायचंय एवढं सोनं? असा सवाल करून शेवटी त्यातील मूठभर मोहोरा त्यांनी राजघराण्याच्या आग्रहाचा मान राखायचा म्हणून घेतल्या. रजया मात्र आपण नक्की घेऊन जाणार, फार उपयोगी पडतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. आणि त्या रजया व सुवर्णमोहोरा घेऊन ते परत आपल्या कोंकणातील घरी परतले. पुढे त्यांच्या अकाली देहावसानानंतर परिस्थितीवश त्यातील अनेक मोहोरा उदरनिर्वाहास्तव खर्च झाल्या. परंतु काही मोहोरा माझ्या आजीला वाटणीत मिळाल्या, तर काही आजीच्या मोठ्या बंधूंना. त्या बंधूंच्या सुनेने सोन्याच्या त्या जाड मोहोरेला वळे जोडून त्याची अंगठीच बनवून घेतली. आमच्याकडच्या सुवर्णमोहोरा आजीने १९६१ च्या पानशेतच्या पुरात सर्व संसार-घरदार नष्ट झाल्यावर मोडल्या आणि त्यातून पुढचे विश्व उभे करण्यास हातभार लावला. अशा प्रकारे आमची सुवर्णमोहोरांची कहाणी सुफळ संपूर्ण झाली!! हं, टाका आता दक्षिणा!'' मी मैत्रिणीला चिडवले.  

''हम्म्म! पण तुझ्या पणजोबांनी ते सगळे सोने घेतले असते तर गं??? '' माझी मैत्रीण स्वप्नाळू आवाजात उद्गारली.

''तर? तर आज त्या राजकारणी मायलेकांमध्ये जशी इस्टेटीवरून भांडणे, कोर्टकज्जे चाललेत ना, तसेच आमच्याकडेही झाले असते! एक लक्षात ठेव! ह्या लोकांना असा आयता, पिढीजात, बिनकष्टाचा पैसा पचत असेल, पण आपल्याला नाही पचत! आणि अशा पैशाला वाटा फुटतातच.... बघच तू! ''

''होsss की! म्हणूनच की गं बाई हे गर्भश्रीमंत लोक इतके ऐषोआरामात राहतात, सगळीकडे विमानाने नाहीतर महागड्या गाड्यांमधून प्रवास करतात, पॅलेसमध्ये राहतात.... कसेबसे हिऱ्यापाचूंचे दागिने घालतात! काय बाई, किती ते कष्ट!'' मैत्रिणीने वेडावून दाखवले. 

''ए गप्प गं, त्यांना काय कमी टेन्शन्स असतात का! त्यांना या सगळ्या सुखांची किंमतही तेवढीच मोजावी लागते बरं! मी गॅरंटीने सांगते, रात्री झोप यायला गोळी घ्यायला लागत असणार ह्यांना! आता आपल्याकडच्या या केसचेच बघ ना! कसला वैताग येत असेल ना.... '' माझी मुक्ताफळे.

''ह्यँ! तसलं काही नसतं! त्यांना सवय असते अशा टेन्शन्सची! आपली ही भिक्कार प्रवृत्तीच आपल्याला नडते.... कायम कष्टाच्या, घामाच्या पैशाला नको एवढे महत्त्व देऊन, त्याच्या बाता करून करून ना आपल्या वाडवडिलांनी पार वाट लावली आहे आपली! अरे, आयता पैसा मिळाला तो लेने का, क्यूं - काय को वगैरा नही पूंछने का! पैसा काळा आहे का पांढरा, कोणाला काय पडलंय त्याचं.... मस्त राहायचं, ऐष करायची.... '' मैत्रिणीचे नेहमीचे डायलॉग्ज सुरू झाले होते. त्यांना थांबवायचा एकच उपाय होता.

''मला खूप भूक लागली आहे, '' मी घड्याळात डोकावत कुरकुरले. रात्रीचे नऊ कधीच वाजून गेले होते. बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती. मॅडमचे घर शहराच्या शांत, झाडीझुडुपांच्या रस्त्यावर असल्याने इथे त्या पावसातही रातकिड्यांची किरकिर व्यवस्थित ऐकू येत होती.

''ए, आज मस्त चायनीज खायचं का? मला मस्त गरमागरम सूप प्यायचंय! '' मैत्रिणीचे डोळे उत्साहाने लकाकले. हुश्श! सध्यापुरता तरी आयता/काळा पैसा आणि घामाचा पैसा यावरून आमचा होणारा नित्य प्रेमळ संवाद टळला होता. 

''चालेल, पण पैसे आहेत का तेवढे? माझ्याकडे शंभराची नोट निघेल, '' इति मी.

''अरे, काळजी नही करने का! कालच बाबांच्या खिशातून मी शंभर ढापलेत.... आणि माझ्या पर्समध्ये असतील अजून साठ-सत्तर रुपये. आजचं आपलं चायनीज खाणं नक्की बसेल त्यात.''

ऑफिसमधील सर्व दिवे, पंखे मालवून, ऑफिस बंद करून आम्ही त्याची चावी मॅडमच्या घरी पोचवली आणि पॅलेसच्या गर्भश्रीमंत स्वप्नांमधून कष्टाने बाहेर पडत पोटात कोकलणाऱ्या कावळ्यांना शांत करण्यासाठी आमच्या नेहमीच्या चायनीज रेस्टॉरंटकडे मोर्चा वळवला. 

--- अरुंधती