Wednesday, November 18, 2009

बीटी चा बडगा


कोंकणात लहान मुलांना हमखास सांगण्यात येणारी एक मजेशीर गोष्ट माझी आजी आम्हां सर्व नातवंडांना रात्री सांगायची.

गोष्टीतला गरीब शेतकरी घरात भाजी नसते, म्हणून बायकोच्या सांगण्यावरून गावातल्या सधन माणसाच्या वाडीवर लपत-छपत जातो. तिथे गेल्यावर वाडीतून भाजी चोरायचे त्याला येते दडपण! मग तो जणू त्या वाडीशीच संवाद साधत असल्याप्रमाणे तिला भाजी नेण्याची परवानगी विचारतो आणि स्वतःच वाडीच्या वतीने उत्तरेही देतो.... त्यांचा हा मजेशीर संवाद आजी रंगवून रंगवून सांगायची.... "वाडी गं बाई वाडी.... " "काय म्हणतोस रे फुल्या तरवाडी? " (फुल्या तरवाडी हे शेतकऱ्याचे नाव) "वांगी नेऊ का गं, दोन-चार? " "आरं, ने की धा बारा... " पुढे अनेक वर्षांनी ही गोष्ट विशेष लक्षात राहण्याची अनेक कारणे असली तरी त्यातील त्या गरीब शेतकऱ्याची असहाय अवस्था आणि वांग्यांच्या चोरीसाठी त्याने स्वतःची घातलेली समजूत कोठेतरी मनास स्पर्शून गेली. सध्या बी. टी. वांगी प्रकरण गाजत आहे. निसर्गाच्या नियमांना धाब्यावर बसवून अल्पकालीन फायद्यांसाठी दीर्घ मुदतीचे नुकसान दर्शवणारी बी. टी. वांगी सरकारकडून हिरव्या कंदिलाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक पर्यावरण अभ्यासकांनी, कृषी वैज्ञानिकांनी बी. टी. वांग्यांना भारतात आणण्यासाठी स्पष्ट विरोध केला आहे. तरीही वांग्याच्या गुणसूत्रांमध्ये अनैसर्गिक बदल घडवून आणून त्याद्वारे आर्थिक फायदा घडवून आणण्याचा ह्या वांग्यांचा उदो उदो करणाऱ्या कंपन्या व अधिकाऱ्यांचा दावा कितपत योग्य आहे यावर भारतात अजूनही नीट संशोधन झालेले नाही. बाकीच्या अनेक देशांत गुणसूत्रांमध्ये अनैसर्गिक बदल घडवून अन्नोत्पादन करण्यास कडक बंदी आहे. परंतु भारतातील काही अधिकारी मंडळी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ज्या देशांमध्ये असे अन्नपदार्थ विकले व उत्पन्न केले जातात तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या गेल्या काही वर्षांत निर्माण झाल्या आहेत. असे असताना बी. टी. चा अट्टाहास भारतात का? ह्यापूर्वी भारतात बीटी कापसाचे उत्पादन यशस्वी झाले आहे असा युक्तिवाद काही मंडळी करतात. परंतु कोठे कापूस आणि कोठे लोकांच्या पोटात जाणारी, गोरगरीबांना परवडणारी, प्रचंड खपाची वांग्यासारखी भाजी!! बी. टी. वांग्यांचे तब्येतीवर काही संभाव्य परिणाम असे सांगितले जातात : १. प्रतिकारशक्ती कमी होणे २. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रोग्यांना जास्त धोका ३. एलर्जीज ४. यकृत, मूत्रपिंडांचे आजार असणाऱ्यांना हानीकारक तरीही हे सर्व अल्पकाळात दिसून येणारे परिणाम आहेत. काही अभ्यासक याहीपुढे जाऊन सांगतात की दीर्घकाळात अशा अन्नामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा संभव आहे. असे असताना विषाची परीक्षा कशाला? महिकोसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीने जी. एम. तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बी. टी. वांग्यांचे बियाणे आपल्याला विकता यावे म्हणून मोठ्या नेटाने रेटा लावला आहे. परंतु जर व्यावसायिक दृष्ट्या या वांग्यांचे उत्पादन करण्याची परवानगी मिळाली तर गेली अनेक शतके भारतात उपलब्ध असलेल्या देशी प्रजातीच्या वांग्यांवर गदा येणार आहे. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती आहे. शिवाय ज्या रोग, किडींवर उपाय म्हणून बीटी चा गवगवा केला जात आहे त्या रोगांवर सेंद्रीय शेती पद्धतीत उपाय आहेत. ही बी. टी. वांगी बाजारात आली तर ती इतर देशी वांग्यांपासून वेगळी ओळखता येणे अशक्य आहे, एवढे त्यांच्या रंगरूपात साधर्म्य आहे! हे सर्व वाचनात आले मात्र, आणि मी अस्वस्थ झाले!! उगीचच लहानपणीच्या ऐकलेल्या त्या कथेतील भाबडा, गरीब फुल्या तरवाडी आठवला. ती वांग्याचे पीक असणारी वाडी डोळ्यांसमोर आली. त्याच्या घरातील भुकेली लेकरे, अस्वस्थ माय आणि आजही आपल्या खपाटलेल्या पोटाला चिमटा काढून किडूकमिडूक शेतीत आपल्या कुटुंबाची कशीबशी गुजराण करणारा अडाणी शेतकरी यांच्यामध्ये मनात तुलना सुरू झाली. फक्त एकच गोष्ट जाणवली : कथेतील फुल्या तरवाडीच्या परिस्थितीविषयी आपण काहीही करू शकत नाही. पण आजच्या शेतकऱ्याची, गरीब माणसाची फसवणूक न होऊ देणे आपल्या हाती आहे. चूक घडण्याअगोदरच जर सावरता आले तर त्यातून आपल्या देशाचेच भले होणार आहे. आता गरज आहे ती शास्त्रशुद्ध, निःपक्षपाती, पारदर्शी व प्रदीर्घ संशोधनाची, व त्या संशोधनाचे निष्कर्ष जनताजनार्दनासमोर पोहोचत नाहीत तोवर बीटी वांग्यांसारख्या कोणत्याही अनैसर्गिक उत्पादनाला भारतात सक्त मज्जाव करण्याची!
--- अरुंधती

4 comments:

  1. एकंदरीतच वांगे वातूळ त्यात मूत्रपिंडावर परिणाम करते हे आपण वारंवार ऐकतोच. पण आता हा तर मोठा घोळ दिसतोय. इतके दुष्परिणाम दिसत-कळत असूनही पुन्हा तेच माथी मारायचा आग्रह म्हणजे...शिवाय ती ओळखणेही अशक्य आहे..:(

    इतकी महत्वाची माहिती निदर्शनास आणलीस, आभार.:)

    ReplyDelete
  2. आपण सर्वांनीच 'चकाकते ते सर्वच सोने नसते' ही उक्ती लक्षात ठेवण्याची गरज आहे. तुमच्या मोकळ्या प्रतिक्रियेबद्दल आभार! :-)

    ReplyDelete
  3. अखेर नको तेच झालं. बीटी वांगे निवडुन आलं :(

    ReplyDelete
  4. १५ फेब्रुवारी पर्यंत निर्णय होईल म्हणतात. पण राजकारण्यांनी आधीच कौलाचे सुतोवाच केले आहे!

    ReplyDelete