(छायाचित्र सौजन्य: विकिपीडिया)
''दीपक, खाली ये रे! '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद.
दोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर! ''
दीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो! जरा थांबा! ''
पुन्हा पाच मिनिटे तशीच जातात.
''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती! ''
रिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते.
समोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते. सकाळी सात-साडेसातच्या सुमारास आमच्या गल्लीत असेच दोन-तीन रिक्षाकाका आपापल्या चिमुकल्या प्रवाशांना त्यांच्या घरातून शाळेत नेण्यासाठी येत असतात. कधी तर त्यांच्या रिक्षाचे इंजिन तसेच चालू असते. सकाळी सकाळी तो पटर्र पटर्र आवाज ऐकला की खरे तर माझ्या मस्तकात कळ जाते. पण त्याचबरोबर त्या रिक्षातल्या चिटकुऱ्या पोरांचा किलबिलाटही चालू असतो तो कानांना सुखावत असतो.
''ए मला धक्का नको हां देऊ, तुझं नाव सांगीन मी रिक्षाकाकांना... ''
"ओ काका, ही बघा ना, मला त्रास देते आहे.... ''
''ए सरक जरा तिकडे, जाड्या.... ढोल्या.... ''
''ओ काका, चला ना लवकर, उशीर होतोय किती.... ''
मग रिक्षाकाकांना बसल्या जागेवरुन सामूहिक हाका मारण्याचा एकच सपाटा. ''काका, चला ऽऽऽऽऽ'' चा कानात दडे बसवणारा घोष. त्या चिमखड्या वामनमूर्ती आकाराने जरी लहान दिसत असल्या तरी त्यांच्या फुफ्फुसांची ताकद त्यांच्या आवाजातून लगेच लक्षात येते. सरावलेले रिक्षाकाकादेखील पोरांना उखडलेल्या आवाजात सांगतात, ''ठीक आहे. आता तुम्हीच आणा त्या दीपकला खाली! '' कधी कधी ही मुले काकांनी सांगण्याची वाट न पाहता आपण होऊनच सुरू करतात, ''ए दीपक, लवकर ये रे खाली.... आम्हाला तुझ्यामुळे उशीर होतोय!!!! '' पावसाळ्यातल्या बेडकांच्या वाढत्या आवाजातील डरांव डरांव सारखे यांचेही आवाज मग आसमंतात घुमू लागतात. टाळ्या, हॉर्न, हाकांचा सपाटा सुरू होतो नुसता!
यथावकाश ह्या सर्व कंठशोषाला जबाबदार दीपक त्याच्या आजोबांचे किंवा बाबांचे बोट धरून येतो खाली डुलत डुलत. सोबत आलेल्या मोठ्या व्यक्तीच्या हातातील सॅक, वॉटरबॅग, लंचबॉक्सची पिशवी ते रिक्षाकाकांकडे सोपवतात. दीपक वर बाल्कनीकडे बघत, लेकाला घाईघाईने टाटा करायला गाऊनवर ओढणी घालून आलेल्या आपल्या आईला हात हालवत ''बाय'' करतो. तिच्या ''डबा खा नीट वेळेवर, '' वगैरे सूचना समजल्यासारखी मुंडी हालवतो आणि रिक्षात बसलेल्या पोरांना धक्काबुक्की करत, खिदळत, इतरांच्या किलबिलाटात सामील होत शाळेकडे रवाना होतो.
थोड्याफार मिनिटांच्या फरकाने आमच्या रस्त्यावर हे नाट्य रोज सकाळी दोन-तीनदा घडते. पात्रांची नावे फक्त बदलतात. कधी तो ''रोहन'' असतो, तर कधी ''हर्षा''. तेच ते पुकारे, तीच ती घाई, तेच संवाद आणि रिक्षाकाकांचे साऱ्या पोरांना कातावून ओरडणे, ''आरे, आता जरा गप ऱ्हावा की! किती कलकलाट करताय रं सकाळच्या पारी! ''
मे महिन्याच्या सुट्टीत मात्र सारे काही शांत असते. एरवी त्या पोरांच्या अशक्य हाकांना कंटाळलेली मी नकळत कधी त्यांच्या हाकांची प्रतीक्षा करू लागते ते मलाच कळत नाही!
कधी काळी लहानपणी मीही शाळेत रिक्षेने जायचे. काळी कुळकुळीत, मीटर नसलेली आमची ती टुमदार रिक्षा आणि आमचे रिक्षाकाकाही तसेच काळेसावळे, आकाराने ऐसपैस! त्यांचे नाव पंढरीनाथ काका. कायम पांढरा शुभ्र झब्बा- लेंगा घातलेली त्यांची विशाल मूर्ती दूरूनही लगेच नजरेत ठसत असे. मंडईजवळच्या बोळात दोन बारक्याशा खोल्यांच्या अरुंद जागेत ते राहायचे. जेमतेम इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण. मनाने अतिशय दिलदार माणूस! तोंडात कधी शिवी नाही की व्यसनाचा स्पर्श नाही. माळकरी, सश्रद्ध, तोंडात सतत पांडुरंगाचे नाव! आणि तरीही पोरांवर रोज भरपूर ओरडणार अन् त्यांच्यावर तेवढीच मायाही करणार! आईवडीलांच्या गैरहजेरीत मुलांची शाळेत ने-आण करताना ते जणू त्यांचे मायबाप बनत. त्यांना स्वतःला मूलबाळ नव्हते. कदाचित त्याचीच कसर ते आमच्यावर माया करून भरून काढत असावेत. त्यांचा आरडाओरडा त्यामुळेच आम्हाला कधी फार गंभीर वाटलाच नाही. कधी शाळेतून घरी सोडायला उशीर झाला तर ''पोरास्नी भुका लागल्या आस्तील,'' करत त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांनी खाऊ घातलेले खारे दाणे, फुटाणे, शेंगा म्हणूनच लक्षात राहिल्या! त्यांना कधी आम्हाला घरी नेण्यासाठी शाळेच्या दाराशी यायला उशीर झाला की अगदी डोळ्यांत प्राण आणून आम्ही त्यांची वाट बघायचो. आणि वाहतुकीच्या गर्दीत ती चिरपरिचित रिक्षा दिसली की मग कोण तो आनंद व्हायचा!
कधी शाळेतल्या जंगलजिम किंवा घसरगुंडीवर शाळा सुटल्यानंतर खेळायची हुक्की आली असेल तर काकांच्या हातात दप्तर कोंबून आम्ही घसरगुंडीच्या दिशेने पसार! शेवटी बिचारे पंढरी काका यायचे आम्हाला शोधत शोधत! आपल्या छोट्याशा घरी नेऊन वर्षातून एकदा आम्हाला सगळ्या मुलांना हौसेने खाऊ घालण्याचा त्यांचा आटापिटा, कधी कोणाला लागल्या-खुपल्यास त्यांनी तत्परतेने लावलेले आयोडीन, रिक्षातल्या कोण्या मुलाची काही वस्तू शाळेत हरवल्यास ती शोधायला केलेली मदत, कोणाशी भांडण झाल्यास घातलेली समजूत यांमुळे ते आम्हा मुलांमध्ये लोकप्रिय होते. त्यामुळेच जेव्हा रिक्षा सुटली तेव्हा खूप वाईट वाटले होते. नंतर कधी ते रस्त्यात दिसले तर स्वखुशीने चटकन लिफ्ट पण देत असत. निरोप घेताना मग उगाच त्यांचे डोळे डबडबून येत.
रिक्षाच्या बाबत माझ्या शेजारणीच्या छोट्या मुलीची तर अजूनच वेगळी तऱ्हा! साडेसाताची शाळा म्हटल्यावर पावणेसातला रिक्षाकाका इमारतीच्या दारात हजर होत. आणि त्यावेळी ही छोटुकली जेमतेम उठून दात घासत असे! मग एकच पळापळ!! एकीकडे रिक्षाकाकांच्या हाकांचा सपाटा आणि दुसरीकडे शेजारीण व तिच्या मुलीतले ''प्रेमळ'' संवाद!!! कित्येकदा माझी शेजारीण लेकीची वेणी लिफ्टमधून खाली जाताना घालत असल्याचे आठवतंय! आज तिला त्या समरप्रसंगांची आठवण करुन दिली की खूप गंमत वाटते.
ह्या सर्व गोष्टी आठवायचं कारण म्हणजे लहान मुलांची शाळेतून ने-आण करण्यासाठीच्या तीन आसनी रिक्षांवर आता सरकारने टप्प्याटप्प्याने बंदी घालायचे ठरविले आहे. त्यांची जागा आता बसेस घेणार आहेत. कारणही सुरक्षिततेचे आहे. एका परीने ते योग्यच आहे. कारण मुलांना अशा रिक्षांमधून कश्या प्रकारे दाटीवाटीने, कोंबलेल्या मेंढरांगत नेले जाते तेही मी पाहिले आहे. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूच्या साथीमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना रिक्षाऐवजी व्यक्तिशः शाळेत नेऊन सोडणे पसंत केले. तेव्हाच ह्या व्यवसायाला घरघर लागायला सुरुवात झाली होती. सरकारच्या नव्या धोरणामुळे गेली किमान तीस वर्षे चालू असणारा हा व्यवसाय काही काळाने बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. शाळांच्या दारांशी आणि रस्त्यांवर आता मुलांनी ठसाठस भरलेल्या, डुचमळत्या रिक्षाही दिसणार नाहीत आणि रोज सकाळी इमारतीच्या दाराशी ''ओ काका, चला नाऽऽऽ, उशीर होतोय,'' चा गिल्लाही ऐकू येणार नाही. मुलांच्या बसेस मुलांना अरुंद गल्ल्यांमधून वाट काढत घराच्या दाराशी नक्कीच सोडणार नाहीत. त्यांचे थांबे ठराविकच असतात.
तेव्हा रिक्षाकाकांचे ते मुलांना जिव्हाळा लावणारे पर्व ओसरल्यात जमा आहे. त्यांना आता उत्पन्नाचे दुसरे मार्ग शोधायला लागतील. त्यातील कितीतरी रिक्षाकाका वयाची चाळीशी ओलांडलेले आहेत. पुन्हा नव्याने रोजीरोटीचा मार्ग शोधायचा हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. ''कालाय तस्मै नमः '' म्हणत पुढे जायचे ठरवले तरी इतकी वर्षे मुलांना जीव लावणारे, त्यांची काटाकाळजीने ने-आण करणारे, त्यांना वेळप्रसंगी रागावणारे, त्यांच्या जडणघडणीत - शिस्त लावण्यात आपलेही योगदान देणारे अनेक ''पंढरी''काका आणि त्यांचे ह्या उत्पन्नावर चालणारे संसार आठवत राहतात. आणि नकळत मनाला एक अस्पष्ट रुखरुख लागून राहते!
-- अरुंधती