Wednesday, October 17, 2012

उबुंटू


विश्व संगीताच्या अभ्यासाचे दरम्यान माझी ओळख एका सुंदर शब्दाशी झाली. तो शब्द म्हणजे ''उबुंटू''. 



Umuntu Ngumuntu Ngabantu: “A person is a person because of people.” (झुलू म्हण)

उबुंटू या शब्दाला आफ्रिकेत खोसा समाजात, बंटू भाषांमध्ये मोठे महत्त्वाचे स्थान आहे व त्या शब्दाची वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी रूपे आहेत. जसे बोथो, उटू, उन्हू इत्यादी. उबुंटू हे एक प्रकारचे तत्त्वज्ञान किंवा जीवनशैली म्हणता येईल. त्याचा अर्थ ढोबळपणे, ''मी आहे, कारण आम्ही आहोत,'' असा होतो. त्यानुसार समाजात प्रत्येकाचे स्थान महत्त्वाचे आहे, आणि ''माझं अस्तित्व इतरांच्या अस्तित्वामुळे आहे,'' हा त्यातील मुख्य विचार मानला जातो. त्यानुसार उबुंटू जीवनशैलीला अनुसरणार्‍या माणसाला इतरांमधील गुणांमुळे  किंवा त्यांच्या क्षमतेमुळे कधीच असुरक्षित वाटत नाही. कारण तो स्वतः पूर्णतेचा एक अंश आहे, त्या पूर्णतेचा एक भाग आहे हे त्याला ठाऊक असते. तो स्वतःला इतरांचा एक भाग मानतो. आणि त्यामुळे इतरांची मानहानी ही त्या व्यक्तीचीही मानहानी ठरते. इतरांचे शोषण त्याचे शोषण ठरते. इतरांचे दु:ख त्याचे दु:ख ठरते. तुम्ही माणूस म्हणून एकट्याने जगू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला इतरांची, माणसांची, समाजाची गरज असते. तुमचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. उबुंटू मुळे तुमच्यात उदारता येते. मनाचे मोठेपण येते. आपण एकमेकांशी जोडले गेल्याची भावना येते. अनेकदा आपण स्वतःचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करतो. पण उबुंटू मध्ये तुम्ही व इतर माणसे भिन्न नाहीत. एकाच्या कृतीने बाकीच्यांवरही प्रभाव पडतो. मग तो प्रभाव चांगला असो की वाईट! तुम्ही चांगली कृती केलीत तर त्याचा फायदाही सार्‍या जगाला होतो.

नेल्सन मंडेला उबुंटूचा अर्थ सांगताना म्हणतात : पूर्वीच्या काळी यात्रेकरू प्रवास करताना एखाद्या खेड्यात थांबायचे. तिथे गेल्यावर यात्रेकरूला कोणापाशी अन्न, पाणी मागायची गरज पडत नसे. कारण खेड्यातले सर्व लोक त्याला अन्न, पाणी आणून देत. त्याचे मनोरंजन करत. हा झाला उबुंटूचा एक भाग. याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी स्वतःचा विचारच करायचा नाही! त्याचा अर्थ असा घ्यायचा की तुमच्या समाजाचा विकास व्हावा यासाठी तुम्ही हे करायला तयार आहात का?  



एक प्रकारचे ''कम्युनिटी स्पिरिट'' ज्याला म्हणता येईल असे हे तत्त्वज्ञान गेल्या काही वर्षांमध्ये पाश्चात्त्य जगातही बरेच प्रसिद्ध पावले असे म्हणता येईल. २००४ सालच्या ''इन माय कंट्री'' चित्रपटात उबुंटू ही मुख्य विचारधारा असल्याचे सांगितले जाते, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही त्यांच्या भाषणात समाजाचे महत्त्व सांगताना उबुंटूचा उल्लेख केला आहे.



संगणकीय प्रणालीच्या जगातही ''उबुंटू'' हे नाव प्रसिद्ध झाले आहे. प्रसिद्ध पॉप गायिका मॅडोनाने उबुंटूचे इंग्रजी भाषांतर असलेले ''आय अ‍ॅम बिकॉझ वुई आर'' हे शीर्षक आपल्या आफ्रिकेतील मलावीच्या एड्स आणि एच आय व्ही ग्रस्त अनाथ मुलांवर तयार केलेल्या माहितीपटासाठी वापरले.



उबुंटू शब्दाशी निगडित एक छोटीशी पण सुरेख गोष्ट मध्यंतरी वाचनात आली.



आफ्रिकेत काम करणार्‍या एका मानववंशशास्त्रज्ञाने तो काम करत असलेल्या खोसा समाजातील लहान मुलांना खेळताना पाहिले. त्याने एका झाडाखाली एक टोपली ठेवली. टोपलीत मधुर चवीची फळे होती. तो या मुलांना म्हणाला, तुमची शर्यत लावूयात. तुमच्यापैकी जो पळत पळत जाऊन त्या टोपलीपाशी पहिला पोचेल त्याला सर्वात जास्त फळे मिळतील. मुलांनी होकार दिला. शास्त्रज्ञाने शर्यत सुरू केल्यावर सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले आणि सगळेजण पळत पळत एकाच वेळी त्या टोपलीपाशी पोचले. अर्थातच फळांचा प्रत्येक मुलाला समान वाटा मिळाला. त्या शास्त्रज्ञाला मुलांच्या त्या वागण्याचे फार कुतूहल वाटले. त्याने विचारले, ''तुम्ही अशा प्रकारे का पळालात? तुमच्यापैकी एक कोणीतरी शर्यत जिंकू शकला असता!'' त्यावर मुलांनी फळांवर ताव मारत उत्तर दिले, ''उबुंटू, जर बाकीचे दु:खी असतील तर आमच्यापैकी कोणी एक कसा काय बरे आनंदी होऊ शकेल?'' :-)

(उबुंटूबद्दल आणखी माहिती http://en.wikipedia.org/wiki/Ubuntu_(philosophy) येथे उपलब्ध आहे. चित्र आंतरजालावरून साभार)

10 comments:

  1. मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
    आपला मराठी ब्लॉग ... http://www.marathiblogs.in/ वर जोडा
    आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
    जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..

    ReplyDelete
  2. > विश्व संगीताच्या अभ्यासाचे दरम्यान
    >
    या अभ्यासात काय काय शिकवल्या ज़ाते याबद्दल मला उत्सुकता आहे. १) मोत्झार्ट - बेथोव्हन वगैरे ? २) बीटल्स - आर डी बर्मन - मायकेल जॅक्सन वगैरे ? ३) ब्राझिलमधल्या धोबिणी यांत अन्तर्भूत असल्याची माहिती तुम्ही दिली आहेच. ४) आफ्रिकेतला उबंटू-उबुंटू वगैरे प्रकार ५) सेमान्-गुडी अय्यर वगैरे ? ६) अब्दुल करीम - भीमसेन - किशोरी - मोगूबाई वगैरे? ७) रवि शंकर, अली अकबर खान वगैरे? ८) दीनानाथ - लता - अमीरबाई कर्नाटकी - ईमणि शंकर शास्त्री - खेमचन्द प्रकाश वगैरे‌?

    अभ्यासक्रम कोण आणि कुठे ठरवतो? देश-स्थान-परत्वे अभ्यासक्रमात काही बदल वगैरे? म्हणजे इंग्लंडमधे 'शंकरस्य एक्स-श्वशुर: दक्ष:' वगैरे शिकवून चर्चिल-थॅचर यांना गोंधळात टाकण्याऐवजी 'एलिझा(बेथ)या: एक्स-स्नुषा डायाना' शिकवणे हे concepts समज़वायला बरे असा काही प्रगतिशील दृष्टिकोण तिथे ठेवत असतीलच. विश्व-संगीताच्या अभ्यासात कुठल्या संगीतावर किती भर दिल्या ज़ातो, हे ऐकायला आवडेल.

    ReplyDelete
  3. नमस्कार!

    विश्व संगीताचे अभ्यासाचे दरम्यान जगातील वेगवेगळ्या आदिम संस्कृतींमधील आदिवासींचे संगीत, तेथील स्थानिक जमातींचे संगीत, त्या संगीताचा इतर प्रकारच्या संगीतांवर प्रभाव असेल तर त्याविषयी, त्या संगीताचे व्यावसायीकरण झाले असल्यास त्या बद्दल, वैश्वीकरणाचा त्या संगीतावर व संस्कृतीवर पडलेला प्रभाव, कॉपी राईटचा मुद्दा, बौद्धिक संपदेचा मुद्दा अशा अनेक प्रकारांचा अंतर्भाव येतो. मी केलेल्या अभ्यासात आफ्रिकेतील व आशियातील काही जमातींचा अंतर्भाव होता. त्यांच्या संगीताची पाश्चात्य संगीताशी तुलना होती. अर्थातच थोडीफार त्या त्या प्रादेशिक भागाची राजकारण, इतिहास, समाज या दृष्टीने केलेली पडताळणी होती. आणि हे सर्व एका अमेरिकन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात येणारे असल्यामुळे त्याकडे बघायचा दृष्टीकोन जरासा अमेरिकेच्या चष्म्यामधून दिसणारा होता. :)

    ReplyDelete
  4. > त्याकडे बघायचा दृष्टीकोन जरासा अमेरिकेच्या चष्म्यामधून दिसणारा होता.
    >
    जालावर wikipedia मध्ये 'World Music' बद्दल अशी माहिती आहे : The term (world music) originated in the late 20th century as a marketing category and academic classification for non-Western traditional music. गोरा माणूस ज़ात्याच किती उद्धट किंवा आंधळा आहे हे इथे दिसते. यांवर इतरत्र गेल्या १०-१५ वर्षांत चर्चा झाल्या आहेत. म्हणजे तानसेन हा Indian musician, पण 'the great composer Mozart' मात्र फक्त 'संगीतकार', तो 'जर्मन / Austrian संगीतकार' नाही. सीरिया-इझरेल वगैरे भाग म्हणजे 'मध्य-पूर्व'. पण तो भाग आमच्या दिल्लीच्या पश्चिमेला आहे हो !!

    गौरवर्णियांनी 'इंडियन क्लासिकल म्युझिक' हे शब्द वापरायला काहीच हरकत नाही. पण मी त्यांच्या शास्त्रीय-संगीताचा उल्लेख 'वेस्टर्न क्लासिकल' असा केला की ते बरेचदा दचकतात, आणि मला त्याचा आसुरी आनन्द होतो. 'आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत' अशा आविर्भावांत बरेच गोरे लोक (उरलेल्या जगाचं) world-music ऐकतात, आणि बरेचदा त्यातला नेमका गचाळ भाग ते उचलतात. बी बी सी वर १९८५-८६ साली भारतीय संगीतावर कार्यक्रम झाले होते; त्यात एक फालतू वादक तो तानसेनचा वंशज आहे, या -- खरा-खोटा दावा असल्याच्या -- आधारावर, आला होता. आणि त्या वेळी खूप् चालणारं 'ज़ू ज़ू ज़ू ज़ू ज़ू' असलं काहीतरी कचरा गाणं उत्तम भारतीय संगीताचा नमुना म्हणून लावलं होतं. आता भारतीय लोक तरी कुठे दीनानाथ वगैरे ऐकतात? ते स्वत: 'ज़ू ज़ू ज़ू ज़ू ज़ू' आणि तसल्या कचरा प्रकारांचेच भक्त आहेत. ती रड देखील आहेच.

    मात्र 'भारतीय संगीताचं ज्ञान भारतीयांच्या मुठीत आहे, आणि आपण त्या संगीताचे प्राथमिक अवस्थेतले विद्यार्थी आहोत' अशी योग्य समज़ ठेऊन भारतीय संगीत शिकणारे-ऐकणारे गोरे लोकही, त्या ज़मावांत अल्पसंख्येने का होईना, पण आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. हो, मुळात विश्व संगीत हे 'जॉनर' त्याचे मार्केटिंग करायला सोपे जावे म्हणून पाश्चात्यांनी 'निर्माण' केलेले जॉनर आहे. जगाच्या विविध प्रांतांमधील संगीताला त्यांनी सर्वप्रथम जगापुढे आणले हा त्यांचा दावा आहे. आणि त्यांनीच त्या संगीताला मार्केट उपलब्ध करून दिले. त्यांच्या जगातील संगीतकार, गायक व वादकांनी जगाच्या आदिम संस्कृतींमधील संगीत प्रकार उचलले, तेथील गायक-वादकांशी ''कोलॅबरेट'' केले त्यामुळे त्या संगीताला जगात इतकी मान्यता मिळाली असे बरेच दावे आहेत. त्यात तथ्यांशही आहे. किमान आर्थिक आकडेवारी तरी तसे सांगते. पण त्यातून जगभर विखुरलेल्या लोकांना या निमित्ताने वेगवेगळ्या संगीत प्रकारांचा अभ्यास करायची संधी मिळते आहे हे मला फार छान वाटले!

      Delete
  5. कलाकारांना आर्थिक सुबत्ता/स्थैर्य मिळाले, वेगवेगळे संगीत ऐकायला मिळाले की त्यांचा दर्जा सुधारेल अशी अपेक्षा होती. ती खोटी ठरली आहे. विश्व-संगीत वगैरे भानगडी ज़ुन्या गुरुजींच्या ध्यानीमनीही नसतील. पण अज्ञान-दारिद्र्य - मारकुटेपणा - सन्तापी स्वभाव यां पार्श्वभूमीवर अल्लादिया खान - अल्लाउद्दीन - सवाई गन्धर्व यांनी ज्या तोडीचे शिष्य निर्माण केले तसे शिष्य निर्माण करण्यात गुरु-रुपांत मल्लिकार्जुन मनसूर - रवि शंकर - भीमसेनजी - किशोरी ही पिढी अयशस्वी ठरली आहे. बाह्य संगीतप्रभाव चांगल्या प्रकारे आत्मसात केल्याचे एक उदाहरण म्हणजे बालगन्धर्व इ लोक १९१० कडे जी पेटी-सारंगी साधी संगत वापरत आणि १९४० साली सिने-गाण्यांत ज़े वाद्यवृंदांत वैविध्य ऐकू येते त्यांतला फरक. पुढे या वैविध्यानी आणि नाविन्यानी विकृत वळण घेतले, हा भाग वेगळा. एकूण पाहता लॅण्ड-विण्डस् चा आणि चितळे मास्तरांच्या गोदीच्या पदराचा ज़सा एकमेकांशी संबंध नाही, तसा आर्थिक आकडेवारी + आधुनिकता यांचा आणि सांगीतिक गुणवत्तेचा संबंध नाही; असलाच तर तो व्यस्त प्रमाणात आहे.

    > पण त्यातून जगभर विखुरलेल्या लोकांना या निमित्ताने वेगवेगळ्या संगीत प्रकारांचा अभ्यास करायची संधी मिळते आहे हे मला फार छान वाटले!
    >

    या विधानाशी मी सहमत आहे. आणि असा अभ्यास करावा हा विचार गोरा माणूस करू शकला (आपण केला नसता) आणि एकदा विचार आल्यावर त्यानी त्याचा आपल्यापेक्षा जास्त हिरिरीने पाठपुरावा केला हे मान्य करावे लागेल. त्याच्या एकूण परिणामांविषयी मला फार उत्साह नाही. म्हणून माणसानी (आपल्याला मुळात परके असे) विश्व-संगीत ऐकू नये असा काही भाग नाही. ते ज़रूर ऐकावे, स्वत:चे अनुभव-विश्व समृद्ध करावे. पण परंपरेतून आलेले संगीतच खरे सकस असते आणि विश्व-संगीतातल्या गोष्टी चांगल्या अर्थानी क्वचितच आत्मसात केल्या ज़ातात असे माझे मत आहे. 'शेक्सपीअरच्या समाधीपुढे मी आदराने वाकलो, ज्ञानेश्वरांच्या समाधीपुढे मात्र मी भारावलो' असा ज़ो उल्लेख पु लं नी केला आहे, तो फार बोलका आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सांगीतिक गुणवत्तेशी आर्थिक आकडेवारीचा काहीही संबंध नाहीच! आणि विश्वसंगीत जॉनर निर्माण करण्यामागचा उद्देशही अजिबात उदात्त वगैरे नव्हता व नाही. रेकॉर्डिंग कंपन्यांनी आपली आर्थिक उलाढाल अधिक चांगली कशी होईल, तेच तेच संगीत ऐकून कंटाळलेल्या लोकांना जरा भिन्न प्रकारचे ''ऑथेंटिक'' संगीत ऐकायला मिळाले तर त्यांना त्यात आनंद मिळेल व आपल्या कंपनीचा फायदा वाढेल हे ताडणे इतके सोपे गणित आहे तिथे. त्यात संगीतासाठी आपण काही करत आहोत वगैरे हे सर्व मार्केटिंग गिमिक्स आहेत. शेवटी सर्वांच्या नजरा आर्थिक फायद्यावर आहेत व असतात हे वास्तव आहे. त्यात अनेक प्रसिद्ध संगीतकारांनी ज्या लोकांकडून हे संगीत ''उचलले'' त्यांना त्याबद्दल ना कसले श्रेय दिले, ना त्यांना आपल्या आर्थिक नफ्यात सामील करून घेतले. पण आता शहाणे झालेले हे स्थानिक लोक काही प्रमाणात स्वतःच्या संगीताचे स्वतःच रेकॉर्डिंग करून ते जगापुढे आणत आहेत. अर्थातच त्यांना मोठमोठ्या रेकॉर्डिंग कंपन्या, लेबले यांचा लाभ मिळत नाही. तरी त्यामुळे नाउमेद न होता त्यांचे प्रयत्न चालू आहेत. अशाच काही संगीत प्रकारांची ओळख पुढेही करून देण्याचे माझ्या मनात आहे.

      Delete
  6. > स्थानिक लोक काही प्रमाणात स्वतःच्या संगीताचे स्वतःच रेकॉर्डिंग करून ते जगापुढे आणत आहेत. अर्थातच त्यांना मोठमोठ्या रेकॉर्डिंग कंपन्या, लेबले यांचा लाभ मिळत नाही.
    >--------

    विश्व-संगीत या शिक्क्याखाली 'स्थानिक' संगीताचा प्रसार करणारे अजिबात उदात्त हेतू न ठेवणारे असतील आणि नामांकित कंपन्यांचीही स्थानिक लोकांना साथ नसेल तर ते स्थानिक लोक कुठल्या माध्यमांतून इतर देशांतल्या लोकांपर्यंत पोचताहेत, उदात्त हेतू असो-नसो पण विश्व-संगीतवाल्यांचा स्थानिक-कलाकारांना किती फायदा होतो आहे, इतर कुठल्या स्थानिक संस्था खंबीरपणे / कळकळीने स्थानिक कलाकारांसाठी काम करताहेत, याबद्दल तुमचे अनुभव, माहिती वगैरे लिहिल्यास ती वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  7. नक्कीच! त्याबद्दलही लिहेनच! :)

    ReplyDelete
  8. सहनाववतु सहनौभुनक्तु सहवीर्यं करवावहै

    ह्या आपल्या सामुदायिक सह-अस्तित्वाच्या संकल्पनेशी हे सुसंगतच आहे.

    प्रमाणाबाहेर फोफावत जाणार्‍य़ा व्यक्तिगत आशा-आकांक्षांच्या वावटळीत आपल्या सुघटित समाजाची पाळेमुळे खिळखिळीत होत असता, आपला हा लेख आपल्या संस्कृतीतील सद्‌भावनांना इतरत्रच्या सभ्यतांमधील, पुष्टींची जोड मिळवून देत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मला आपला लेख आवडला. माहितीसाठी मनःपूवक धन्यवाद आणि अशाच प्रेरणादायी लिखाणांकरता हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete