
Saturday, January 30, 2010
सुरंगीची वेणी, ज्यूटची पिशवी आणि गोल्डफिशचा साबण

Thursday, January 28, 2010
दंतविहीनांचे दाताळ अनुभव
आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे? आता एखाद्या छोट्या बाळाचे बोळके निरागस हसू पाहून आपल्याही चेहऱ्यावर जसे नकळत स्मित उमटते त्याच सहजतेने कोणा म्हातारबाबांचे किंवा म्हातारबाईंचे बोळके हसू पाहिले की मलाही हसू फुटल्याशिवाय राहत नाही. कदाचित या हास्याचा संबंध बालस्मृतींशीही असण्याची दाट शक्यता आहे! आमच्या भाड्याच्या जागेच्या मालकीणबाई आमच्याच खालच्या जागेत राहायच्या. त्या व्यवसायाने डेंटिस्ट (दंतशल्यविशारद) होत्या. घरातच त्यांचा ऐसपैस दवाखाना होता. त्यांच्याकडे अनेक लोक कवळ्या बनवून व बसवून घ्यायला येत असत. त्यांच्याकडील पेशंट्स चेहऱ्यावरील करुण भावावरून सहज ओळखता येत असत. येताना व जातानाच्या त्यांच्या चेहऱ्यांत जमीन-अस्मानाचा फरक पडलेला असे. कदाचित म्हणूनच मी व आमच्या कुटुंबीयापैकी कोणीही त्यांच्याकडून आमचे दंतकाम करून घेण्यास कधीच धजावलो नाही. कवळ्या सोडल्या तर त्यांच्याकडे इतर पेशंट्सची फारशी गर्दी नसे. दवाखान्याच्या आतील बाजूस असलेल्या छोटेखानी जागेत त्यांचे हे कवळ्यांचे कारा(गीर)गृह थाटलेले होते. अतिशय जुनाट हत्यारांनी त्यांचे हे कवळीकाम चालत असे. अनेकदा मी व मालकीणबाईंचा माझ्याच वयाचा नातू दवाखान्यावरील पोटमाळ्यात लपून भयचकित व उत्कंठित नजरांनी ह्या कवळ्या आकाराला येताना पाहत असू. नंतर मोठ्यांची नजर चुकवून त्या कवळ्या व त्यांचे साचे हळूच हाताळत असू. वरच्या व खालच्या जबड्याच्या कवळ्या एकमेकांवर आपटण्याचा आविर्भाव करत त्या कवळ्याच जणू बोलत आहेत अशा थाटात घशातून वेगवेगळे आवाज काढण्यात आम्हाला फार मजा वाटे. मालकीणबाईंच्या यजमानांनाही वयोपरत्वे कवळी बसवली होती. तोंड धुताना त्यांनी कवळी काढून बाजूला ठेवली की ती कवळी लंपास करून धावत सुटायचे हा आमचा लाडका उद्योग होता. मग नंतर दोन-चार धपाटे खाल्ले की ती कवळी परत केली जायची. मालकीणबाईंचे यजमान आपली कवळी काचेच्या पेल्यात घालून विसळायचे. प्रत्येक खाण्याजेवणानंतर त्यांना बेसिनवर उभे राहून भांडी घासल्यासारखी त्यांची कवळी घासताना पाहून आमच्या बालमनांमध्ये उगाचच करुणा दाटून यायची.
दर रविवारी त्यांच्याकडे त्यांचा समवयस्क मित्रमैत्रिणींचा रमीचा नाहीतर ब्रिजचा अड्डा जमायचा. करड्या-पांढऱ्या केसांचे बॉब्ज केलेल्या, स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेल्या, ओठांना लिपस्टिक फासलेल्या मालकीणबाईंच्या मैत्रिणींना खाण्या-पिण्याची राउंड झाल्यावर हळूच बेसिनवर आपली कवळी काढून साफ करताना पाहून आम्हा बालकांना हसू न आले तरच नवल!
त्यामुळे कवळी व बोळके यांचे दर्शन झाले की आजही माझ्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटते.
मध्यंतरी माझे वडील व दोन्ही काका एका कार्याच्या निमित्ताने एके गावी गेले होते. तेथील लोकांनी त्यांना हौसेने खाऊ म्हणून बॉम्बे हलवा दिला. आता ज्यांनी हा हलवा खाल्ला किंवा पाहिला आहे त्यांना कल्पना असेल की तो किती चिकट व चिवट असतो ते! परतीच्या प्रवासात अपरात्री भूक लागली म्हणून त्यांनी हा हलवा खायला घेतला अन... काकांची कवळीच हलव्यात रुतून बसली व ती निघता निघेना! इतर दोन्ही बंधू भावाला साहाय्य करण्याचे सोडून खदखदा हसत भावाची फजिती पाहत बसले. मग वडिलांनी हलवा खायला घेतला. त्यांची अपेक्षा की आपल्या तोंडात एकच दात शिल्लक असल्यामुळे हा हलवा आपल्याला त्रास देणार नाही. परंतु त्यांची ही आशा अतिशय फोल ठरली. त्या हलव्याने त्यांच्या एकुलत्या एक दाताला व हिरड्यांना असे काही घोर आलिंगन दिले की ते रात्रभर कळवळत होते. दुसऱ्या काकांनी सुज्ञतेने हलवा न खाता भुकेले राहणे पसंत केले.
हा किस्सा मी मोठ्या चवीने हसत हसत चुलतभावाला ऐकवत होते तर तो म्हणाला, काळजी करू नकोस! त्याचे बाबा (माझे काका) काशी-प्रयागाला गेले होते तेव्हा त्यांनी गंगेत डुबकी लगावली आणि त्यांची कवळीच गंगेच्या प्रवाहात वाहून जायला लागली!! ('हर हर गंगे' म्हणताना त्यांचे तोंड त्यांनी जरा जास्तच उघडले असावे! ) आणि कवळीच्या मागे ते 'माझी कवळी, माझी कवळी' करत जाऊ लागले, आणि त्यांच्याबरोबरचे त्यांचे दोस्त आपला मित्र असा कोठे चालला म्हणून त्यांना सावरायला त्यांच्या मागे मागे!!! कोणालाच नक्की काय गोंधळ चाललाय ते लक्षात येईना! शेवटी कसेबसे गंगेच्या वेगवान प्रवाहाच्या दिशेने कवळीच्या मागे जाणाऱ्या माझ्या काकांना लोकांनी आवरले व त्यांना त्यांच्या कवळीसकट काठावर आणून सोडले.
एक दिवस माझी थोरली मावशी आमच्याकडे आली. आईने तिला काहीतरी खाण्याचा खूप आग्रह केला. पण ही आपली काहीच खायला तयार होईना. फार बोलत पण नव्हती. खूप खोदून विचारल्यावर तिने हळूच सांगितले, अगं, आज कवळी घरीच विसरले! ती घाईघाईत कवळी घालायचे विसरून आली होती.
अशीच एकदा प्रवासाला गेले असताना सोबत एक वृद्ध बाई होत्या. सकाळी त्या तोंड वगैरे धुवून आल्या व त्यांच्या हँडबॅगेत काहीतरी धुंडाळू लागल्या. त्या शोधत असलेली वस्तू त्यांना काही केल्या सापडेना. अगदी हैराण झाल्या होत्या. न राहवून मी त्यांना मदत करू का, म्हणून विचारले. तशी त्यांनी त्यांची हॅंडबॅगच माझ्या पुढ्यात ठेवली व लाल रंगाची नक्षीकामाची डबी त्यातून धुंडाळायला सांगितले.
आतील सामानाची बरीच उलथापालथ केल्यावर मला एकदा का ती डबी सापडली. वाटले, काहीतरी दागिना असेल म्हणून त्या एवढ्या कासावीसपणे शोधत असतील. पण छे! आत त्यांची आदल्या रात्री काढून ठेवलेली कवळी होती!!
परवा सकाळी न्याहारी करताना अचानक आईचा समोरचा दात तिच्या हातात आला. गेल्या वर्षभरात अनेक दातांनी तिचा निरोप घेतला आहे. आता समोरचा, दर्शनी भागातील दात असा दगाबाजाप्रमाणे कोणतीही पूर्वकल्पना न देता गारद व्हावा म्हटल्यावर ती दुःखी झाली. तिच्या गेलेल्या दाताचा ती असा शोक करीत असताना मला मात्र तिच्या मुखातील दर्शनी भागातील खिंडार पाहून कमालीचे हसू येत होते. शेवटी ते दाबलेले हसू बाहेर पडलेच! एकदा का मी हसू लागले आणि ते आवरताच येईना! त्याच दिवशी दुपारी माझ्या दाढेचा एक तुकडा अलगद हातात आला. आईने माझ्याकडे फक्त विजयी मुद्रेने पाहिले. मलाही आता कल्पनेत माझी बोळकी मूर्ती दिसू लागली होती!!
मदतीचा हात
Tuesday, January 19, 2010
नैनितालच्या आठवणी
Tuesday, January 05, 2010
भागवतकथेने घडविले व्रत!
आयुष्यात एकदा तरी भागवतकथा ऐकावी असे म्हणतात. मला आपल्या आयुष्यात हा योग किमान साठी-सत्तरी उलटल्याशिवाय येणार नाही ह्याची खात्री होती. परंतु बहुधा परमेश्वराला मला त्या भक्तिसागरात लवकरात लवकर बुचकळून काढायचे असावे. परिणामी माझ्या अपेक्षेपेक्षा फारच लवकर, म्हणजे वयाच्या तिशीच्या आतच तो सुवर्णयोग जुळून आला.
दुसऱ्या दिवशीपासून माझ्या एका अनोख्या व्रताचा आरंभ झाला.... येथील जेवण, खाणे अतिशय रुचकर होते, परंतु जड होते. तुपातील पदार्थ सकाळ, दुपार, संध्याकाळ खाण्याची सवय नसल्याने असे खाणे घशाशी येत असे. त्यात मी गायचे कबूल केल्यामुळे सगळीच पंचाईत! मग सकाळी माफक फलाहार करायचा, गंगेत डुबकी घ्यायची, खोलीवर येऊन आवरायचे व त्यानंतर भागवत कथा सप्ताह स्थळी जाऊन इतर वादकांबरोबर त्या त्या सत्रात म्हणावयाच्या भजनांची व आरत्यांची तालीम करायची.. अल्प वेळातच सत्र सुरू झाले की जागरूकतेने कथेचा आनंद लुटतानाच महाराजांच्या इशाऱ्याकडे लक्ष ठेवायचे, योग्य ठिकाणी गायचे, आरत्या म्हणायच्या असा कार्यक्रम सुरू झाला. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात लोक हमखास डुलक्या काढायचे. पण मी भागवत कथा पहिल्यांदाच ऐकत होते. महाराजांची ओघवती, रसाळ वाणी, मनोरम हृदयस्पर्शी कथापट, कसलेल्या वादकांची प्रोत्साहक साथ आणि शेवटच्या कर्पूरारतीत रोमांरोमांत जाणवणारे चैतन्य..... भक्ती, भक्ती म्हणतात ती हीच काय? तासनतास एकाच ठिकाणी बसल्यावरही पाठीला रग न लागणे, थकावट न जाणवणे, चित्तवृत्ती आल्हादित राहणे, कथेत इतके गुंगून जाणे की वेळेचेही भान न उरणे.... मला खूप मजा येत होती. सकाळ सायंकाळ गंगेचे दर्शन, गंगास्नान, गंगारतीचा सोहोळा अशी पर्वणी मिळत होती. जवळपास खूप सुंदर देवळे होती, तिथेही गेल्यावर उल्हसित वाटत असे. आणि गाण्याच्या ह्या अनपेक्षित संधीमुळे माझा रोजचा आहार अगदीच मित झाला होता. दुपारी व सायंकाळी घासभर ताकभात खायचा (फक्त त्याच एका पदार्थात साजूक तूप नसायचे! ) आणि इतर लोकांना अक्षरशः छप्पनभोगांवर ताव मारताना निरिच्छ वृत्तीने पाहायचे हाच माझा खाण्यापिण्याशी त्या दहा दिवसांत आलेला संबंध! नाही म्हणायला एके सायंकाळी आम्ही समोरच्या विशाल निसर्गरम्य क्षेत्र व्यापलेल्या हनुमानाच्या सुंदर मंदिरात गेल्यावर तेथील मुख्य पुजाऱ्यांनी प्रसादाचा खिचडी व शिऱ्याचा द्रोण हातात ठेवला.... प्रसादच तो! त्यामुळे तो खाल्ल्यावर घसा व पोट दोन्ही शांत राहिले.
एक दिवस आमच्याबरोबर पुण्याहून आलेल्यांपैकी एकाने हार की पोडीवरील विशिष्ट ठिकाणी मिळणाऱ्या चाट-कचोरी-पकोड्यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली. (म्हणजे हे महाशय रोज आमच्याबरोबर सकाळ-सायंकाळ भोजनशाळेत जेवून पुन्हा खवय्येगिरी करायला भ्रमंती करत होते तर! ) साहजिकच मनात ते ते पदार्थ चाखण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्या ठिकाणी जाऊन एका पदार्थाची ऑर्डर दिली... म्हटले बघू या, जर चव आवडली तर पुढची ऑर्डर देऊ. पण हाय! येथेही मला आडवे आले 'सरसोंचे तेल'! तेथील सर्व व्यंजने एकतर सरसोंच्या तेलात किंवा साजूक तुपात तळली जात होती. पहिल्या घासालाच माझा चेहरा बघण्यासारखा झाला आणि बहुधा हा सप्ताह पूर्ण होईपर्यंत आपली 'ताकभात व्रता'तून सुटका नाही ह्याची खात्री पटली.
आहाराची किरकोळ बाब सोडली तर मला खूप मजा येत होती. रोजची कथा संपल्यावर पुढच्या कथेची उत्सुकता लागत असे. नव्या नव्या चालींची, ब्रज शैलीची, त्या त्या उच्चारांसहित भजने गाताना ही मजा येत असे. कधी मी थोडी चुकले तरी महाराज व श्रोते सावरून घेत असत. नंतर दोन दिवस अचानक महाराजांचा आवाज बसला. त्याही परिस्थितीत ते मोठ्या कष्टाने, संयमाने व धीराने कथा सांगत होते. माझ्यावरची गाण्याची जबाबदारी अजूनच वाढली होती. दुसरीकडे त्यांच्या मुख्य गायकाचा गावाहून निरोप आला होता की तो काही गाड्यांच्या गर्दीमुळे येऊ शकत नाही. आमच्या यजमानीण बाई माझ्यावर विलक्षण खूश होत्या. त्या व त्यांच्या परिवारातील इतर लोक येऊन माझ्या गाण्याची, अडचणीच्या वेळी मदत करण्याची स्तुती करून मला संकोचून टाकत असत. खरे तर मी वेगळे काहीच करत नव्हते! पण त्या लोकांना त्याचे अतिशय अप्रूप वाटत होते हेच खरे!
बघता बघता दहा दिवस भुर्रकन उडून गेले. कथा मोठ्या जल्लोषात, उत्सवात समाप्त झाली. त्या रात्री आयोजित केलेला भोजन समारंभ आतापर्यंतच्या भोजनांना लाजवेल एवढा जंगी, शाही होता.
मी अर्थातच ताकभाताच्या डायटवर होते! दुसऱ्या दिवशी सर्व लोकांनी आपला मुक्काम हालविला. आम्हीही साश्रू नयनांनी गंगामाईचा निरोप घेतला.
तिच्याकडे पुन्हा लवकर बोलाव म्हणून प्रार्थना केली आणि निघालो. येताना आम्ही वेगवेगळे झालो होतो, कारण अनेकांचे पुढे इतर प्रवासाचे बेत होते. यजमान परिवार मागील सर्व आवरासवर करायला हरिद्वारलाच थांबले होते. ह्या खेपेस आमचा परतीचा प्रवास अतिशय शांत पार पडला. घरी पोचलो, अंघोळी उरकल्या, आवरले. बहिणीने जेवणाची ताटे घेतली होती. पानात वरणभात पाहून मला काय आनंद झाला ते वर्णन करणे कठीण आहे! गेले दहा दिवस सकाळ सायंकाळ दालबाटी, मालपुवा, छोले, कचोरी, समोसे, ढोकळे, गट्ट्याची भाजी, फाफडा, खाकरा, पकौडी वगैरे पदार्थ आणि मिष्टान्नांचे हारेच्या हारे पाहून थकलेल्या माझ्या मनाला व जिभेला घरच्या वरणभाताने जणू नवसंजीवनी मिळाली! ती सहल कायम स्मरणात राहील ती अविस्मरणीय अशा भागवत कथेच्या अनुभवाने, गंगेच्या मनोहारी सहवासाने आणि न भूतो न भविष्यति अशा अन्नवर्षावामुळे! आज ह्या घटनेला अनेक वर्षे लोटली. आमच्या यजमानांनी उदार पाहुणचार हा काय असतो हे त्यांच्या वर्तनातून दाखवून दिले आणि परमेश्वराने गंगेच्या तीरी भागवत कथेचे अविस्मरणीय श्रवण करताना मला अनोख्या अशा कृष्णप्रिय 'ताकभात' व्रताची ओळख करून दिली!!Monday, January 04, 2010
नक्को नक्को रे!
"केतन, नाकात बोटं नको घालू.... "
चिमुकला केतन थोड्याच वेळात बसच्या खिडकीतून रस्त्याकडे पाहत रमून गेला व त्याच्या आईने हुश्श करीत आपले लक्ष इतरत्र वळवले. आता पुरता तरी तो स्थिरावला होता. सगळीकडे टकामका डोळ्यांनी पाहत होता. पण त्याची ही स्थिती फार काळ टिकणारी नव्हती. हे बहुधा त्याच्या आईला देखील माहित असावे. म्हणूनच ती डोके मागे टेकवून, डोळे मिटून थकलेल्या बॅटरीज रीचार्ज करत असावी. तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरून एक उंट जाताना केतनला दिसला. तो लगेच, "मम्मा, उंट बघ" म्हणून किंचाळत खिडकीतून हात बाहेर काढू लागला.
"केतन, किती वेळा सांगितलंय असला वेडेपणा करायचा नाही म्हणून! आधी हात आत घे.... पुन्हा हात बाहेर काढायचा नाही.... आणि असा उसळ्या मारू नकोस रे, माझा ड्रेस खराब होतोय.... "
तेवढ्यात त्यांचा स्टॉप आला. मायलेक दोघेही खाली उतरले.... लेक आईच्या हाताला लोंबकळत होता. "अरे, असा लोंबकळू नको रे.... "
बसचा थांबा आला, प्रवास संपला पण केतनच्या आईचा 'नको' प्रवास अद्याप जारीच होता.....
Friday, January 01, 2010
चुटपुटसुंदरी
खरेच, काही काही लोक त्यांनी योजल्याप्रमाणे एखादी गोष्ट तंतोतंत नाही झाली तर एवढे का दुःखी होतात? त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचे इतके मोठे शल्य का लागून राहते? परिस्थिती, मानवी हस्तक्षेप, इतर घटकांनी कधीही, कोणतीही गोष्ट आपल्या यशापयशाचे समीकरण बदलू शकते. आपल्याला जसे हवे तसे घडले नाही म्हणून निराश होणे, खंत करीत राहणे हे केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रासदायी ठरू शकते! ठीक आहे! नाही घडलं तुमच्या मनासारखं! पण म्हणून किती काळ तेच ते उगाळत राहणार? किती वेळ त्यात दवडणार? त्यातून बाहेर येण्यात एवढे कष्ट का पडतात?
आणि ज्यांना अशा प्रकारे सारखे सारखे चुटपुटण्याची सवय असते त्यांना पुढे पुढे इतरांची सहानुभूती मिळणे देखील बंद होते. कारण काळ हा पुढे धावत असतो. तुम्ही जर वारंवार झालेल्या घटनेलाच चिकटून बसू राहू लागलात तर काळ व लोक तुम्हाला मागे टाकून पुढे जातात. आणि मग भविष्यात कधीतरी तुम्हाला 'एवढा वेळ चुटपुटण्यात घालविला त्या ऐवजी वेगळ्या गोष्टीत घालविला असता तर बरे झाले असते' असे चुटपुटण्याची वेळ येते!
आमच्या चुटपुटसुंदरीसारखे अनेक लोक भवताली दिसतात. सारे काही चांगले, सुरळीत घडत असताना देखील त्यांना एखाद्या होऊ न शकलेल्या गोष्टीची रुखरुख लागलेली असते. त्या सर्वांना आणि आमच्या चुटपुटसुंदरीला सांगावेसे वाटते, "जरा जागे होऊन आजूबाजूला बघा तरी! सगळे किती आनंदात आहेत. तुम्ही पण आनंदी व्हा. इतरांना आनंद द्या! जे नाही झाले, ते नाही झाले... त्याने खंतावून जाण्यापेक्षा जे होत आहे, घडत आहे, त्याचा आनंद घ्या.'
असे एक जरी चुटपुटकुमार वा चुटपुटसुंदरी ह्या लेखाने वेगळा विचार करू लागले तरी ह्या लेखाचे सार्थक झाले!
असा कसा हा पेपरवाला!
आम्ही या नव्या भागात राहायला आलो त्यासरशी आमच्या शेजारच्या आजीबाईंनी दुसऱ्याच दिवशी दार ठोठावले. पाठीची पार धनुकली झालेली, अंगावर सुरकुत्यांचे जाळे, डोईवर पदर अशा त्या नऊवारी नेसलेल्या आजीबाई दारातूनच म्हणाल्या, "तुमाला पेपर लावायचा आसंल तर माज्याकडनं घ्यावा. माझी एजन्सी हाय. " त्यांच्याकडे काही क्षण थक्क होऊन पाहिल्यावर आमच्या मातुःश्रींनी भारल्यागत होकारार्थी मुंडी हलविली आणि म्हातारबाईंच्या पेपर एजन्सीचा माणूस रोज दारात पेपर टाकू लागला. बघता बघता वर्ष लोटले. एव्हाना आम्हाला कळून चुकले होते की ह्या भागात, खास करून आम्ही जिथे राहतो त्या गल्लीत असे अनेकजण पेपर एजन्सी चालवितात. आमच्या इमारतीच्या समोरील मोकळ्या जागेत भल्या पहाटे वर्तमानपत्रांचा टेम्पो दे दणाद्दण वर्तमानपत्रांचे गठ्ठे टाकून जातो. मग पहाटे चार वाजल्यापासून सॉर्टर्स येऊन त्यांचे वर्गीकरण करतात. साडेपाच-सहा च्या दरम्यान पेपर टाकणारी मुले आपापल्या सायकल्स, बाईक वरून ही वर्तमानपत्रे घरोघरी टाकायला घेऊन जातात. हे काम एवढे शिस्तीत चालते की गल्लीच्या कुत्र्यांना पण ह्या लोकांची सवय झाली आहे. तर अशा परिस्थितीत आम्हाला अगदी घरबसल्या विविध पेपरवाल्यांचा सहवास मिळत होता. दररोज पहाटे साखरझोपेची दुलई बाजूला सारून नित्यकर्माला लागण्यासाठी ह्या पेपरवाल्यांच्या आवाजाचा, त्यांच्या गप्पांचा , त्यांच्या मोबाईलवरून केलेल्या संभाषणांचा फार फायदा होई. आमच्या पहिल्या मजल्यावरच्या घरात त्यांच्यापैकी कोणी शिंकले तरी खणखणीतपणे ऐकू येई. आजीबाई सर्व पेपरवाल्यांची वर्दळ संपली की इमारतीच्या दारातच सकाळची कोवळी उन्हे खात एका तरटावर बसून पेपर विकायला सज्ज होत असत. शिवाय त्यांची नजर चौफेर असे.... त्यामुळे कोठे काय चालले आहे ह्याची बऱ्यापैकी खबर त्यांना लागलेली असे. एक दिवस आजीबाई अचानक आजारी पडल्या. एक-दोन महिन्याचे हॉस्पिटलाचे दुखणे झाले आणि आजीबाईंची प्राणज्योत मावळली. त्यांच्या घरच्यांनी पेपर एजन्सी बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसरेच दिवशी आमच्याकडे अजून एक पेपर एजंट आला. (ह्या एजंटांना कसा सगळा पत्ता लागायचा कोणास ठाऊक! ) चांगल्या झुबकेदार मिशा, कपाळाला टिळा, अंगात शर्ट -पँट, काखोटीला चामड्याची बॅग, पायात वहाणा अशा वेषातला हा एजंट बोलण्यावरून शिकलेला वाटला. झाले! त्याने दुसऱ्या दिवशीपासून पेपर टाकायचे ठरले. त्याच्या भेटीत त्याने सांगितले होते की तो रीयल इस्टेट एजंटपण आहे, दुधाचा ही धंदा आहे इत्यादी इत्यादी. खरे तर आपल्या पेपरवाल्याची कोण एवढी चौकशी करतो! पण त्याने आपण होऊनच ही माहिती दिली. त्या नंतर सुरू झाला एक मजेदार अनुभव! आमच्या मातुःश्रींचे व पेपर टाकायला येणाऱ्या मुलाचे वारंवार खटके उडू लागले. कधी तो दाराच्या बाहेर कोणीही उचलून न्यावा अशा पद्धतीने पेपर टाकत असे तर कधी त्याला उशीर होत असे. मातृदैवताला सकाळी साडेसातच्या आत वर्तमानपत्र वाचण्याची सवय असल्याने तिला हा उशीर जराही खपत नसे. मग काय! आई तो यायच्या वेळेला दबा धरूनच बसत असे आणि तो अवतरला की त्यांची किरकोळ हुज्जत रंगत असे. मग एक दिवस कंटाळून आईने त्या पेपर एजंटचा फोन नंबर धुंडाळून थेट त्याच्याकडेच तक्रार केली. दुसऱ्या दिवसापासून आमचा पेपर वेळेत येऊ लागला, दारात लोळत पडण्या ऐवजी कडी-कोयंड्यात खोचला जाऊ लागला. पण मग त्या महिन्यापासून पेपरचे बिल येणेच बंद झाले. आमच्या पांढरपेशा मनांना ही गोष्ट सहन होणारी नव्हती. अशी उधारी ठेवायची म्हणजे काय! आपल्याला अशा गोष्टी जमत नाहीत आणि ती वस्तुस्थिती आहे! अखेर रात्रीच्या निवांत झोपेचा प्रश्न आहे, राव! आपण कोणाचे देणे लागतो ह्या विचारानेदेखील आमची झोप उडते. तर अशा आमच्या ह्या वर्तमानपत्राचे बिल घेण्यास उदासीन पेपर-एजंटला आईने अनेक निरोप धाडले, फोन केले. त्याचे उत्तर ठरलेले, "ताई, काय घाई आहे! घेऊ की निवांत बिल, कुठं पळून का जातंय... " त्याच्या अशा उत्तरांनी आम्ही अजूनच अस्वस्थ होऊ लागलो. दरम्यान येथील रीयल इस्टेट वाल्यांचे राजकारणी व गुंडांशी असलेले संबंध कोणीतरी मोठ्या अक्कलहुशारीने आमच्या कानी घातले होते. मग तर काय! आम्हाला दरदरून घाम फुटायचाच काय तो शिल्लक राहिला. न जाणो हा पेपर एजंट कोणत्या गँगचा माणूस असला तर? तो उद्या-परवा कर्जवसुलीसारखी दारात माणसे घेऊन उभा ठाकला तर? निरनिराळ्या हिंदी पिक्चर्समधील असे गावठी गुंड, त्यांची दहशत वगैरे सीन्स आमच्या चक्षूंसमोर तरळू लागले. घरापासून पाच-दहा मिनिटांच्या अंतरावर एक खाटिकखाना आहे. तिथे घेऊन जाणाऱ्या बकऱ्या, बोकडांमध्ये आम्हाला आमचे चेहरे दिसू लागले. शेवटी आम्ही गृह-सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला.... पेपरवाला बदलायचा.... आमच्याकडे पेपर टाकणाऱ्या पोराकडे निरोप दिला. तो तर हसायलाच लागला. झाले! आमच्या छातीचे ठोके चुकले. दुसऱ्याच दिवशी त्या पेपर एजंटचा फोन आला.... "ताई, काय नाराज आहात का आमच्यावर? जाऊ की घेऊन बिलाचे पैसे निवांत! तुम्ही नका काळजी करू!" (त्याने सबंध वर्ष बिलाचे पैसे घेतले नव्हते!)
पण आमचा निर्णय ठाम होता. एकतर बिलाचे पैसे घे, नाहीतर पेपर टाकणे बंद कर. आम्ही दुसरा पेपरवाला शोधतो. काहीसे कुरकुरतच त्याने फोन ठेवून दिला. पुढचे दोन दिवस पेपर आला नाही. एरवी सकाळी सकाळी पेपर दृष्टीस पडला नाही की अस्वस्थ होणारी आमची आई कधी नव्हे ते पेपर आला नाही म्हणून आनंदात होती! दोन दिवसांनी शेजारील फ्लॅटमध्ये पेपर टाकणाऱ्या नव्या पेपर-एजंटला सांगून पुन्हा आमच्याकडे पेपर सुरू झाला. त्या आधीच्या पेपरवाल्याने अजूनही बिल दिले नव्हते व बिलाचे पैसेही नेले नव्हते. वाटले, लवकरच तो बिलासकट हजर होईल. पण छे! तिसऱ्या दिवशी त्याच्या पेपर टाकणाऱ्या मुलाने आधीप्रमाणे पुन्हा आमच्याकडे पेपर टाकायला सुरुवात केली.
जणू काही मधल्या काळात काहीच घडले नव्हते! आता मात्र अती झाले होते. एकाच वेळी घरात दोन-दोन पेपर एजंट कडून पेपर येत होते! पुन्हा एकदा आमची गोलमेज बैठक झाली. दुसऱ्या दिवशी आई पेपरवाल्याच्या प्रतीक्षेत दबाच धरून बसली. तो आल्यासरशी त्याला 'का टाकतोस आता पेपर? ' म्हणून फैलावर घेण्यात आले. त्यावर तो मुंडी हालवत, हसत 'तुम्ही आमच्या मालकांनाच विचारा' असे म्हणून खांदे उडवित निघून गेला....!!!!! मालक अर्थातच फोनवर उपलब्ध झाले नाहीत!
आता रोज आम्ही दोन-दोन पेपर्स चा संशयी मनाने आनंद लुटतो. कदाचित आमचा आधीचा पेपर एजंट येईल, बिलाचे पैसे घेईल, कदाचित घेणारही नाही. आमच्या दमल्या थकल्या मनांनी त्याच्या वागण्याचे कोडे उलगडविण्याचे तूर्तास रहित केले आहे. रात्री झोपेत पेपरच्या गठ्ठ्यांखाली आपण गुदमरत आहोत असले काही स्वप्न पडल्यास आम्ही त्याचा विचार न करण्याचा प्रयत्न करतो. कसली वर्गणी मागायला कोणती तरुण मंडळे आली की 'आली आपल्या पेपर एजंटची माणसं! ' असा डरपोक विचार आम्ही अजिब्बात म्हणजे अजिब्बात करत नाही. त्यांना जुजबी पैसे देऊन वाटेला लावतो. वेळप्रसंगी घरात कोणीच नसल्याचा बहाणा करतो. आणि रोज देवाकडे आमच्यासारखा उदार, कनवाळू पेपर एजंट इतर कोणालाही न मिळो म्हणून कळकळीने प्रार्थना करतो. न जाणो देव ऐकेल आणि पुन्हा एकदा आमच्या राज्यात सर्व काही आलबेल होऊन आम्ही सुखाने झोपू लागू!
Friday, December 04, 2009
असे जाहले सुलेखन!
दाराची बेल वाजली, दार उघडले तर शेजारच्या जोशीकाकू उभ्या होत्या. त्यांना कसलासा पत्ता हवा होता. एका कागदाच्या चिटकुर्यावर तो पत्ता मी घाईघाईने लिहून दिला. सहजच त्यांची नजर माझ्या हस्ताक्षराकडे गेली व त्यांच्या तोंडून उत्स्फूर्त उद्गार निघाले, "काय सुंदर हस्ताक्षर आहे हो! अगदी मोत्यासारखं... आमच्या मीताला शिकवा ना जरा... तिच्या बाई तक्रार करत होत्या तिच्या हस्ताक्षराबद्दल!" मी काकूंना मीताला तिच्या हस्ताक्षराबाबत मदत करायचे आश्वासन दिले खरे, पण त्यांनी केलेल्या कौतुकाने ह्या बोटांना ज्या ज्या लोकांनी उत्तम वळणाचे, शिस्तीचे आणि सौन्दर्याचे 'अक्षर'दान दिले त्यांच्या त्या अथक प्रोत्साहनाला मनाने उत्स्फूर्त अभिवादन केले.

Thursday, November 26, 2009
द्रोण पत्रावळींच्या खादाड आठवणी

Friday, November 20, 2009
पावसात चिंब व्हावे
Wednesday, November 18, 2009
सिंहगडावर चढाई! एक प्रत्यक्ष अनुभव!
असेच आम्ही मित्रमैत्रिणी जूनच्या एका रविवारच्या भल्या सकाळी सारसबागेपाशी सिंहगडाकडे नेणाऱ्या एस. टी. च्या प्रतीक्षेत एकत्र जमलो होतो. एरवीचा, आरामात आपापल्या गाड्यांनी सिंहगडाच्या वाहनतळापर्यंत थेट पोहोचून शरीराला फारसे कष्ट न देता निसर्गनिरीक्षण व खादाडी करून परत फिरण्याचा राजमार्ग त्यागून आमच्याचपैकी कोण्या बहाद्दराच्या सुपीक डोक्यातून असे 'वेगळे' आऊटिंग करण्याची अफलातून कल्पना चमकली होती. सगळेजण मोठ्या उत्साहात निघाले तर खरे, पण आम्हाला गडाच्या पायथ्याशी सोडून एस. टी. धुरळा उडवीत जणू वाकुल्या दाखविल्याप्रमाणे अंतर्धान पावली तशी एकेकाने वर गडाकडे दृष्टिक्षेप टाकला आणि एक दीर्घ श्वास घेत मोठ्या धैर्याने गडचढणीस आरंभ केला!
आमच्या कंपूमध्ये साधारण पंचेचाळीस वर्षाची प्राजक्ताची मावशी, अशोकच्या शेजारी राहणारे करंदीकर आजोबा, परागची वय वर्षे १४ व १२ ची २ भाचरे आणि आम्ही १०-१२ मित्रमैत्रिणी असे वैविध्यपूर्ण लोक ठासून भरले होते. मावशींचे वजन जरा अंमळ जास्तच होते, पण त्यांचा उत्साह लाजवाब होता. पाठीवरच्या सॅकमधील पाण्याच्या बाटल्यांचे ओझे सांभाळत सांभाळतच आम्ही मार्गक्रमणा करीत होतो. माझा 'गिर्यारोहणाचा' अनुभव म्हणजे अधून मधून कधीतरी टंगळमंगळ करीत आरामात पर्वती चढणे. म्हणूनच की काय, मराठी मावळ्यांच्या ताकदीला आणि काटकपणाला मनोमन अभिवादन करीत मी घाम पुसत पायऱ्या चढत होते. आमच्यातील ४-५ सराईत वीर माकडांप्रमाणे टणाटणा उड्या मारत पाहता पाहता झपाझप दिसेनासे झाले. एव्हाना आमची विभागणी साधारण ३ गटांमध्ये झालेली! रोजच्या व्यायामाची सवय असलेला, उत्साही गट; मध्यममार्गाचे अनुसरण करणारा आशावादी गट आणि सगळ्यांत मागे असलेला, पाय ओढत - धापा टाकत रेंगाळत चालणारा दिरंगाई गट. अस्मादिकांची वर्गवारी कोणत्या गटांत झाली हे सुज्ञांस सांगणे नलगे!
२०-२५ मिनिटांच्या दमछाक करणाऱ्या चढणीनंतर प्राजक्ताच्या मावशीने अचानक वाटेतच बसकण ठोकली. "पुरे झालं बाई आता! माझ्यात काही अजून वर चढण्याची ताकद नाही! " घामाने डबडबलेल्या मावशी धपापल्या. आजूबाजूला कोंडाळे करून उभ्या आमच्या डोळ्यांसमोर मात्र आता या भारदस्त महिलेस उचलून वर न्यावे लागणार की काय ह्या कल्पनेने भरदिवसा काजवे चमकले. "मावशी, तुम्ही आधी जरा पाणी प्या आणि शांत व्हा पाहू! प्राजक्ता, अगं मावशींना वारा घाल म्हणजे थोडं बरं वाटेल त्यांना!" आमच्यातील एक हुशार वीर उद्गारले. आमचा घोळका अडेल म्हशीसारखा जागीच हंबरत थबकल्याचे लक्षात येताच पुढच्या वळणावर पोहोचलेले काही जण "काय झाले? "सदृश खाणाखुणा करीत पुनश्च माघारी आले. थोडावेळ प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण चांगलीच रंगली. "मावशी, दम गेला का आता? चला, आम्ही बरोबर आहोत तुमच्या... लवकर निघालो की लवकर पोचू वर! " अशा धीराच्या बोलण्याने मावशींची समजूत काढत आमचा तांडा तेथून मार्गस्थ झाला.

लिटरच्या लिटर पाणी ढोसत, मांड्या - पोटऱ्यांच्या बंडाकडे साफ दुर्लक्ष करत, बरगड्यांजवळून येणाऱ्या कळांना मराठ्यांच्या शौर्याची शपथ देत व मनातल्या मनात घरी परतल्यावर रोज सकाळी नियमित व्यायामाचा सुनिश्चय बाळगत आम्ही स्वतःला पुढे ढकलत होतो. करंदीकर आजोबा मात्र तुडतुडीत हरणाच्या चपळाईने आमच्या पुढे होते. मध्येच दीपाला चक्करल्यासारखे झाले. लगेच तत्परतेने अजून एक 'ब्रेक' घेण्यात आला. कोणी तिला आपली धूळ व आणखी कशाकशाने माखलेली पादत्राणे हुंगविली, कोणी लिमलेटच्या गोळ्या चारल्या तर कोण्या स्वयंघोषित 'डॉक्टर'ने तिला 'अमुक ऍक्युप्रेशरचा पॉंईंट दाब म्हणजे बरे वाटेल' इत्यादी मौलिक सूचना दिल्या. एव्हाना उन्हे चांगलीच कडकडली होती. अनेक सराईत व नवखे हौशे गौशे गडप्रेमी आमच्या एकमेकांना रेटत मुंगीच्या गतीने सरकणाऱ्या कडबोळ्याकडे मिष्किलपणे पाहत आम्हाला मागे टाकून सरसर पुढे जात होते. आमच्या जवळून जाणाऱ्या एका ग्रामस्थाच्या डोईवरील पाटीत दह्याची मडकी आहेत हे कळल्यावर आम्हाला साक्षात अमृतकुंभ गवसल्याचा आनंद झाला. बाजूच्या झाडाच्या सावलीत हाश्शहुश्श करीत देह लोटून देत आम्ही एकदिलाने दह्याचा फन्ना उडविला. आमची गलितगात्र अवस्था पाहून त्या ग्रामस्थालाही दया आली असावी. कारण आपल्या पाटीत रिकामी मडकी गोळा करून जमा झालेले पैसे कनवटीला बांधताना तो गालातल्या गालात हसत म्हणाला, "आता येकदम थोडक्यावर राह्यला बघा गड!" त्याच्या शब्दांनी काय धीर आला म्हणून सांगू! अंगात जणू हजार हत्तींचे बळ संचारले. जणू नरवीर तानाजी मालुसरेंच्या अपार शौर्याची पुसटशी झुळूक आम्हा थकल्याभागल्या व पस्तावलेल्या वीरांना अखेरच्या टप्प्यासाठी आवश्यक ताकद देत होती!
अखेर तो सुवर्णक्षण आला! ज्या पळाची आम्ही मनापासून आसुसून वाट पाहत होतो, जे सिंहगडाच्या मुख्य दरवाज्याचे व वाहनतळाजवळील पिठलंभाकरी, कांदाभजी विकणाऱ्या टपऱ्यांचे चित्र मनःचक्षुंसमोर रंगवीत आम्ही तो विशाल भूखंड पादाक्रांत केला होता ते सारे सारे आमच्या नजरेच्या टप्प्यात आले. मावशीबाईंनी तर मोठा नि:श्वास टाकून त्यांचा देह एका टपरीबाहेरच्या प्लास्टिकच्या खुर्चीत लोटून दिला. आमच्या अगोदर गडावर पोहोचलेली मंडळी खाऊनपिऊन, विश्रांती घेऊन गडावर फेरफटका मारून येण्याच्या बेतात होती. त्यांना मानेनेच 'जा' अशा अर्थी खुणा करून आम्ही श्रांत क्लांत जीव श्वास पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा करण्यात मग्न होतो. अचानक आमच्यातील कोणीतरी किंचाळले, "ए, ते बघ, काय सॉल्लिड देखावा आहे!" चमकून आमच्या सर्वांच्या नजरा समोर वळल्या, आणि खरेच की! ज्या निसर्गरम्य डोंगररांगांना व वृक्षराजीला पाहण्याच्या अट्टहासापायी आम्ही हा थोर पराक्रम केला होता, ते सारे सृष्टीचे सुंदर स्वप्न आमच्या नजरांपुढे सुहास्यवदनाने उभे ठाकले होते. संपूर्ण चढणीत ह्या 'आरोहण' कल्पनेच्या आमच्या टोळक्यातील 'शिल्पकारा'वर मनस्वी सूड घेण्याचे माझे सर्व बेत तात्काळ तिथल्या तिथे मावळले आणि परतीच्या उतरणीपेक्षाही अधिक वेगाने मन पुढच्या प्रवासाचे बेत आखू लागले.
-- अरुंधती






