Friday, February 26, 2010

" मानसपूजा "



श्रीमत्‌ शंकराचार्यकृत ‘मानसपूजे' चा कवी विनायककृत अनुवाद


चराचरी तू, आवाहन ये काय तुझ्या कामी ?
सकलाधारा, द्यावे तुजला काय आसना मी ?।
निर्मल जो त्या, केले ठरती
अर्घ्यपाद्य वाया,
कर वाहेना, आचमन तुला शुद्धाला द्याया ॥१॥

घालू कैसे, तुला निर्मला देवा!स्नानाते?
विश्वोदर तू, तुला वहावा पट कवण्या हाते ?।
निरालंब तू,उपवीताचे महत्त्व तुज नाही,
नसे वासना, फुले सुवासिक निष्फल त्या ठायी ॥२॥

गंधाची थोरवी, कोणती नसे लेप ज्याला,
स्वता रम्य तू, फिकी तुजपुढे पडे रत्नमाला।
सदा तृप्त तू, नैवेद्याची काय तुला वाणे,
विभो! तुष्ट तुज, कसे करावे म्या तांबूलाने ? ॥३॥

नसे अनंता, प्रदक्षिणेचे बल माझ्या ठायी,
अभिन्न तू मी, मग कवणाच्या लागावे पायी?।
तुजला स्तविता, हात टेकिले जेथे वेदांनी,
कशी टिकावी, तेथे वाणी मग बापुडवाणी ? ॥४॥

स्वयंप्रकाशी, काय त्यापुढे नीरांजनज्योती ?
विसर्जन तुला कोठे ? विश्वे नांदविसी पोटी ॥५॥

कळून सारे, सजलो देवा! तुझ्या पूजनासी,
भय न लेकरा, वाटे जाया निजजनकापाशी
चुकले मुकले, शब्द मुलाचे गोडच जनकाते
बालिश लीला, बघून त्याच्या मनी हर्ष दाटे ॥६॥

अजाण मी लेकरू, तुजकडे जनकाचे नाते,
तव सेवेचा, देवा! ओढा असे मात्र माते।
येईल तैशी, करतो सेवा गोड करूनि घ्यावी,
पुण्यपदाची जोड, वत्सला! विनायका द्यावी ॥७॥


आद्य शंकराचार्य यांनी संस्कृतमध्ये केलेल्या ‘मानसपूजा‘ या स्तोत्राचा कवी विनायक यांनी अनुवाद केला.

'विनायकांची कविता' या चित्रशाळेने १९५५ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात ती आहे. संपादन प्रा. भ. श्री पंडित यांचे आहे.

माझ्या आजी-आजोबांना ही मानसपूजा अतिशय प्रिय होती. ते स्वत: तर म्हणायचेच आणि आम्हां मुलांकडूनही म्हणून घ्यायचे. त्यांच्या आवाजात ऐकल्यामुळे व ह्या काव्यातील उपजत माधुर्यामुळे ही मानसपूजा सदैव स्मरणात राहील.

Wednesday, February 24, 2010

कथेकरी, टाळकरी व मृदंगकरी

ही कथा आम्हाला बालपणी आमची आजी सांगायची.
आजीचा जन्म, संगोपन कोंकणात झाले. त्यामुळे तिला त्या भागात प्रसिद्ध असलेल्या बऱ्याच कथा, कहाण्या तोंडपाठ असायच्या. ती होतीही गोष्टीवेल्हाळ. त्यामुळे सर्व कहाण्या चटकदार करून, रंगवून रंगवून सांगायची. रात्रीची जेवणे आटोपली की आम्ही मुले आजीभोवती 'गोष्ट सांग, गोष्ट सांग' करत पिंगा घालायचो. मग तिच्या गोधडीत शिरून, मांडीवर डोके ठेवून तिने सांगितलेल्या साभिनय गोष्टींची सर लिखित गोष्टीला येणार तरी कशी? पण तरीही ही मजेशीर गोष्ट बालगोपाळांना व मोठ्यांनाही नक्कीच आवडेल! कोकणी कथा असल्याने अर्थात तिची खरी खुमारी रात्रीच्या गुडुप्प अंधारात ऐकताना येते.

*****************************************************************************
कथेकरी, टाळकरी व मृदंगकारी

फार पूर्वी एका छोट्याशा गावात एक गरीब कुटुंब रहायचं. घरात जेमतेम दोन वेळा कसंबसं पोटात पडेल इतपत उत्पन्न यायचं. कुटुंबात तीन लहान लहान मुलं व त्यांची आई राहायचे. मुलांची आई अतिशय कष्टाळू, पण चतुर होती. सारे गाव त्यांना सुभद्राकाकू नावाने हाक मारायचे. मुलांचे वडील बराच काळ यात्रेसाठी घराबाहेर गेले असल्याने मुलांचे संगोपन त्यांची आईच करत होती. परसातला भाजीपाला, साठवणीतली तांदूळ आणि थोडे धान्यधुन्य यांवर त्यांची गुजराण चालत असे. कधी कोणाची जास्तीची कामे करून ती माऊली संसाराचा गाडा ओढत होती.
एक दिवस त्या गावात तीन वस्ताद, ठक लोकांनी प्रवेश केला. नव्या नव्या गावांना जायचं, तेथील कोठल्यातरी घरात मुक्काम ठोकून पाहुणचार झोडायचा गावातील सर्व माहिती काढून, ठरवून एका रात्री तिथे दरोडा टाकायचा आणि लूट घेऊन पोबारा करायचा ही त्यांच्या कामाची पद्धत होती.
गावात शिरल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे माहिती काढायला सुरुवात केली. माहितीमध्ये त्यांना सुभद्राकाकूचे पती यात्रेला गेल्याचे कळले. मग काय! त्यांचे निम्मे कामच झाले! थोड्या वेळातच ठक मंडळी सुभद्राकाकूच्या दारात हजर झाली.
आल्यासरशी त्यांनी सुभद्राकाकूच्या यजमानांना यात्रेच्या वाटेत भेटल्याची बतावणी केली व यजमानांच्या आग्रहाखातर आपण सुभद्राकाकूंच्या घरी पाहुणचार घ्यायला आल्याचे सांगितले.
आता सुभद्राकाकूला चांगले माहीत होते की आपली एवढी गरीबीची परिस्थिती असताना आपला नवरा कोणाला असा आग्रह करणार नाही. पण दारी आलेल्या पाहुण्यांना नाही तरी कसे म्हणणार? तिने मुकाट्याने त्यांना घरात घेतले. ओसरीवर त्यांच्या मुक्कामाची सोय केली.
ह्या खेपेला ठक मंडळींनी कथेकरी, टाळकरी व मृदंगकऱ्याची सोंगे घेतली होती. कथेकरी बुवा एकतारीच्या सुरावर भजने गाऊन लोकांना पुराणातील कथा ऐकवी आणि टाळकरी त्याला टाळ वाजवून तर मृदंगकारी मृदंग वाजवून साथ करत असे. रोज संध्याकाळी गावाबाहेरच्या देवळात सर्व गावकऱ्यांना जमवून ते नवनव्या कथा ऐकवत आणि त्या मिषाने गावकऱ्यांच्या हालचालींची, पैशाअडक्याची माहिती काढत.
एक-दोन करत चांगले सात-आठ दिवस गेले तरी पाहुणे मंडळी मुक्काम हालवायचं चिन्ह दिसेना. घरातील साठवणुकीचं धान्यपण संपत चाललं. शिवाय त्या पाहुण्यांचं वागणं, आपापसातलं कुजबुजणं, रात्री-बेरात्री गावात चक्कर मारणं सुभद्राकाकूला काही ठीक वाटेना. त्यांना खायला घालून घालून घरात मुलांनादेखील अन्न उरत नसे. पण ह्या नको असलेल्या पाहुण्यांना घालवायचं कसं?
विचार करता करता तिला एक युक्ती सुचली. तिनं आपल्या मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांना ही युक्ती सांगितली. मुलं सुद्धा रोजरोजच्या पाहुण्यांच्या मागण्यांना, त्यांची कामे करण्याला कंटाळली होती. आईची युक्ती ऐकताच त्यांचे चेहरे उजळले आणि मुलं त्या आगंतुक पाहुण्यांची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहू लागली.
इकडे ठक मंडळींनी त्या रात्री अमावास्या आहे हे हेरून गावात दरोडा टाकायचा बेत केला होता. त्यासाठी साहित्याची जमवाजमव करायला ते सकाळपासून बाहेर गायब झाले होते. त्यांचा रात्रीच्या अंधारात गावातील सोनंनाणं लुटून पळ काढायचा मनसुबा होता.
दुपारच्या जेवणाची वेळ झाली तसे तिन्ही पाहुणे त्यांचा फेरफटका, गुप्त तयारी आटोपून सुभद्राकाकूच्या ओसरीवर परत आले. बाहेरूनच त्यांनी आत चाललेले संभाषण ऐकले.
मोठा लेक सुभद्राकाकूला विचारत होता, "आई, आज अमुशा (अमावास्या) आहे ना? तू आमच्यासाठी आज काय खास जेवण बनवणार?"
त्यावर सुभद्राकाकू उत्तरली, "अरे लब्बाडा, तुला एवढी कसली रे घाई? आज मी तुमच्यासाठी किनई खास खास बेत केलाय जेवणाचा.... पण तुम्हाला सांजच्यापर्यंत वाट पाहायला लागेल!! "
ठकमंडळी जेवायला बसली तशी सुभद्राकाकू त्यांना वाढता वाढता म्हणाली, " आज अमुशेला आमच्या गावात बळी देतात, त्याचं वेगळं मसाल्याचं, वाटणाचं जेवण असतं.... " पाहुण्यांच्या तोंडाला तर एकदम पाणीच सुटलं. त्यांना रात्र कधी एकदा येते असं झालं....
जसजसा दिवस कलू लागला तसतशी सुभद्राकाकूच्या घरात लगबग सुरू झाली. "अरे परशा, त्या विळ्याला आणि चाकूला धार आहे का बघ रे नीट!" "अगं गोदे, ते वाटण नीट वाट बरं....त्यात पाणी नको घालूस फार! आज सांजच्याला खासा बेत आहे ना! " घरात मसाल्याचे खमंग वास सुटले होते. पाहुण्यांच्या पोटात त्या वासानेच कावळे कोकलू लागले होते.
संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, अंधार पडला. रातकिडे किर्र किर्र आवाज करू लागले. अमावास्येमुळे आकाशात चंद्र नव्हता. सगळीकडे काळोख. सुभद्राकाकूचे घर गावात जरा एका बाजूला होते. ताडामाडांच्या गर्द सावल्यांनी पार झाकलेले. तिथे तर चिडीचूप अंधार पसरलेला. घरात चुलीचा काय तो जाळ आणि एक मिणमिणती चिमणी. सुभद्राकाकूच्या भोवती तिची तिन्ही मुले कोंडाळं करून बसलेली. त्यांच्या सावल्या भेसूरपणे समोरच्या भिंतीवर उमटलेल्या. चार गावचं पाणी प्यायलेल्या ठक मंडळींच्या मनातही त्या सावल्या पाहून अस्वस्थ चलबिचल सुरू झाली.
तेवढ्यात बाहेर कोठेतरी एक कुत्रे केकाटले. इतर कुत्री पण ओरडू लागली. वटवाघूळ चिरकले. ठकांच्या छातीत उगीचच धडधड सुरू झाली. इतक्यात त्यांना पुन्हा एकदा सुभद्राकाकू आणि तिच्या तिन्ही पोरांचे संभाषण कानावर पडले.
"आई, मी तर कथेकऱ्याला खाणार... तू त्याला भाजणार की तळणार? "
"आई, मला टाळकरी बुवा खायला फार मजा येईल. त्याला तू केलेला मसाला लावला की काय मस्त चव लागेल! "
"ए आई, मलाच का तो मृदंगकारी बुवा? कसला लुकडा आहे तो! माझं कसं भागणार त्यानं? मला टाळकरी बुवाच हवा! चांगला खमंग भाज त्याला!! "
ह्यावर सुभद्राकाकूचं उत्तर, "बाळांनो, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला आज मी जस्सं हवं तस्सं, हवं ते बनवून देते, मग तर झालं? आज अमुशेचा बळी आपल्या घरातून आहे हे पाहुण्यांना माहीत नाही बहुतेक! ते आले की मी लागतेच पुढच्या कामाला..... परशा, तो चाकू आणि मोठा सुरा काढून ठेवलाय, तो आणून दे रे मला! "
मायलेकरांचा हा संवाद ऐकून कथेकरी, टाळकरी व मृदंगकारी बुवांची मात्र पाचावर धारण बसली. टपाटपा घाम गळू लागला, भीतीनं श्वास घेता येईना, डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. त्यांच्या डोळ्यांसमोर सुभद्राकाकू हातात धारदार चाकू घेऊन आपल्याला भाजताना, तळताना आणि वाटण लावतानाचे दृश्य दिसू लागले. आता फार काळ इथे थांबलो तर आपली धडगत नाही हे त्यांनी ओळखलं आणि रात्रीच्या अंधारात बाहेरच्या बाहेर पोबारा केला.
आपले पाहुणे पळून गेल्याची खात्री केल्यावर सुभद्राकाकूने मुलांची पाने घेतली. तिच्यासमोर परातीत कणकेचे तीन उंडे होते. त्यातल्या 'कथेकरी बुवा' नाव दिलेल्या उंड्याला तिने भाजायला घेतले आणि विचारले, "कथेकऱ्याला कोण खाणार होतं? " उत्तरादाखल मुलं फक्त खुसुखुसू हसली.
त्या रात्री गावातील लोकांना ठक मंडळींनी दरोड्यासाठी जमा केलेलं सामान, शस्त्रे सापडली आणि ते त्या तिघांना पकडायला सुभद्राकाकूच्या दारात आले. पण तिच्याकडे आल्यावर तिने आणि तिच्या मुलांनी ठक मंडळींना गावातून कसे अक्कलहुशारीने घालवून दिले ह्याची हकिकत त्यांना समजली. केवळ त्यांच्यामुळे गावावरचा दरोडा टळला होता.
गावच्या खोताने त्यांना तांदळाची दोन पोती बक्षिसाखातर देऊ केली, सुभद्राकाकूला लुगडंचोळी आणि तिच्या मुलांना बक्षीस देऊन सर्व गावकऱ्यांसमोर त्यांच्या अक्कलहुशारीचे व प्रसंगावधानाचे कौतुक केले. अशा तऱ्हेने सुभद्राकाकूच्या व तिच्या मुलांच्या हुशारीमुळे साऱ्या गावावरचे संकट टळले.
-- अरुंधती

Sunday, February 21, 2010

वारुडी


वारुडी गाव म्हणजे पुण्यापासून अक्षरशः काही किलोमीटर्सच्या अंतरावर! पण एकदा कात्रज मागे टाकले आणि गावाकडे जाणारा डोंगरातील वळणावळणाचा, गर्द हिरवाईचा, तीव्र चढाचा रस्ता लागला की वाटू लागते, आपण पुणे शहराच्या खरोखरीच इतक्या जवळ आहोत? ह्या गावी जायला एक परिवहन मंडळाची बस आहे, जी दिवसाकाठी (मी त्या गावी गेले तेव्हा) दोन वाऱ्या करायची व रात्री मुक्कामाला गावातच असायची. बाकी तिथे पोचायचे म्हणजे मोटरसायकल किंवा चारचाकीला पर्याय नाही. चार-पाच वर्षे झाली असतील मी त्या गावाला भेट देऊन. अजूनही ती भेट जशीच्या तशी डोळ्यांसमोर येते.
त्या दिवशी आमच्या एका स्नेह्यांनी वारुडी गावात गावकऱ्यांसाठी एका खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ह्या स्नेह्यांचा वारुडीजवळच स्वतःचा मळा आहे. साहजिकच त्यांना गावातील लोकांविषयी विशेष आत्मीयता आहे. कार्यक्रमासाठी आम्ही एक जीप व दोन मोटारगाड्यांमधून निघालो. जीप व दोन्ही गाड्यांच्या डिक्क्या व यच्चयावत रिकामी जागा सामानाने ठासून भरलेली. काय होते हे सामान? तर सतरंज्या, ऍंम्प्लीफायर्स, इन्व्हरटर, पाण्याच्या बाटल्या, मायक्रोफोन्स, वायरींची भेंडोळी, इमर्जन्सी लॅंप्स आणि संगीत-वादनाचे साहित्य! बरोबर! आम्ही ज्या कार्यक्रमासाठी चाललो होतो त्यात संगीत तर होतेच, शिवाय गावकऱ्यांना स्वदेशीचे, व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगणारे एक कार्यकर्ते व फर्डे वक्ते आमच्याबरोबर होते. गायक - वादक चमूत आम्ही चारजण होतो व बाकी सर्वजण ह्या गावात जाऊन लोकांच्या उपयोगी पडण्यास उत्सुक असे आय. टी. व तत्सम नामवंत क्षेत्रात काम करणारे तरुण, तरुणी.
चारशे - पाचशे उंबऱ्याच्या त्या गावात आम्ही पोचलो तेव्हा सूर्य पश्चिमेकडे कलला होता. गावात सर्वांना जमा करायची एकमेव जागा म्हणजे गावातील देऊळ. त्या देवळातच आम्ही बरोबर आणलेले सर्व सामान ठेवले. आमच्यासमोरच देवळाच्या समोरच्या मोकळ्या जागेत केरसुणी फिरवून थोडा सडा घालण्यात आला. तोवर आम्ही वीजेच्या अपेक्षित गायब असण्यामुळे इन्व्हर्टर, ऍंम्प्स, मायक्रोफोन्स, वायरी यांची जुळवाजुळव करण्याच्या धडपडीत होतो.
अंधार पडला तसा एक कळकटलेल्या वेषातील पुजारी आला व त्याने देवळात दिवाबत्ती केली, घंटानाद केला. जणू सिग्नल मिळाल्याप्रमाणे गावातील लोक देवळासमोरच्या मोकळ्या पटांगणात जमा होऊ लागले. येताना बहुतेकांनी आपापल्या धाबळ्या, सतरंज्या, तरटे आणलेली, तीच अंथरून इतरांनाही बसायला जागा करून देत होती ही मंडळी. आम्हाला बसायला अशी वेगळी जागा नव्हतीच! पण लोकांना कोण बोलत आहे, कोण गात आहे हे तर दिसायला हवे! मग देवळाच्या चिंचोळ्या पायऱ्यांवरच सतरंज्या अंथरल्या. त्यावर गायक, वादक व त्यांची वाद्ये विराजमान झाले. 'साऊंड चेक' झाला. एरवी भोपूसारख्या कर्ण्याची सवय असलेले गावकरी आमच्या आजूबाजूचे ऍंम्प्लीफायर्स कौतुकाने न्याहाळत होते.
बघता बघता पटांगण भरले. आता इमर्जन्सी लॅंप्स व गावकऱ्यांनी पेटवलेल्या मशालींनी सारा परिसर उजळला होता. फारसा विलंब न करता आम्ही गणेशवंदनेने सुरुवात केली. थोड्याच वेळात गावकऱ्यांच्या लक्षात आले की हा आपला नेहमीसारखा भजनाचा कार्यक्रम नाही. कारण ह्यात सर्व धर्मांना अभिवादन होते, ईश्वराला नमन होते आणि सोपे शब्द, सोप्या ठेकेबद्ध चाली यांबरोबरच सर्व गावकऱ्यांना सामील होण्याचे आवाहन होते. हळूहळू मुंड्या डोलू लागल्या, हात टाळ्या वाजवून ठेका धरू लागले, शब्द येवोत वा ना येवोत - कंठ गाऊ लागले.... छोटी मुले लगेच उठून तालावर नाचू लागली. त्यांना पाहून लाजऱ्या बुजऱ्या बाया पदरात तोंड लपवून फिदीफिदी हसू लागल्या. अंधाराचे साम्राज्य असलेल्या गावात स्वरांच्या व भक्तीच्या लडी उलगडू लागल्या. भक्तीमय अशा त्या वातावरणात आलेल्या एका प्रशिक्षकांनी लोकांचे छोटेसे ध्यान घेतले.
ध्यानातून सगळे बाहेर आले तेव्हा रातकिड्यांचा आवाजही खूप मोठा, कर्कश्श वाटत होता. वातावरणात एक अनामिक गंध भरून राहिलेला. मोकळ्या हवेबरोबर येणारा, चुलीचे, गोवऱ्यांचे, शेणाचे, धुळीचे वास गुंफले गेलेला.... देवळात जाळलेल्या कापूर-उदबत्तीच्या वासात मिसळून पल्याडच्या हिरव्या शेतांमध्ये, सळसळणाऱ्या झाडांमध्ये नाहीसा होणारा....
आमच्याबरोबर आलेल्या मान्यवर वक्त्यांनी लोकांशी मोठ्या खुबीने संवाद साधायला सुरुवात केली. पहिल्यांदा कोणी फारसे बोलत नव्हते. पण हळूहळू भीड चेपली जात होती. अनेकांनी मान्य केले की त्यांना गुटखा, तंबाखू, दारूचे व्यसन आहे. त्यात बराच पैका जातो. कर्जपाणी होते. घरी पैका पुरत नाही. तब्येत खराब होते. दवाखान्यात जायचे तरी डोंगर उतरून बरेच अंतरावर जायला लागते. एकेक करत लोक आपल्या समस्या सांगत होते. काहीजण ह्यातून बाहेर यायचंय का विचारल्यावर माना डोलवत होते. काही वेळा त्यांच्या बायका हलकेच फुसफुसत होत्या. एकमेकींना 'तू बोल, तू बोल' करत होत्या. दोन-चार म्हाताऱ्या आजीबाईंनी तर स्पष्ट शब्दांत सांगितले, तुम्ही लोक आमच्या गावात या, आमच्या पोरांना व्यसनातून बाहेर काढा, त्यांना चार चांगल्या गोष्टी शिकवा.... आम्ही तुमच्याबरोबर आहोत!!!
दुसऱ्या दिवशीपासून गावकऱ्यांसाठी विनामूल्य शिबिर घ्यायचे ठरले. त्यात त्यांना आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती, ध्यान, प्राणायाम व एकमेकांशी सुसंवाद कसा साधता येईल यांचे प्रशिक्षण मिळणार होते.
पुरुषांचा उत्साह तसा यथातथाच होता. पण बायकांच्या गटात बरीच उत्सुकता दिसून येत होती. शिबिराची वेळ संध्याकाळची म्हटल्यावर एकीने धीटपणे पुढे होऊन चुलीसमोरून संध्याकाळी उसंत मिळत नाही, घरातल्यांची
जेवणे झाल्याबिगर बाहेर पडता येत नाही असे सांगितले. मग चार-पाच बायकांमध्ये आपापसांत चर्चा झाली व पुढचे पाच दिवस संध्याकाळचा स्वैपाक आधीच करून ठेवायचे एकमते ठरले. सर्व काही 'फिक्स' झाल्यावर आम्ही दोन- तीन वेगवान चालींची, ठेका धरायला लावणारी भजने गायली व कार्यक्रमाचा समारोप केला. आमच्या ज्या स्नेह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यांनी गावकऱ्यांना प्रसादवाटप केले.
कार्यक्रम संपल्यावर आम्ही पुन्हा आपापल्या सतरंज्या गुंडाळल्या, वाद्यांना आवरणे घातली. मायक्रोफोन्स, वायरी, ऍंम्प्लीफायर्स पॅक केले. देऊळ व त्याच्या आजूबाजूची आमच्या सामानाने व्यापलेली जागा रिकामी केली.
सर्व कार्यक्रम संपल्यावर काही बाया येऊन आमची मोठ्या कुतुहलाने चौकशी करत होत्या, काहीजणी कार्यक्रम आवडला म्हणून लाजत सांगत होत्या. गावातली पुरुष मंडळी आमच्याबरोबर असलेल्या आमच्या पुरुष सहकाऱ्यांशी बोलत होती, शंकांचे निरसन करून घेत होती. गावातून सर्वांचा व रस्त्याच्या एका बाजूला उभ्या रिकाम्या, वस्तीला आलेल्या बसचा निरोप घेऊन आम्ही स्नेह्यांच्या मळ्याकडे कूच केले. तिथे त्यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये आमच्यासाठी गरमागरम पोहे व मसाला दूध अशी व्यवस्था केली होती. रात्रीचे साडेनऊ कधीच वाजून गेलेले... सगळ्यांना आता घरी परतायचे वेध लागले होते. दुसऱ्या दिवशी बहुतेकांच्या नोकऱ्या होत्या. भरभर खाणे आटोपून आम्ही त्यांच्या गोशाळेतून एक चक्कर टाकली. जेमतेम एक महिना वयाची दोन वासरे दंगा करत होती. सर्व देशी गायींना स्पीकर्सद्वारा हळुवार आवाजात 'ओम नमः शिवाय' चा जप चोवीस तास ऐकवायची त्यांची कल्पना पाहून मजा वाटली. बाहेर टिपूर चांदणे पडलेले! त्या चांदण्यात ती गोशाळा, हिरवागार मळा, पत्र्याची शेड आणि बाजूचा डोंगर न्हाऊन निघालेले..... मन तिथून हालायला तयार नव्हते. शहराच्या दगदगीतून एका बाजूला, आपल्याच नादात मस्त असलेल्या ह्या निवांत गावातून पावले चटचट हालत नव्हती. त्यात चांदण्या रात्री मने उजळवून टाकणारा भवतालचा मोहक नजारा....
परत येताना वाटेत ड्रायव्हरने माहिती पुरविली की ह्या डोंगरात बरेच जंगली ससे आढळतात.
डोंगर उतरल्यावर काही अंतर गेल्यावर मग पुन्हा शहराच्या खुणा जाणवू लागल्या...
रस्त्यांवरचे सोडियम व्हेपरचे दिवे, निऑन चिन्हे - फलक उगाचच डोळे जास्त दिपवत आहेत, वाहनांचे हॉर्न्स फार कर्कश्श वाजत आहेत असे वाटू लागले.
त्यांना वारुडीच्या निसर्गरम्य वातावरणातील लयबद्ध संगीताची, चौफेर चांदण्याची व लुकलुकत्या मशालींची सर नव्हती ना!
-- अरुंधती

Tuesday, February 16, 2010

कौतुक! कौतुक!! त्रिवार कौतुक!!!


खर्रच कित्ती कित्ती कौतुक करू ह्या मंडळींचं!! रोज वृत्तवाहिन्यांना "बाईटस" पुरवता पुरवता त्यांना बहुधा लोकांना आणि प्रसिद्धिमाध्यमांना खेळवायची सवय झाली आहे! म्हणूनच कोणता तो खान पाकिस्तानचं तोंडभरून कौतुक करतो, कोणते ठाकरे लग्गेच आक्षेप घेत शरसंधान सुरू करतात, मुख्यमंत्री बाकीची कामं सोडून चित्रपटाला आपली 'अस्मिता' बनवतात, गृहमंत्री गुप्तहेर खात्याच्या धोक्याच्या इशाऱ्यांना झुगारून राज्याच्या सुरक्षेऐवजी चित्रपटाच्या व चित्रपटगृहांच्या सुरक्षेमागे लागतात, 'जोडे' उचलणारे मंत्री 'जोडीने' चित्रपट दुसऱ्यांदा, जाहिरात करून बघतात, सगळे मान्यवर मंत्रीमहोदय कार्यालयीन कामकाज सोडून चित्रपटगृहांमध्ये हजेरी लावतात, समस्त पोलिसयंत्रणा त्यासाठी युद्धपातळीवर राबवली जाते आणि जिथे पोलिसांनी असायला, पहारा द्यायला हवे होते तिथे पोलिस सापडतच नाहीत मुळ्ळी!!! कस्से फसवले त्या दहशतवाद्यांना!!!!! आहे ना गंमत? का s s य डेअरिंग आहे नाही आपल्या सरकारचं? बघा, कशी छाती फुलवून सांगत होते.... टाप झाली का कोणाची त्या खानाच्या नखाला धक्का लावायची!! त्यांना आता ह्या वर्षीचे सर्व पद्म पुरस्कार जाहीर करा, अनुदाने द्या, आदर-सत्कार करा त्यांचे! अहो, लोकांचे प्राण काय, रोजच जात असतात! कधी शेकड्यात, कधी हजारात. कधी आजारात, कधी अपघातात, कधी आत्महत्यांमध्ये नाहीतर कधी घातपातात! त्यात नवल ते कसलं? पण अशा चित्रपटदर्शनाच्या गोष्टी वारंवार होतात का बरं? आणि आता लावली आहे ना 'सिक्युरिटी' त्यांनी जर्मन बेकरी, कोरेगाव पार्क जवळ.... हां, बॉम्बस्फोट होऊन गेला म्हणून काय झालं? दहशतवाद्यांशी संबंधित कोणी तिथं पुन्हा आपल्याला कसं पकडताहेत, किंवा काय काय नुकसान झालं हे बघायला आलं तर? त्यांना लग्गेच अटक करायला नक्को का तिथं पोलिस यंत्रणा? म्हणूनच सर्वांच्या अक्कलहुश्शारीचं कौतुक कित्ती बाई करू? माझ्याकडे शब्दच नाहीत.... आता त्यांना ह्या वर्षीच्या सर्व जागतिक पुरस्कारांसाठी आपण पुढं करु....
--- अरुंधती

Saturday, February 13, 2010

कोकणप्रवास असाही!

"ए भाऊ, अरे किती गुटखा खाशील! चांगला नाही बरं तब्येतीला. तू ऐक माझं.. सोडून दे असली वाईट सवय! अरे, तरुण वय आहे तुमचं, ह्या वयात कशी रे अशी व्यसनं करता पोरं तुम्ही! ते काही नाही, तू आजपासून गुटखा कमी करायचास.... "
आमच्या अंदाजे वय वर्षे पासष्टच्या प्राध्यापिकाबाई आमच्या कोकणप्रवासासाठी भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्सच्या चालकाला खडसावत होत्या. त्यांचेही बरोबर होते म्हणा! जेमतेम तेवीस-चोवीस वय असेल त्याचं... आणि दर अर्ध्या तासाला एक गुटख्याची पुडी त्याच्या तोंडात रिकामी होत होती. पुढे प्रवासात त्याची इतर माहितीही समजली. बालाजी त्याचं नाव. शिक्षण दहावीपर्यंत असावं. पोटापाण्यासाठी दक्षिणेकडच्या एका छोट्याशा गावातून पुण्यात आला, ड्रायव्हिंग शिकला, परवाना मिळवला आणि प्रवासी कंपनीच्या ट्रॅक्स गाड्यांसाठी चालकाच्या नोकरीवर रुजू झाला. दर महिन्याला गावी पैसे पाठवायचे की झाले! ह्या नोकरीतच त्याला गुटख्याचे व्यसन लागले. पण आमच्या प्राध्यापिकाबाईंच्या प्रेमळ समजावण्यानंतर त्याने गुटखा खाणे कमी करण्याचे वचन त्यांना दिले.
आमच्या ह्या प्राध्यापिकाबाईंची हीच तर खासियत होती व आहे. बोलण्यातील आर्जव, मृदुता व कळकळ यांमुळे त्या आजही विद्यार्थीप्रिय आहेत. त्यांच्या व्यासंगाविषयीतर काय सांगावे! आज त्यांच्या क्षेत्रातील अतिशय मान्यवर व विद्वान संशोधक म्हणून त्यांची ख्याती आहे.
तर अशा ह्या आमच्या लाडक्या प्राध्यापिकाबाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आठ विद्यार्थी हरिहरेश्वर - महाड - पाली प्रवासास ऐन पावसाळ्यात निघालो होतो. अभिमत विद्यापीठात आपापले नित्य अभ्यासक्रम, नोकऱ्या सांभाळून हौसेने शिकायला येणाऱ्या आमच्या ह्या ग्रुपमधील लोकसुद्धा अतिशय उत्साही. दर आठवड्याला किंवा महिन्यातून एक-दोनदा तरी पुण्याच्या आजूबाजूच्या प्राचीन स्थळांना, देवळांना, लेण्यांना भेट देणे, त्यांची माहिती जमविणे, त्यावर चर्चा करणे इत्यादी गोष्टींत अग्रेसर. आमचा हा उत्साह पाहूनच वयाने व श्रेष्ठतेने एवढ्या ज्येष्ठ असलेल्या आमच्या प्राध्यापिकाबाई आमच्याबरोबर ह्या प्रवासासाठी येण्यास तयार झाल्या होत्या.

हरीहरेश्वरला पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली होती. वाटेत हिरव्या रम्य निसर्गाने डोळे सुखावले होते. पाऊस बऱ्यापैकी होता. घाटात जरा जास्तच होता. पण आता पावसाळ्याचेच दिवस आणि सहलीचा मूड... मग कोण पर्वा करतो? बालाजीच्या ट्रॅक्समधील अचंबित करणाऱ्या 'मसाला' हिंदी गाण्यांच्या कॅसेट्सवर पोट भरून शेरेबाजी करतच आम्ही मुक्कामी पोहोचलो. आमच्या एका मित्राने त्याच्या परिचितांमार्फत एका घरगुती ठिकाणी आमची उतरायची व्यवस्था केली होती. छोटेखानी टुमदार बंगलीतल्या एका खोलीत मुली स्थिरावल्या, एक खोली मुलांनी पटकावली तर एक खोली आमच्या प्राध्यापिकाबाईंसाठी राखीव होती. पहिल्याच तासाभरात ग्रुपमधील दोन मुलींनी बंगलीत शिरलेल्या दोन बेडकांना उड्या मारताना पाहून किंकाळ्या फोडून व इकडून तिकडे उड्या मारून सर्वांची करमणूक केली. येथे स्नानगृह व शौचालय बंगलीपासून थोड्या अंतरावर ताडामाडांच्या आडोशाला होते. ग्रुपमधील इतर मुलांनी मग त्या मुलींना चिडवत वाटेतील काल्पनिक साप-विंचू-गोमींची अशी काही भीती घातली की त्या सतत सगळीकडे पाय आपटत चालत होत्या.
त्या रात्री पावसाच्या जोरदार सरींचा कौलारू छतावरचा आवाज ऐकत ऐकतच आम्हाला झोप लागली.
दुसरे दिवशी सकाळी नाश्ता, स्नान वगैरे उरकून आम्ही हरिहरेश्वराचे दर्शन घेतले. तेथील पिंडीच्या वैशिष्ट्याविषयी आमची चर्चा करून झाली. मंदिराशेजारच्या नागलिंगम झाडांच्या पायाशी पडलेल्या शिवाच्या पिंडीसमान आकार असलेल्या सुंदर फुलांचा सुगंध घ्राणांत भरून घेतच आम्ही हरिहरेश्वर सोडले. आता आम्हाला पालीजवळच्या बौद्ध गुंफांमधील काही गुंफा पाहण्याची उत्कंठा होती.
काही अंतर गेल्यावर गाडीत अचानक काहीतरी बिघाड झाला. बराच वेळ खाटखूट करूनही गाडी बधेना. धक्कापण देऊन झाला तरीही ती ठप्पच! तेव्हा मोबाईलचा जमाना नसल्यामुळे इतर पर्याय फारसे नव्हते व पावसाच्या संततधारेमुळे रस्त्यात वाहनांची व माणसांची वर्दळ कमीच होती. मग वाटेतल्याच एकदोन माणसांना दादापुता करून आमच्या वाहनचालकाने एका माहितगार माणसाला बोलावले. दोघांनी मिळून गाडीच्या बॉनेटमध्ये डोकी खुपसून बरीच खुडबूड केल्यावर आमची गाडी एकदाची स्टार्ट झाली.
एव्हाना आम्हाला उशीर झाला होता आणि पावसाचा जोरही बराच वाढला होता. पण ज्या लेण्यांसाठी खास पुण्याहून आलो त्यातील एखादे लेणेतरी पाहिल्याशिवाय परत फिरायला मन राजी होत नव्हते. आमच्या प्राध्यापिकाबाई तर कान्हेरीच्या जंगलात कसल्याही सोयींशिवाय एकट्या राहिलेल्या धाडसी संशोधिका. त्यांच्या धाडसाच्या वेगवेगळ्या कहाण्या तर आम्हाला स्फूर्तिस्थानीच होत्या. त्यांना हा असला पाऊस म्हणजे किरकोळ होता. आमचा वाहनचालक तरीही जरा नाराज होता. त्याला परत फिरायचे होते. पण आम्हाला त्या रपारपा कोसळणाऱ्या पावसातही आतापर्यंत स्लाईडस, फोटोग्राफ्समध्ये पाहिलेली लेणी प्रत्यक्षात पाहायची होती. अखेर तडजोड करून आमच्या प्राध्यापिकाबाईंनी कोसळणाऱ्या पावसात एका पर्यटकांकडून दुर्लक्षित अशा लेण्यांपर्यंत आम्हाला नेले.
आमच्या वाहनचालकाने डोंगराच्या जितक्या जवळ जाणे शक्य होते तिथपर्यंत गाडी नेली. पुढे तर सगळा चिखलच होता. प्राध्यापिकाबाईंना आम्ही वाटेची स्थिती पाहून वाहनचालकासोबत थांबायची विनंती केली आणि त्यांनीही ती मान्य केली.
आम्ही आपापले रेनकोट गुंडाळून घोटा-घोटा चिखलातून वाट काढत, घसरत एका शेताच्या बांधापाशी पोचलो. शेताच्या बांधावरून डगमगत पुढच्या शेताकडे.... सगळीकडे भातपेरणी चालू होती. गुडघाभर पाण्यात, भातखाचरांत उभे राहून डोक्यावर इरले पांघरलेल्या बायाबापड्या शहरी वेषांत, अशा पावसात आम्हाला डोंगराकडे घसरत, धडपडत जाताना कुतूहलाने बघत होत्या. एके ठिकाणी आम्हालाही भातखाचरांमधून रस्ता काढायला लागला. बुटांमध्ये गेलेल्या पाण्याचे जड ओझे सांभाळत आम्ही अखेर धापा टाकत लेण्यापाशी पोहोचलो. शेकडो वर्षांपूर्वी इतक्या आडबाजूला, जंगलात भरभक्कम पाषाणातून ह्या गुंफा उभ्या राहिल्या. त्या शिल्पींचे, कारागिराचे, येथे वास करणाऱ्या बौद्ध भिख्खुंचे कौतुक करावे तेवढे थोडे असे मला वाटते. शहरी जीवनाला व सुखसोयींना चटावलेल्या माझ्या मनाला त्यांच्या खडतर आयुष्याची कल्पनाही अशक्य वाटते. आम्ही भेट देत असलेल्या गुंफांमध्ये फार कलाकुसर, कोरीव काम नव्हते.
मात्र त्यांच्या ओबडधोबडपणातही त्यांचे सौंदर्य लपून राहत नव्हते.
शिलालेखाची अक्षरे पुसट होती. गुंफेच्या फार आतही जाववत नव्हते, कारण सगळीकडे वटवाघळांचा मुक्त संचार होता. आमच्या अशा आगंतुक येण्यामुळे विचलित होऊन ती बिचारी उगीचच इकडून तिकडे घिरट्या घालत होती. जाळीजळमटे तर ठिकठिकाणी दिसत होती. इतर गुंफांमध्ये येतो त्याचप्रमाणे येथेही एक प्रकारचा ओलसर, दमट, कुंद वास भरून राहिला होता. त्यातच वटवाघळांच्या व भटक्या कुत्र्यामांजरांच्या विष्ठेच्या दुर्गंधाची भर! थोडा वेळ तिथे थांबून आम्ही पुन्हा घसरत घसरत उतरणीच्या मार्गाला लागलो. थोडेफार वाळलेले कपडे, बूट पुन्हा एकदा चिखल, पाणी, पाऊस यांच्यात बुचकळून निघाले.
आमच्या गाडीपाशी सगळेजण परत पोहोचेपर्यंत पावसाचा जोर खूप वाढला होता. ओल्या, कुडकुडत्या अंगांनी चोहोबाजूंनी कोसळणाऱ्या त्या पावसाचे स्तिमित करणारे रूप गाडीच्या धुकंभरल्या काचांतून न्याहाळत आम्ही परतीच्या प्रवासास लागलो. जाताना वाटेत कमी वर्दळ होती तर परत येताना शुकशुकाट होता. दुपारचे चार - साडेचार झाले असूनही दुकाने, टपऱ्या बंद होती. क्वचितच एखाद्या दुकानाची फळी किलकिलती दिसे. आमची दुपारची जेवणे झाली नसल्याने गाडीत सगळ्यांनाच कडकडून भुका लागल्या होत्या. पण वाटेत एकही हॉटेल उघडे नव्हते. शेवटी एका हातगाडीवरून केळी विकत घेतली. तिथल्या लोकांनी सांगितले की लवकर निघा, पलीकडच्या गावातील रस्ते जलमय झाले असून कधीही येथील रस्तेदेखील पाण्याखाली जातील. आता मात्र आमच्या गोटात जरा गडबड उडाली. वाहनचालक बालाजी तर जाम नर्व्हस झाला होता. एक तर आम्ही त्याला बोलून बोलून त्याचा गुटख्याचा खुराक निम्म्यावर आणायला लावलेला, सायंकाळ होऊन अंधार पडू लागलेला, पावसाचा जोर कायम, पुढे घाट आणि गाडीखालचा रस्ता कधी जलमय होईल ह्याचा नेम नाही!! त्यातच गाडी कधी दगा देईल सांगता येत नाही, गाडीत एक ज्येष्ठ महिला, दोन किंचाळणाऱ्या मुली व बाकीचे जीव मुठीत धरून बसलेले प्रवासी! तो नर्व्हस झाला नाही तरच नवल! येथील अंधार म्हणजे काळाकुट्ट अंधार होता. कारण वीज तुटल्यामुळे गावे अंधारात होती. रस्त्यांवरही उजेड नाही. आमच्या गाडीने घाट चढायला सुरुवात केली. पलीकडून एक ट्रक येत होता, त्याचा चालक थोडं थांबून ओरडला, "दरडी कोसळाय लागल्याती, नीट जावा... "!!
आमचे धाबे दणाणले होते. पण कोणीही एकमेकांना मनातले टेन्शन जाणवू देत नव्हते. गाडीत मात्र शांतता होती. अचानक एक दगड वाटेत आल्याने गाडी थोडी उडली व मागे बसलेली एक मुलगी गाडीच्या मागच्या दरवाज्यावर आदळली.... आणि काय आश्चर्य! तो दरवाजा धाडकन उघडला आणि आमची मैत्रीण निम्मी बाहेर, निम्मी आत. ती व तिची दुसरी मैत्रीण किंकाळ्या फोडत असतानाच चालकाने गपकन ब्रेक हाणून गाडी थांबविली, तोवर इतरांनी त्या मुलीला आत ओढले होते. ते दार व्यवस्थित लॉक केल्यावर पुन्हा घाटातून मार्गक्रमणा सुरू झाली. आत ती मुलगी शॉकमुळे रडू लागली होती. बाहेर पाऊस, धुके, अंधार ह्यांचे साम्राज्य होते. समोरचे अजिबात धड दिसत नव्हते. डोंगराच्या बाजूने गाडी चालवावी तर दरडींची भीती व समोरचा रस्ता अंधारात गडप झाला होता. पुन्हा एकदा वाहनचालकाने अचानक ब्रेक मारून गाडी थांबविली. स्टियरिंग व्हीलवर डोके ठेवून दोन मिनिटे तसाच स्तब्ध बसला. आम्हाला टेन्शन की आता ह्याला काय झाले? त्याची अवस्था आमच्या ग्रुपमधील वयाने चाळिशीच्या आसपास असलेल्या आमच्या एका सहाध्यायींनी बरोबर ओळखली. त्यांनी त्याला पाणी प्यायला दिले. पाठीवर धीराचा हात फिरवला व म्हणाले, "तू काळजी करू नकोस. मी बसतो तुझ्या शेजारी आणि सांगतो तुला रस्ता कसा आहे ते. तू अगदी सावकाश घे गाडी. अजिबात टेन्शन घ्यायचे नाही. आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला! " एकही शब्द न बोलता खिडक्यांपाशी बसलेल्या सर्वांनी आपापल्या पोतड्यांमधून विजेऱ्या काढल्या, पावसाची पर्वा न करता खिडक्या उघडल्या व हात बाहेर काढून गाडीच्या आजूबाजूच्या व गाडीसमोरच्या रस्त्यावर त्यांचे प्रकाशझोत टाकत वाहनचालकाला रस्ता पुढे कसा आहे वगैरे सांगायला सुरुवात केली. मधल्या रस्त्यात बहुधा दरड कोसळलेला भागही होता, पण आमचे पूर्ण लक्ष गाडीवानाकडे, रस्त्याकडे व त्याला दिशादर्शन करण्याकडे एकवटले होते. विजेऱ्या खिडकीतून बाहेर धरून धरून व माना तिरप्या करून करून त्यांना रग लागली होती. पण अशा परिस्थितीत कोण माघार घेण्यास धजवणार!अखेरीस धीम्या गतीने आम्ही घाट ओलांडला. वाहनचालकाच्या जीवात जीव आला. ह्यावेळी त्याने गाडी न थांबविता गुटख्याची पुडी तोंडात रिकामी केली तेव्हा आम्ही फक्त एकमेकांकडे सूचकपणे पाहिले पण त्याला त्यावरून छेडले नाही. पुढचा प्रवास वेगात आणि सुरळीत झाला. पुण्याला पोहोचेपर्यंत रात्रही बरीच झाली होती. पण त्याचे कोणालाच काही विशेष वाटले नाही. घाटातल्या त्या काही तणावभरल्या क्षणांनी आम्हाला बरेच काही शिकविले. दुसऱ्या दिवशी घरात उबदार वातावरणात बसून घाटात दरडी कोसळण्याच्या व आमच्या वाटेतील गावांचा पुरामुळे इतर गावांशी संपर्क तुटण्याच्या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या वाचताना अंगावर शहारा आल्यावाचून राहिला नाही. पुढेही असे अनेक रोमहर्षक प्रवास केले, अनेक अनुभव घेतले. पण हा प्रवास त्याच्या आगळेपणामुळे कायम स्मरणात राहील.
--- अरुंधती

Friday, February 05, 2010

ती डोळ्यांतुन खुदकन हसते


ती डोळ्यांतुन खुदकन हसते अन गिरक्या लगबग घेते | 

ओठांच्या शिंपलीवरती इंद्रधनु सुंदर अवतरते ||

त्या नाजूक गालांवरती फुलपाखरे किती भिरभिरती | 

सायीच्या हातांमधुनी प्रेमामृत नित पाझरते ||

मखमाल तिच्या स्मरणाने जीव हलका फुलका होतो | 

ममतेचे रेशीम धागे ती असेच गुंफुनी जाते ||
-- अरुंधती

Wednesday, February 03, 2010

तीन झुरळांचं शुभेच्छापत्र!


माझी मैत्रीण एक हरहुन्नरी कलावंत आहे. तिच्याचसारखी तिची पाच वर्षांची मुलगीदेखील मनस्वी, कलासंपन्न व आनंदी स्वभावाची आहे. मैत्रिणीला नवनवीन कल्पना प्रत्यक्षात राबविण्यात, त्यांना आकार देण्यात समाधान मिळते. तिची लेक तिच्यापेक्षा कलेत एक पाऊल पुढेच आहे. खेळकर, दंगेखोर, खट्याळ, कल्पक आणि मनस्वी!! आजूबाजूच्या जगाचे तरल निरीक्षण तिच्या चित्रांत पाहायला मिळते. पण त्याविषयी बोलायची तिची तयारी नसते बरं का! तुम्ही तिला त्या चित्राबद्दल विचारलंत की ती तुमच्या हातून सटकून पसार होते. परवा ह्या मैत्रिणीचा वाढदिवस झाला. सर्वांनी तिच्यावर शुभेच्छांचा, भेटवस्तूंचा नुसता पाऊस पाडला. मैत्रिणीच्या लेकीने सकाळी हळूच आईच्या हातात आदल्या दिवशी मोठ्या गुप्तपणे तयार केलेले शुभेच्छापत्र दिले. एवढीशी पोर आणि इतक्या अगत्याने, आर्जवाने आपल्यासाठी शुभेच्छापत्र तयार करते म्हटल्यावर मैत्रिणीला भरून आले. प्रेमाने तिने लेकीला जवळ घेतले. तिच्या गालाचे पापे घेण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. पण तोवर तिच्या चुळबुळ्या कन्येने तिथून धूम ठोकली होती. लेक पसार झाल्यावर आईने कौतुकाने शुभेच्छापत्र उघडले. आत काय चित्र काढले असेल याविषयी तिलाही उत्सुकता होतीच की! मोठ्या उत्सुकतेने मैत्रिणीने शुभेच्छापत्राकडे कटाक्ष टाकला आणि त्यावर काढलेल्या चित्राकडे डोळे फाडून बघतच राहिली! शुभेच्छापत्रावर तिच्या लेकीने एक मांजर व तीन झुरळे काढली होती!! मैत्रीण दिवसभर विचार करत होती. आपल्या लेकीला मांजर खूप आवडते हे तिला चांगले ठाऊक होते. पण झुरळे??? लहान मुलांच्या आवडीविषयी काहीही सांगता येत नाही. त्यांना कधी काय आवडेल ह्याचा नेम नाही. आपल्या लेकीला तिने एक-दोनदा त्याविषयी विचारले, पण ती उत्तर द्यायला एका ठिकाणी स्वस्थ बसेल तर ना! सायंकाळी मैत्रिणीला भेटायला, शुभेच्छा द्यायला घरी इतर नातेवाईक आले होते. तेही हे शुभेच्छापत्र बघून गोंधळले. शेवटी मैत्रिणीच्या भावाने उलगडा केला. त्याची स्वतःची लेक टी. व्ही. वरच्या एका कार्टून शो ची फॅन आहे. त्यामुळे त्याला ही माहिती होती. त्या कार्टून मध्ये तीन झुरळे आहेत. त्यांच्या करामती लहान मुलांना खूप आवडतात म्हणे! माझ्या मैत्रिणीच्या लेकीलाही हा कार्टून शो खूप खूप आवडतो. आपल्या आवडत्या, प्रिय कार्टून हिरोजची चित्रे काढून तिने आपल्या आईसाठी वाढदिवसाचे शुभेच्छापत्र तयार केले होते. तिची आपल्या आईसाठी ही निरागस प्रेमाची भेट होती. आपल्या आवडत्या व्यक्तीला जशी आपण आपल्याला आवडणारी वस्तू भेट देतो, त्याचप्रमाणे तिने आईला तिची आवडती झुरळे चित्रस्वरूपात भेट दिली होती. एका निरागस, स्वच्छंद मनाची ती प्रेमळ अभिव्यक्ती होती. सुदैवाने माझ्या मैत्रिणीला व तिच्या कुटुंबियांना त्या शुभेच्छापत्रामागील अनमोल भावना व विचार जाणता आले. आपल्या आजूबाजूला लहान मुले अनेकदा आपल्याला न उमगणाऱ्या कित्येक गोष्टी करत असतात. त्यांच्या आईवडीलांना त्यांचे उपद्व्याप बऱ्याच वेळा 'झेपत' नाहीत! पण जरा खोलवर डोकावले तर त्या उपद्व्यापांतूनही ती काहीतरी सांगत असतात! आपण फक्त कान देऊन ऐकायला हवे!!
--- अरुंधती

Tuesday, February 02, 2010

गुणसूत्रांची भेसळ थांबवा!


नमस्कार!
ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल विचारविनिमय करत आहेत. येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे. ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?
http://greenpeace.in/safefood/the-biggest-baingan-bharta-ever/
पिटिशन मध्ये लिहिले आहे : "भारताने आपल्या वांग्यांना अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सद्वारा प्रदूषित होऊ देऊ नये." धन्यवाद!
--- अरुंधती

Monday, February 01, 2010

जलवर्षा


मृद्गंधाचे अत्तर उधळित कोसळती जलधारा

हिरव्या पात्यांतुनि लवलवतो सुसाट भिजरा वारा |

मखमलि सजली धुंद नव्हाळी यौवनसुंदर धरा

पक्षि विसावत अंग घुसळुनी चोचि घासती परां |

आमोदे अति प्रसन्न गातो खळखळणारा झरा

तप्त सृष्टिला तृप्त करुनिया जीवन दे अंकुरा |

आनंदाचे तोरण सजले अवनीच्या मंदिरा

जलवर्षेचे पांग फेडण्या जन्म पडे का पुरा?
-- अरुंधती