Wednesday, March 31, 2010

अदृश्य डोळ्यांनी अनुभवलेलं साहित्य संमेलन




सध्या साहित्य संमेलन बरंच गाजतंय...नव्हे, गाजवलं जातंय! नवे नवे वाद, नव्या बातम्या, नवे विषय....


अशाच ह्या बातम्या वाचताना मला 'त्या' साहित्यसंमेलनाची आठवण झाली.
एक असं साहित्य संमेलन जे मी तिथे हजर न राहताही अनुभवलं....
नाही, नाही.... मला संजयासारखी दिव्यदृष्टी नव्हती प्रदान केली कोणी! ना मला धृतराष्ट्रासारखा चिंतातुर बाप ''काय काय दिसतंय ते सांग झणी'' म्हणून सतावत होता. मी इकडे पुण्यात..आणि संमेलन तर दूर गावी! पण तरीही मला त्याविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेणं फार म्हणजे फार अनिवार्य होतं हो!
झालं असं होतं की एक दिवस अस्मादिकांची स्वारी अशीच नेहमीसारखी वेंधळ्या धांदरटपणाची कमाल करत करत शाळेच्या आवारातून चालली होती. बहुधा डोक्यात ''आज आईने डब्यात कोणती भाजी दिली आहे कोणास ठाऊक!'' सारखे तद्दन निरुपयोगी विचार चालले असावेत. तेवढ्यात करड्या स्वरात हाक आली, ''कुलकर्णी!''
घाबरून काही सेकंद माझ्या छातीचे ठोके पुरते थांबलेच आणि मग ते काळीज सशाच्या काळजाप्रमाणे सैरावैरा वेगात धावू लागले. कारण मी ज्यांना अतिशय घाबरायचे अशातल्या माझ्या एका शिक्षिकाबाईंनी मला पुकारा दिला होता.
ह्याच त्या बाई, माझं खिडकीतून बाहेर दिसणार्‍या गुलमोहराच्या किंवा शिरिषाच्या झाडाकडं लक्ष असलं की मला हमखास पकडणार्‍या. ह्याच त्या बाई, ज्या मी शाळेच्या वहीच्या शेवटच्या पानावर राजकन्या, मोरपिसे, शंख शिंपल्यांची चित्रं काढत असताना मला तंद्रीतून जागं करून वर्गात अवघड अवघड प्रश्न विचारणार्‍या. ह्याच त्या बाई, मला पेंगुळल्यासारखे होत असले की ''कुलकर्णी, धडा वाच,'' असे सांगून माझ्या सुखनिद्रेवर संक्रांत आणणार्‍या.... ह्याच त्या बाई, माझा गृहपाठ झाला नसेल तेव्हाच माझी वही चाळायला मागणार्‍या.... त्यांना बहुधा माझ्याविषयी सहावे इंद्रिय असावे हा माझा समज एव्हाना दृढ होत आलेला....
अशा बाईंनी जाहीर पुकारा करणं म्हणजे थेट कडेलोटाची शिक्षाच की!
मी मनातल्या मनात थरथरत बाईंसमोर जाऊन उभी राहिले.
''क..क्क..काय बाई?'' माझा अस्फुटसा अडखळता प्रश्न.
''मला मधल्या सुट्टीत येऊन भेट स्टाफ-रूम मध्ये.'' इति बाई.
झालं. माझं लवकर लवकर डबा संपवून, बुचाच्या झाडाखाली उभं राहून, इतर डझनभर मुलींसारखी आकाशात नजर स्थिर करून, शरीरचापल्याच्या जोरावर बुचाची फुलं झाडावरून थेट हातात ''कॅच कॅच'' करायचा प्रोग्रॅम बोंबलला!
मधल्या सुट्टीत बाईंनी जमेल तेवढ्या करड्या आवाजात फर्मान सोडले, ''तुला अहवाल लिहायचाय... ते इचलकरंजीला साहित्य संमेलन चाललंय ना, त्याचा...''
''बाई, पण मला काय माहीत तिथं काय चाललंय ते! मी कसं लिहिणार?'' माझा चाचरता प्रश्न.
''अगं, सोपं आहे. आता पेपरमध्ये येतातच आहेत त्याच्यावर लेख. ते जमा कर, लायब्ररीत जाऊन इतर वर्तमानपत्रांमधली कात्रणं चाळ जरा! आणि गेल्या , त्याच्या गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनांचे अहवाल पाहा जरा.. म्हणजे कळेल!''
''पण बाई, असं न पाहता कसं कळणार तिथं काय काय झालं ते... कोण काय बोललं, लोकांच्या प्रतिक्रिया वगैरे...'' माझा पुन्हा एक बावळट प्रश्न.
''अगं काढ ना माहिती मग! इतकं अवघड नाहीए ते काम. विचार जरा आजूबाजूला, कोणी गेलं होतं का साहित्य संमेलनाला....''
आता ह्यांना काय खाऊ वाटत होता का, की माझ्या आजूबाजूचे लोक मला हव्या असलेल्या माहितीसाठी साहित्य संमेलनाला टपकतील म्हणून! आणि तेव्हा काही आतासारखी 'लाईव्ह टीव्ही कव्हरेज'ची सोयही नव्हती! पण कोण सांगणार त्यांना??!! असो. मी मुंडी होकारार्थी हालवली (तेवढं मात्र फर्मास जमतं आपल्याला!) आणि तिथून लगबगीनं काढता पाय घेणार एवढ्यात पुन्हा करडा आवाज गरजला, ''आणि हो, आठवडाभरात दे आणून! मग मी बघेन काय फेरफार करायचे ते!''
झाले! मेरी रातोंकी नींद, दिनका चैन...सब कुछ गायब हो गया| कधी तांदळातले खडे निवडले नसतील एवढ्या तन्मयतेने मी वृत्तपत्रे वाचू लागले. लायब्ररीतील बाईंचे डोके खा खा खाऊन झाले. त्यांनी दिलेल्या कात्रणांची, आधीच्या अहवालांची पारायणे करून झाली. खुनाचा तपास करणार्‍या गुप्तहेराच्या चाणाक्षपणाने मी इचलकरंजी किंवा त्याच्या आसपासच्या गावात नातेवाईक असलेल्या वर्गमैत्रिणी हुडकून काढल्या. त्यांना आपापल्या इचलकरंजीकर नातेवाईकांना विचारण्यासाठी एक प्रश्नावलीच दिली. अधून मधून आमच्या करड्या स्वराच्या बाईही मला बोलावून हातात माहितीचे काही कागद, कात्रणे इत्यादी इत्यादी कोंबत.
अखेर करत करत माझ्याकडे माहितीचे, साहित्य संमेलनाच्या इत्थंभूत घटनाक्रमांचे एक छोटेसे संकलनच तयार झाले.
मग एके सुदिनी सर्व भेंडोळी समोर ठेवली, कोरे कागद पुढ्यात ओढले, माता सरस्वतीचे स्मरण केले आणि त्या अदृश्य संमेलनाचा साग्रसंगीत अहवाल लिहायला घेतला.
पाहता पाहता सर्व लेख पुरा झाला. एक-दोन शंकांचे समाधान एका मैत्रिणीमार्फत तिच्या नातेवाईकांकडून करून घेतले. लेख घरच्यांना वाचायला दिला. ''आहे बुव्वा!'' वडिलांचा खोचक अभिप्राय, ''अगदी तू तिथे प्रत्यक्ष जाऊन संमेलन पाहिलंस असंच वाटतंय लेख वाचून!'' मनातल्या मनात मला एकीकडे स्वतःचा अभिमान वाटत होता आणि दुसरीकडे एक बोचरी भावना होती. बरं, मी काही टिळकही नव्हते ना नामदार गोखले! बाणेदारपणे, सचोटीने, स्वाभिमानाने तेजस्वी उत्तरे वगैरे देणे म्हणजे काहीतरीच!!!! आमचं आपलं सोयीचं गणित! मनात स्वतःच्या प्रश्नाला स्वतःच स्पष्टीकरण : ''असे कितीसे लोक वाचणार आहेत हा लेख! आणि त्यांनी वाचला तरी त्यांना मी ते संमेलन प्रत्यक्ष अनुभवले किंवा नाही ह्याबद्दल काय असा फरक पडणार आहे? किती जण त्याचा नंतर विचार करणार आहेत? त्यांना सर्व संमेलनाचा धावता अहवाल तुझ्यामुळेच तर एका फटक्यात वाचायला मिळणार आहे! मग काय हरकत आहे? शिवाय तू जमवलेली माहितीही समर्पक आहे. केली आहेस मेहनत एवढी तर घे जरा मजा!!''
माझा लेख मोठ्या ऐटीत वार्षिक अंकात छापून आला. बर्‍याच जणांनी वाचला. माझे भरपूर कौतुकही झाले. लेखनशैलीची दादही देऊन झाली. माझे मन मात्र कधीचे त्या लेखिकेच्या नावापाशी जे थबकले होते, तसेच आजही थबकून आहे.
--- अरुंधती

Friday, March 26, 2010

कॅलेब




कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... मध्यंतरी टीव्ही च्या कोणत्या तरी चॅनलवर एक गाजलेला मराठी चित्रपट लागला होता. ''मुक्ता''. सोनाली कुलकर्णी, विक्रम गोखले, डॉ. श्रीराम लागू, अविनाश नारकर ह्या अभिनय क्षेत्रातील नामवंत मंडळींचा समावेश, जब्बार पटेल ह्यांचे दिग्दर्शन... अशी भट्टी जमल्यावर खरे तर चित्रपट सुपर ड्यूपर हिट व्हायला हवा होता. पण बहुधा तसे झाले नसावे. चित्रपटात हाताळलेल्या संवेदनशील विषयामुळे असेल कदाचित. पण ह्या चित्रपटात एक व्यक्ती मात्र भरपूर भाव खाऊन गेली. कॅलेब ओबुरा ओब्वांतिनिका.... माझा वर्गमित्र.


मला कॉलेजमधील ते सुरुवातीचे दिवस अजूनही आठवतात. पेठी वातावरणातून एकदम ''आंतरराष्ट्रीय'' वातावरणात आल्यावर पचवायचे सर्व धक्के मी हळूहळू पचवत होते. रोजच काहीतरी नवीन. ह्या कॉलेजमधली लोकांची वागण्याची - बोलण्याची पद्धत, वेष, राहणीमान, जीवनशैली.. ‌सगळेच माझ्या आतापर्यंतच्या अनुभवांपेक्षा वेगळे होते. छोट्या तळ्यात पोहायची सवय असावी आणि कोणीतरी अचानक समुद्रात भिरकावून द्यावं अशी काहीशी होती माझी अवस्था. तसे आजूबाजूला मराठी चेहरे होते मनाला आधार द्यायला... पण तेही माझ्यासारखेच चाचपडत होते. पहिल्यांदाच आम्ही आशियाई, आफ्रिकन, मध्य-पूर्वेकडच्या संस्कृती व व्यक्तींना एका ठिकाणी बघत होतो. इराणी, आफ्रिकन, अरेबिक, ऑस्ट्रेलियन, भारतीय लोकांची आमच्या वर्गात खिचडी होती नुसती!


आमच्या वर्गात कृष्णवर्णीयांचा तर एक मोठाच्या मोठा ग्रुपच होता. प्रथमच मी कृष्णवर्णीय मुलामुलींना एवढ्या जवळून पाहत होते. त्यांची भली थोरली धिप्पाड शरीरयष्टी, काळा - तुकतुकीत शिसवी वर्ण, त्या पार्श्वभूमीवर चमकणारे दात व डोळे, कुरळे केस (मुलींच्या त्या बारीक वेण्या व त्यात गुंफलेले रंगीबेरंगी मणी), उंच देहकाठी, त्यांच्या अवतीभवती दरवळणारा, नाकाला झिणझिण्या आणणारा परफ्यूम व त्यांचा स्वतःचा एक शरीरगंध..... शेजारच्या बाकावर कोणी कृष्णवर्णीय बसला असला की सुरुवातीला जरा भीतीच वाटायची... पण मग हळूहळू लक्षात आले, की हेदेखील आपल्याच सारखे आहेत. भले त्यांची भाषा, उच्चार, राहणी, संस्कृती सगळं भिन्न असेल... पण तेही नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. भीड थोडी थोडी चेपू लागली. वर्गात एकमेकांना हलकेच 'हाय', 'हॅलो' करण्यापर्यंत, कॉलेजच्या आवारात दिसल्यास स्मिताची देवाण-घेवाण करण्यापर्यंत मजल गेली. त्यांच्यापैकी कोणी तासाला आपल्या शेजारी बसले की तासभर टेन्शनमध्ये काढणेही संपले. उलट नोटस घेताना एखादे वाक्य, मुद्दा गळला तर एकमेकांच्या वह्यांत डोकावून पाहिले जाई.


आमच्या कॉलेजच्या आवाराचे, इमारतींचे एक वैशिष्ट्य होते. आवाराचा आकार एवढा लहान होता, की दिवसातून तुम्ही एखाद्या व्यक्तीला अनेकदा सामोरे जायचा. वर्ग, कॉरिडॉर्स, लायब्ररी, कॅन्टिन, ऑफिस .... कोठे ना कोठेतरी तुम्ही त्या व्यक्तीला भेटणारच! त्यामुळे आम्हाला आमच्या व्यतिरिक्त कॉलेजमध्ये शिकणारे इतर शाखांचे विद्यार्थीही ओळखीचे झाले होते. कॉलेजमध्ये सर्व संस्कृतींच्या विद्यार्थ्यांना आपलेसे वाटावे म्हणून वेगवेगळ्या संस्कृतींचे विद्यार्थी आपापली नृत्ये, वेषभूषा, खाद्यप्रकार, गीते ह्यांमधून आमची त्यांच्या संस्कृतीशी ओळख करून देत. आफ्रिकन वंशाच्या मुलांनी सादर केलेल्या अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावल्याचे स्मरत आहे. तरीही भिन्नता ही होतीच!


सर्व कृष्णवर्णीय विद्यार्थी तसे आपापल्या कळपातच असायचे. त्यांना एक तर इंग्रजी बोलायलाही नीट जमायचे नाही, आणि ते इंग्रजीतून बोलले तरी त्यांचे उच्चार आम्हाला झेपायचे नाहीत. त्यामुळे जरी मैत्रीचे वातावरण असले तरी एक अदृश्य रेषा असायची आमच्यामध्ये. आणि ती रेषा न ओलांडण्याचा अलिखित नियमच होता म्हणा ना!


कॅलेब मात्र ह्या सर्वाला अपवाद होता. जात्याच गमती, बोलघेवडा, थोडा आगाऊ आणि तरतरीत. दिसायला इतर कृष्णवर्णीय मुलांसारखाच असला तरी अंगकाठीने सडसडीत, हुशार व चपळ होता. इतर मुले-मुली इथियोपिया, सुदान येथील होती, तर कॅलेब आपण केनियातून आलोत असे सांगायचा. कडक राहायचा. ते चट्टेरी-पट्टेरी, रंगीबेरंगी शर्टस घालून मी त्याला कधीच पाहिले नाही. बहुतेक वेळा पांढरा शुभ्र शर्ट व कडक इस्त्रीची पांढरी पँट. वर्गात शिक्षकांना सारखे प्रश्न उपस्थित करायचा, शंका विचारायचा. मोकळ्या तासाला किंवा दोन तासांच्या मधल्या मोकळ्या वेळात आमच्या शेजारी बसून आमची ओळख करून घेणे, स्वतःविषयी सांगणे हा तर त्याचा आवडता टाईमपास! सुरुवातीलाच त्याने हिंदीत बोलून आम्हाला थक्क केले होते. ''मेरा नाम कॅलेब है, मै केनियासे आया हूं, क्या तुम मुझसे दोस्ती करोगी? '' माझ्या सर्व मैत्रिणी चाट पडायच्याच काय ते शिल्लक! अर्थात तो हे सर्व संवाद वर्गातील प्रत्येक मुलीला गाठून पोपटाप्रमाणे म्हणायचा! आम्हालाही त्याच्या ह्या धार्ष्ट्याची मजा वाटू लागली होती. त्याला स्वतःत एवढा आत्मविश्वास होता की समोरची पोरगी आपल्याला नाकारणे शक्यच नाही अशीच त्याची समजूत होती. मग काय! कॅलेब कधीही येणार, तुम्ही इतरांशी गप्पा मारत असलात तरी तुमच्या ग्रुपमध्ये येऊन बिनधास्त बसणार, स्वतःची चार मते सुनावणार, इतर मुलींशी दोस्ती करण्याचा प्रयत्न (उगाचच) करणार हे ठरून गेले होते. पोरींनाही त्याच्या ह्या 'फ्लर्टिंग'ची इतकी सवय झाली होती की आपला चेहरा कसाबसा कोरा ठेवून त्या कॅलेबची सर्व मुक्ताफळे शांतपणे ऐकून घेत आणि मग नंतर खो खो हसत असत. मजा यायची.


एक दिवस कॅलेब भेटला तेव्हा खूप आनंदात दिसत होता. उत्तेजित होऊन जवळपास उड्याच मारायचे ते काय शिल्लक होता म्हणा ना! त्याचे हिंदी आम्हाला आणि आमचे हिंदी त्याला एव्हाना व्यवस्थित कळू लागले होते. ''कॅलेब, क्या बात है यार? बहुत खुश दिख रहा है! '' त्यावर तो उद्गारला, ''मुझे पिक्चरमें काम करनेका मौका मिला है।'' आम्हाला तर सुरुवातीला खरेच वाटले नाही. विचार आला, कशावरून हा नेहमीप्रमाणे लंबे लंबे छोडत नसेल! तसा तो किती बाताड्या होता हे आम्हाला चांगले ठाऊक होते. तरी आम्ही विचारलेच, ''कौनसा पिक्चर रे कॅलेब? ''
त्यावर त्याने दिलेले उत्तर खरोखरच आश्चर्यात टाकणारे होते. गेले वर्षभर तो ज्यांच्याकडे हिंदीच्या शिकवणीला जात होता त्यांच्याकडे एका मूव्ही युनिटची माणसे मराठी बोलू शकत असणाऱ्या आफ्रिकन मुलाच्या शोधात आली होती आणि त्यांना कॅलेब गवसला होता.
''अब तुम्हें मेरी मराठी रोज सुननी पडेगी, और सुधरनीभी पडेगी ।'' त्याने थाटात आम्हां मराठी पोरींना आज्ञावजा सूचना केली. आम्ही ''जी हुजूर, '' म्हणून त्याला लवून कुर्निसात करायचेच ते काय बाकी ठेवले.
कॅलेबची ही 'न्यूज' कॉलेजमध्ये पसरायला फारसा वेळ लागला नाही. पण बहुसांस्कृतिकत्व मिरवणाऱ्या कॉलेजमध्ये मराठी चित्रपटाला कोण विचारणार? कदाचित बॉलिवुडचा चित्रपट असता तर गोष्ट वेगळी असती. पण इथे मराठीचा गंधही नसलेली प्रजावळ! त्यामुळे कॅलेबची न्यूज 'हिट' न ठरता तसा फुसका बार ठरली. अगदी तो जब्बार पटेल ह्यांसारख्या कसलेल्या, नामवंत दिग्दर्शकाबरोबर काम करणार आहे हे कळले तरी!
कॅलेब जरासा हिरमुसलेला दिसला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे ह्याबाबतीत फारसे कौतुक झाले नव्हते. पण तरी त्याचा मराठी शिकण्याचा उत्साह तसूभरही कमी नव्हता. कधीही रिकामा वेळ मिळाला की तो आमच्या जथ्यात येऊन त्याच्या मराठीचे प्रयोग आमच्यावर करत असे. मग सर्व पोरी त्याचे उच्चार दुरुस्त करण्याची खटपट करत. तेवढीच घटकाभर करमणूक!


कॅलेबचा चित्रपट आला आणि गेला. मी अनेकदा ठरवले, ''पाहायचाच, '' म्हणून! पण तेव्हा काही जमले नाही. चित्रीकरणाच्या दरम्यान कॅलेब कॉलेजमध्ये गैरहजर असल्याने त्याच्या अनुपस्थितीचीही सवय झाली. तो आमच्या कॉलेजचा एक अलिखित नियमच होता म्हणा ना... दृष्टीआड सृष्टी.... त्या वर्षीचे निकाल लागले. मला डिस्टिंक्शन मिळाल्यामुळे व विद्यापीठात गुणवत्ता यादीत आल्यामुळे मी हवेत होते. एक दिवस अचानक रस्त्यात कॅलेब भेटला. ''तुला किती मार्क्स मिळाले? '' मी विजेत्याच्या बेफिकिरीत विचारले. कॅलेबच्या चेहऱ्यावर क्षणिक विषाद चमकून गेला. ''माझे काही विषय राहिलेत, '' त्याने इंग्रजीत उत्तर दिले. जरा वेळ शांतता होती, मग तो त्याच्या नेहमीच्या स्टाईलने खांदे उडवून म्हणाला, ''बट लाईफ गोज ऑन, राईट? '' आणि एक रिकामे हसू माझ्या दिशेने फेकून लांबच लांब ढांगा टाकत दिसेनासा झाला.


एकदा आम्ही तिघी-चौघी मैत्रिणी कॅन्टिनला चकाट्या पिटत असताना आपल्या नेहमीच्या आवेशात कॅलेबने ग्रुपमध्ये एंट्री घेतली. नेहमीसारख्याच लंब्याचवड्या बाता! तेव्हा आमचा बोलण्याचा विषय चालला होता की कोणाला कोणकोणत्या भाषा येतात. माझी एक अरेबियन देशात वाढलेली मैत्रीण सांगत होती की तिला अमहारिक ही इथियोपियन भाषा एका इथियोपियन मैत्रिणीमुळे थोडी थोडी येते. लगेच कॅलेबने कान टवकारले व तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करायला सुरुवात केली. कॅलेबलाही ती भाषा चांगली येत होती. मैत्रिणीने शेवटी त्याला कंटाळून सांगितले, ''हे बघ, मला त्या भाषेतलं जास्त काही कळत नाही व बोलताही येत नाही. मला फक्त त्यात ''आय लव्ह यू'' कसं म्हणायचं हे माझ्या मैत्रिणीनं शिकवलंय.... '' सभोवताली हास्याचा एकच फवारा उडला. पण कॅलेब मात्र गंभीर होता. ''सांग काय म्हणतात आय लव्ह यू ला अमहारिक भाषेत! '' त्याच्याबरोबर इतर मैत्रिणीही माझ्या अरेबिक मैत्रिणीला गळ घालत होत्या. तसे तिने थोडेसे लाजत मुरकत ''या हबीबी, आना बेहिबाक'' असा काहीसा अस्फुट उच्चार केला व तेथून पळून गेली. आम्ही हसत हसत ते शब्द घोकले (म्हणूनच लक्षात राहिले! ).... न जाणो कधी उपयोगी पडतील!


कॅलेब मात्र आमच्या हसण्या-खिदळण्यात सामील नव्हता. त्याला काय झाले होते कोणास ठाऊक! आजकाल असाच गप्प गप्प असायचा. पण ह्या रावजीला त्याची जरा जास्त विचारपूस केली की काहीतरी भलतेच वाटायचे! त्यामुळे आम्ही पोरींनी कळत असूनही त्याच्या मूडची फार दखल घेतली नाही. एकदा विद्यापीठात मी व माझी अरेबिक मैत्रीण कामासाठी गेलो होतो तिथे हा भाऊ अचानक टपकला. मैत्रिणीला म्हणाला, ''तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. '' मैत्रीण सॉलिड टेन्शनमध्ये. कारण गेले एक-दोन आठवडे हा सारखा तिच्या मागे-पुढे करत असायचा. ''काय झालं? '' मी तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारले. ''नंतर बोलू... आधी ह्याला कटवू, '' ती फुसफुसली. दोघींनीही मग गोड गोड चेहऱ्याने त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याला तिने ''नंतर बोलू, '' म्हणून कटवले. मग वैतागून मला म्हणाली, ''त्या दिवशी मी ते अमहारिकमध्ये बडबडायला नको होतं यार! तेव्हापासून हा पोरगा विचित्र वागतोय माझ्याशी... जिथे जाते तिथे हा हजर असतो. सारखं बोलायचा प्रयत्न करतो. बळेच पिक्चरला जाऊ, फिरायला जाऊ असे म्हणतो. कॅन्टिनमध्ये माझे बिल परस्पर देऊन टाकतो. तुला काय सांगू?!!!! '' त्यापुढे आम्ही कॅलेबला टाळणे ह्या कलेत निपुणता मिळवली. खूप कष्ट पडले त्यासाठी. पण झाले शक्य!


परवा ''मुक्ता'' पिक्चर पाहताना अचानक कॅलेबचा चेहरा पडद्यावर झळकला आणि हे सर्व आठवले. पिक्चरमध्ये त्याने मन लावून काम केल्याचे कळत होते. उच्चार त्याला नाही जमले तेवढे नीट. पण त्याचा हा पहिलावहिला प्रयत्न तर वाखाणण्यासारखा होता. पुढे त्याला बॉलीवूडमध्ये त्याच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे प्रवेश मिळाला नसावा कारण त्या चित्रपटानंतर तो अन्यत्र कोठेच झळकलेला दिसला नाही. आज तो कोठे आहे हेही माहीत नाही. पण अजून लक्षात आहे त्याचे ते मनमोकळे हास्य, स्वतःवर अफाट विश्वास, दुनियेची ऐसी की तैसी अशा वृत्तीची चालायची ढब, त्याचे हिंदी - मराठी बोलण्याचे अथक प्रयत्न आणि जगण्याची मस्ती! कॅलेब, तू जिथे कोठे आहेस, तुला खूप शुभेच्छा!


-- अरुंधती

Wednesday, March 24, 2010

पहिलं प्रेमपत्र


आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेमपत्र लिहायचं होतं.....

मनात खूप धाकधूक वाटत होती.... छातीचे ठोके वाढायचे, तळहात घामेजायचे....सर्व नर्व्हस असण्याची लक्षणे उफाळून यायची!
काय करणार? आधी कधी असलं लिखाण केलं नव्हतं ना....
शाळेत कधी कोणी 'प्रेमपत्र असे असे लिहावे' म्हणून मार्गदर्शन पण केले नव्हते!
मायना काय लिहावा??
सप्रेम नमस्कार म्हणावे, 'हाय' 'हॅल्लो' करावे की अजून काही लिहावे?
कसलं झंजट आहे यार हे प्रेमपत्र लिहिणं.....
तसं एकदा दहावीत मराठीच्या स्कॉलर बॅचच्या शिकवणीच्या सरांनी 'आपल्या प्रिय व्यक्तीस पत्र' लिहा असं सांगितल्यावर वर्गातल्या दोन-चार आचरट पोरांनी प्रेमपत्रे लिहून आणून, त्यांचे जाहीर वाचन करून सरांची गोची केल्याचे स्मरत होते. पण त्या प्रेमपत्रांमधील शब्द मात्र काही केल्या आठवत नव्हते! बाजारात 'नमुन्यादाखल १०० प्रेमपत्र' वगैरे पुस्तकं पण मिळत नाहीत... कॉपी टू कॉपी, माशी टू माशी करायला.... मैत्रिणींना विचारावं का? छ्या!! त्या एकतर येड्यात काढतील की असल्या विषयात कसले सल्ले मागतिए किंवा फिसीफिसी हसत एकमेकींच्या कानाला लागतील.... झालंच मग! दुसर्‍या दिवसापासून आपण अख्ख्या कॉलेजमध्ये थट्टेचा विषय!! घरात कपाटात जपून ठेवलेलं सुगंधी अत्तराचा शिडकावा केलेलें एक देखणं नोटपॅड होतं.... ते आधी हुडकून काढलं! म्हटलं, त्याच्या पानांवरच्या मौक्तिक माळा, गुलाब पाकळ्या आणि मोरपिसांच्या धूसर चित्रांनी जरा स्फूर्ती येईल. पण छे! आमची स्फूर्तीमाय कोठेतरी अडून बसली होती.
बाजारात टॉम क्रूझचं पोस्टर मिळतं, ते घेऊन आले. तसा तो मला फार काही आवडत नाही, पण डोळ्याला बरी आहे हिरवळ! त्याच्या डोळ्यात डोळे घालून झाले.... म्हटलं, आता तरी शब्दांचा पाऊस पडेल, माझ्या भावछटा बहुरंगांमध्ये उमलतील, विचारांचे मोर थुई थुई नाचतील....
पण नाही हो! तस्सं काहीही म्हणजे काहीही झालं नाही! उलट त्या मेल्या पोस्टरकडे एकटक पाहिल्यामुळे माझी दृष्टी तिरळी होते की काय अशी शंका घरच्यांच्या मनात दाटून आली.
मग मी अशीच कण्हत, कुंथत, सुस्कारे सोडत कादंबरीमधल्या नायिकेसारखी 'सौधावर मावळत्या सूर्याच्या किरणांकडे अनिमिष नेत्रांनी' वगैरे पाहायला लागले.
शेजार्‍यांनी आस्थेनं विचारलं, ''बरं वाटत नाहीए का? डॉक्टरांना दाखवलंस का?'' घ्या!!!!
वैतागून मी बाजारातून काही कवितांची पुस्तके आणली. कविता ह्या बर्‍याचदा प्रेमानुभूती वगैरे वगैरे विषयी असतात ह्या विषयी खूप ऐकून होते. पण अहो, मी आणलेल्या कवितासंग्रहांमध्ये ''दाहक समाजमन'', ''खुळ्या बेटाचं आत्मवृत्त'', ''मी पणती झाले तर'' असे एकाहून एक अनाकलनीय विषय होते. त्यातील काही ओळी उचलून जर मी माझ्या प्रेमपत्रात घातल्या तर झालंच कोटकल्याण!
चित्रपटगृहांत काही 'प्रॉमिसिंग' गोडमिट्ट, ओशट रोमँटिक चित्रपट झळकले होते. माझा मोर्चा मी त्यांच्याकडे वळवला. त्यातल्या झाडांभोवतीच्या फेर्‍या मोजता मोजता मलाच भोवळ यायला लागली. हिरवळींवरची लोळणफुगडी गीते, बर्फाळ वातावरणातील कवायती पाहिल्यावर 'हे काय खरं नाय बोवा!' असे विचार मनात घोंगावू लागले. घरी व्हिडियोवर जुन्या जुन्या प्रणयचित्रपटांना पाहण्याचा व्यर्थ प्रयत्नही करून झाला. पण प्रत्येक चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंत मी एकतर जांभयांनी हैराण झालेले असायचे किंवा अस्वस्थपणे चित्रपट 'फॉरवर्ड' करण्याचा मोह टाळत असायचे! शेवटी तोही नाद सोडून दिला.
आता माझ्यासमोर एकच पर्याय शिल्लक दिसत होता. रोज सायंकाळी डोळ्यांना जाडसर गॉगल लावून, डोक्याला स्कार्फ गुंडाळून मी बागा, उद्याने, नदीकिनार्‍याला भेट देऊन तिथे झाडाझुडुपांआड लपत-छपत प्रेमी युगुलांची टेहळणी करू लागले. फार काही पदरात पडले नाही, पण मुंग्यांनी कडाडून डसणे म्हणजे काय असते, भलत्या ठिकाणी भलत्या कोनात अंग वळवल्याने त्याचा सर्व शरीरावर कसा 'बधिर' इफेक्ट होतो, काटेरी झुडुपांच्या आड लपण्यातले १०१ धोके इत्यादी गोष्टींचे ज्ञान मला फार जवळून झाले. आणि एक दिवस मग पोलिस मामानेही हटकले... ''हितं काय करताय वो ताई तुमी... भल्ल्या घरच्या दिसता म्हनून इच्चारलं.... ह्या वक्ताला हितं फकस्त ती गुटर्गू करनारी कबुतरं दिसत्याती.... तुमी आपलं घरला जावा....'' आता मात्र हा शुद्ध अन्याय होता! पोलिसाला देखील माझ्यावर भरवसा नसावा!!!
रागाने तणतणतच मी घरी परत आले. त्याच संतापाच्या भरात खस्सकन ते गोजिरे नोटपॅड पुढे ओढले आणि मुंडी खाली घालून पल्लेदार वाक्यांची बरसात सुरू केली.
दुसर्‍या दिवशी ते प्रेमपत्राचे पाकीट पोस्टपेटीत घालताना पुन्हा छातीत धडधड, घशाला कोरड, तळहाताला घाम अशा सर्व लक्षणांना अनुभवले. पण आता मी मागे हटणार नव्हते! मोठ्या धीराने पाकिटाला पोस्टपेटीच्या 'आ' वासलेल्या तोंडात ढकलून मी श्रद्धाळूपणे त्या पेटीला नमस्कार केला आणि मेघदूतातील नायकाच्या आर्ततेने माझे पत्र झणी पोचव म्हणून तिला साकडे घातले.
पुढचे पाच दिवस जाम टेन्शनमध्ये घालवले. फोन वाजला की तो घ्यायला जीव धजवत नसे. न जाणो, नकाराचा असला तर? पोस्टमन आला की मी लपून बसत असे.... माझे पत्र 'साभार परत' आले असले तर????
अखेर आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर तो फोन आला. पलीकडून शांत शब्दांत मला सुवार्ता सुनावली गेली, ''अभिनंदन! आपण पाठवलेलं प्रेमपत्र आमच्या सर्वोत्कृष्ट तीन प्रेमपत्रांतील एक म्हणून निवडलं गेलं आहे. प्रेमपत्र स्पर्धेच्या बक्षीस समारंभाविषयी लवकरच आपणास कळवू!''
माझ्या कष्टांना, अथक श्रमांना, संशोधनाला फळ आले होते! :-)
त्या प्रत्यक्ष पिळवटून टाकणार्‍या, गहिर, बेदर्दी अनुभवास सामोरे न जाता कडेकडेने, सावधपणे प्रेमाच्या अनुभवाचे फक्त निरीक्षण करून त्याविषयी शब्दमनोरे रचणार्‍या माझ्या सर्जनशीलतेची ती जीत होती की प्रेमकणांच्या घायाळ अनुभूतीला पारख्या झालेल्या माझ्या हृदयाची हार?
--- अरुंधती

Sunday, March 21, 2010

अर्ध्या तासाचा फरक


साल होते १९९५. नोव्हेंबर २१. नवी दिल्ली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी निघालेल्या अभ्यास सहलीचा आमचा मुक्काम गेले दोन दिवस चाणक्यपुरीच्या इंटरनॅशनल यूथ हॉस्टेल येथे होता. आमचा तीस - पस्तीसजणांचा तांडा दिल्लीत आल्यापासून नुसती तंगडतोड करत होता. पुण्यात सगळीकडे दुचाकी, रिक्षांची सवय... इथे सगळी अंतरे लांबच लांब, आणि आमचे प्राध्यापक आम्हाला ''कसे सगळे तावडीत सापडलेत, '' अशा आविर्भावात दिल्ली घुमव घुमव घुमवत होते. राजघाट, इंडिया गेट, संसद भवन, कुतुबमिनार, १ सफदरजंग रोड, १० जनपथ, बहाई मंदिर..... आमची पायपीट संपायची काही चिन्हे दिसत नव्हती! आणि जरा उसंत मिळाली की बरोबरच्या मुली आमच्या वर्गमित्रांना बरोबर घेऊन करोलबाग नाहीतर पालिकाबझारवर धाडी घालत. सायंकाळी हॉस्टेलावर दिवसभरात केलेल्या शॉपिंगचा प्रदर्शनाचा कार्यक्रम असे.
मला दोन दिवस फीर फीर फिरून जाम कंटाळा आला होता. पाय तर काय दुखत होते विचारू नका. कोठेतरी शांतपणे, आरामात, ए‌‌. सी. च्या थंडगार झुळका खात अतिशीतपेयांचा आस्वाद घ्यावा, सोबत मंद संगीत असावे, निवांत गप्पांचा फड जमवावा अशा दिवास्वप्नांत मी गर्क होते. हीच अवस्था माझ्या अन्य दोन अमराठी मैत्रिणींची होती. बाकी कळपातील शिस्त व अनुशासनाला (? ) न जुमानता कामचुकार म्हशींप्रमाणे आम्ही कधी आमच्या ग्रुपला चकवा देऊन ह्या 'स्थल-दर्शनातून' निसटतो असे आम्हाला झालेले!
अखेर ती घटिका आली! एकामागून एक स्थळांचे डोळे भिरभिरवणारे दर्शन घेतल्यावर आमचे प्राध्यापक आम्हाला प्रगती मैदानावर घेऊन आले. तिथे कोणतातरी मेळा भरला होता. त्यांची अपेक्षा होती की आम्ही दुखऱ्या पायांनी ते मैदान पालथे घालत त्या मेळ्याचा आनंद घ्यावा! ह्यॅ!!!!
बाकी सर्व ग्रुप मैदानात शिरल्यावर आम्ही तिघी मैत्रिणींनी सर्वांची नजर चुकवून तिथून कल्टी मारली. आदल्या दिवशी कॅनॉट प्लेस मध्ये ''निरुलाज''च्या जवळचे ''द होस्ट'' नावाचे एक मस्त तारांकित हॉटेल आम्ही हेरून ठेवले होते. आदल्या दिवशी तिथे थोडा अल्पोपाहारही केला होता. जुन्या युरोपियन धाटणीचे वातावरण, आल्हाददायक ए. सी. आणि चकाट्या पिटायला अतिशय उत्तम! आता तिथेच जायचे, मस्त हाणम्या जेवायचे आणि तेथील ए. सी. चा मनोरम आनंद घेत फुल्ल्टू टाईमपास करायचा.... मग सायंकाळी बाकी ग्रुपला थेट हॉस्टेलावर गाठायचे... वाट चुकलो वगैरे सांगून वेळ मारून न्यायची, असा प्लॅन ठरला.
एका रिक्षात आम्ही तिघींनी स्वतःचे देह कोंबले व कॅनॉट प्लेसच्या दिशेने प्रवास सुरू केला.
आमचा आनंद एव्हाना 'कशी हूल दिली' ह्या कल्पनेने व दोन-तीन दिवसांनी धड आरामात बसून जेवायला मिळण्याच्या संधीप्राप्तीने गगनात मावत नव्हता. चाणक्यपुरीत विदेशी वकिलाती व त्यांच्या टोलेजंग इमारती, कचेऱ्या, बंगले, हॉटेल्स, रस्ते, चौक सगळेच चकचकीत होते... पण हॉटेल्स पंच-सप्त तारांकित असल्यामुळे आमच्या खिशाच्या बाहेर! हॉस्टेलाचे अन्न सुमार होते आणि त्यात तिथे एक पंजाब - हरियाणाची हॉकी टीम राहायला आलेली.... त्यांच्या अफाट खाण्यामुळे हॉस्टेल कॅन्टिनमधले बहुतेक पदार्थ संपलेले असत. त्यामुळे गेले तीन दिवस आम्ही कोणत्यातरी चायनीजच्या गाडीसमोर उभे राहून, नाहीतर हॉस्टेलाजवळच्या रस्त्यावरच्या धाब्यावर अक्षरशः खाली पदपथावर फतकल मारून जेवत होतो.
आज मात्र आमचे खाद्य भाग्य उजाडले होते!
हॉटेलपाशी पोहोचेपर्यंत दुपारचे अडीच झालेले. बाहेर टळटळीत ऊन असताना आपण कसा ए. सी. हॉटेलात बसून यथेच्छ जेवण चापायचा निर्णय घेतला ह्याबद्दल स्वतःच्या अक्कलहुशारीचे कौतुक करतच आम्ही हॉटेलबाहेर दाखल झालो. तिथे आम्हाला आमच्यासारखीच दोन चुकार मांजरे उर्फ आमचे वर्गमित्र दिसले. म्हणजे काल ह्यांनीदेखील हे हॉटेल हेरून ठेवले होते म्हणायचे!! एकमेकांना 'कसे इतरांना गंडवले'च्या टाळ्या देऊन झाल्यावर आम्ही सुहास्यवदनाने हॉटेलात प्रवेश केला. एका छानशा टेबलला मोकळे पाहून तिथेच बसायचे ठरवले. 'लंच क्राऊड' ओसरत आल्यामुळे जागा मिळायला काहीच प्रॉब्लेम आला नाही.
मग सुरू झाला आमचा टाईमपास. स्टार्टर्स, मॉकटेल्स, गप्पांचा राऊंड - मग वेटर दोन-तीनदा सूचकपणे ऑर्डर घ्यायला आल्यावर पुढची ऑर्डर असा कार्यक्रम सुरू झाला. तसे आम्ही सगळे पुण्यातही फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, डेक्कन, कॅंप इत्यादी ठिकाणच्या विविध रेस्टॉरंटसमध्ये चकाट्या पिटण्यात माहिर असल्यामुळे येथेही तेच काम कुशलतेने पार पाडण्यात आम्हाला कसलीच अडचण येत नव्हती. बरं, स्टाफदेखील कसलीही खळखळ न करता चुपचाप आमचे हास्यविनोद, लांबवलेल्या ऑर्डरी, आमच्या दोस्तांची कॉमेडीगिरी वगैरे सहन करत होता. शेजारच्या दोन-तीन टेबल्सना काही परदेशी प्रवासी बसले होते, त्यात दोन-चार रुपसुंदऱ्या असल्यामुळे आमच्या मित्रांचे निम्मे लक्ष गप्पांमध्ये, निम्मे 'त्यांच्या'कडे लागले होते. आम्हीही त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन दोघांनाही भरपूर छळून घेतले.
अचानक मित्राची नजर मनगटावरच्या घड्याळाकडे गेली. ''ओह, शि* यार! वुई आर ब्ल* लेट फॉर अवर कर्फ्यू टाईम! ''
पाहिले तर सायंकाळचे सात वाजत आलेले. अरेच्या! वेळ कसा आणि कुठे गेला हे कळलेच नव्हते! आणि दिल्लीत पाऊल टाकल्या टाकल्या आमच्या प्राध्यापकांनी समस्त विद्यार्थ्यांना तंबी दिली होती : सर्वांनी सायंकाळी सहाच्या आत हॉस्टेलावर हजर पाहिजे! मुलींना तर साडेपाचापर्यंतच हजर राहण्याच्या सूचना होत्या. कारण साहजिकच चाणक्यपुरी भागातील अतिकडक सुरक्षा, चेकपोस्ट्स, निर्जन रस्ते, गुन्हेगारी आणि अतिरेक्यांकडून घातपाताची भीती ह्याशिवाय आमचे त्या शहरात असलेले नवखेपण हे होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घेतलेली ही दक्षता होती. त्या काळात दिल्लीतील, खास करून आम्ही राहात असलेल्या भागातील सुरक्षा अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे बरीच वाढवलेली होती. रस्त्यात सर्वसामान्य माणसे कमी व सुरक्षा कर्मचारी अधिक दिसायचे.
अर्थात आमच्या टाईमपासमध्ये आम्ही ही बाब साफ विसरलो होतो! मग काय! घाईघाईत बिल दिले, टॅक्सी पकडली आणि हॉस्टेलाचा मार्ग धरला. अंधार पडल्यावर एरवी उजेडात ओळखीची वाटणारी दिल्ली परकी परकी, असुरक्षित वाटू लागली होती. रस्त्यावरच्या वाहनांचे वेग वाढले होते. चाणक्यपुरीच्या जवळ तर रस्त्यात माणसेच नव्हती. होत्या त्या फक्त भन्नाट, सुसाट वेगाने धावणाऱ्या परदेशी बनावटीच्या, काळ्या काचांच्या अशक्य चकचकीत गाड्या!! रस्त्यावर दोन-तीनदा आम्हाला सुरक्षारक्षकांनी, पोलिसांनी थांबवले, आमची ओळखपत्रे पाहिली आणि मगच पुढे सोडले. वॉकीटॉकी काय, हेल्मेटस काय... हे सुरक्षा प्रकरण आम्हाला झेपणारे नव्हते!
हॉस्टेलमध्ये पोचलो तेव्हा जवळपास पावणेआठ होत आलेले.
आमच्या उरलेल्या दोन रूममेट्स आम्ही लपत-छपत रूममध्ये प्रवेश केल्यावर अक्षरशः चिडचिडाट करत आमच्या अंगावर धावूनच यायच्या शिल्लक होत्या. ''कहां गये थे रे तुम लोग? पता है क्या, सर दो-दो बार चक्कर लगाके गए सब रूम्सकी। हमने कैसे उन्हे रोका है हमेही पता है... क्या क्या बहाने बनाने पडे तुम लोगके लिए.... अब सरको यदी मालूम पडा और उन्होंने इंटर्नल्स और व्हायवाके मार्क्समेंसे कुछ मार्क्स काटे तुम लोगके, तो हमे मत बताना, हां! '' अरे बापरे! हा तर विचार आमच्या डोक्यातच शिरला नव्हता. आम्ही आवरून घेईपर्यंत सर पुन्हा एकदा 'चेक' करायला आलेच होते. मग हसत हसत, 'हॅलो सर, गुड इव्हिनिंग सर.... ' वगैरे मोघम गप्पा मारून झाल्यावर ते एकदाचे अंतर्धान पावले. हुश्श! इंटर्नल्स आणि व्हायवाचे मार्क्स बचावले!!
त्या रात्री आम्ही तिघी उशीरापर्यंत 'आपण कशी धमाल केली' म्हणून खिदळत होतो. पण का कोण जाणे, कुठेतरी काहीतरी चुकतंय असेच मनात खोलवर वाटत होते.
ते असे का वाटत होते त्याचे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उलगडले.
मी आमच्या रूममध्ये तयार होत होते तेवढ्यात कालच्या आमच्या हॉटेल-स्वारीतील एक मैत्रीण रूममध्ये आली आणि फुसफुसली, ''जल्दी नीचे आ, बाकी सब इंतजार कर रहे है ।'' मला तर काही कळेना! तर माझा हात धरून ती जवळपास मला ओढतच खाली घेऊन गेली. ''अरे, तू बताएगी क्या यह सब क्या चल रहा है? '' इति मी. ''तू देख'' करत तिने मला स्वागतकक्षात नेले. तिथे तिपाईवर दोनचार इंग्रजी वृत्तपत्रे पडली होती. तिने त्यातले एक उचलले व माझ्या हातात कोंबले, ''ले, पढ! '' मी मथळ्यावर नजर फिरवली आणि पायाखालची जमीनच जणू सरकत आहे असे वाटले.
आदल्या सायंकाळी ठीक साडे-सातच्या दरम्यान कॅनॉट प्लेसमधील हॉटेल दिल्ली दरबारजवळ झालेल्या शक्तीशाली बॉंम्ब स्फोटात दोन नागरिक ठार, बावीस जखमी.... माझ्या हातातून वर्तमानपत्र गळून पडायचेच ते काय शिल्लक राहिले! आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो ते दिल्ली दरबारपासून थोड्याच म्हणजे तीन-चार मिनिटांच्या रस्त्यावर होते. आदल्या दिवशी ह्याच दिल्ली दरबारच्या बाहेर आम्ही परतीसाठी टॅक्सी शोधत होतो! आणि त्यानंतर जेमतेम अर्ध्या तासात तिथे बॉंम्ब ब्लास्ट झाला होता! आपल्याला तिथे अजून उशीर झाला असता तर???!!! कल्पनाही करवत नव्हती.
आपल्या बरोबर, हॉटेलात आजूबाजूला असणार्‍यांपैकी तर कोणी त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये सापडले नसतील? नोव्हेंबरच्या सकाळच्या धुकंभरल्या थंडीतही मला घाम फुटला होता. काही सुचत नव्हते!
आमचे ते दोन मित्र व आम्ही तिघीजणी यांची सायलेंट कॉंन्फरन्स झाली. ''पेपर देखा क्या? '' ''हां यार, बाल बाल बचे।'' ''चूप! कोई कुछ नही बोलेगा ।'' ''हां, यह भी सही है, यदी औरोंको पता लगा तो....स्पेशली सर को....।'' ''देखो, अपना चेहरा जरा ठीक करके जाना औरोंके सामने.... नही तो पूछेंगे ।'' ''हां रे.... '' आमची धेडगुजरी कॉन्फ़रन्स संपली. दिल्लीच्या घटनेमुळे बाकी स्थलदर्शनाला गुंडाळून पुढच्या टप्प्याला, म्हणजेच आग्रा - मथुरेला जाण्याचे ठरले. जाताना आमची बस कॅनॉट प्लेसवरून गेली. खिडक्यांच्या काचांतून मुंड्या बाहेर काढायचेच ते काय शिल्लक ठेवून समस्त सहाध्यायींनी बॉंम्ब ब्लास्टच्या जागेचे दर्शन घेतले. ''ए तूने देखा क्या, वह दूकान कितनी जली हुई दिखायी दे रही थी ना? '' एक वर्गमैत्रीण दुसरीला मोठ्यानं विचारत होती. मी मात्र मनातल्या मनात ''देवा, वाचवलंस रे बाबा! आता पुन्हा अशी चूक करणार नाही!! '' हेच पुटपुटत बसले होते!
-- -- अरुंधती
(वरील घटना जरी 'कथा' म्हणून लिहिली असली तरी सत्यघटना आहे.)

Tuesday, March 16, 2010

प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव



वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात.
पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र! रूप व सौंदर्याचा साक्षात आविष्कार असलेल्या कामदेवाच्या घरी पुत्रजन्म झाल्यावर सारा निसर्ग बहरून येतो. वृक्ष त्याच्यासाठी नव्या पालवीचा पाळणा बांधतात, पुष्प-कुसुमे त्याचेसाठी नव्या वस्त्रांची भेट घेऊन येतात, शीतल-सुगंधित वारा त्याला झोका देतो आणि कोकिळ पक्षी आपल्या सुमधुर स्वरांनी त्याचे मनोरंजन करतो. असा हा सृजनोत्सव! म्हणूनच बहुधा वसंताला ऋतुराज म्हणत असावेत! त्याच्यावर आधारित संगीत राग 'बसंत बहार' ह्या नवचैतन्याचीच प्रचीती देतो.
प्राचीन साहित्यात वसंत ऋतूमध्ये 'वनविहार', 'डोलोत्सव', 'पुष्पशृंगार' व 'मदनोत्सव' मोठ्या प्रमाणावर नागरजनांमध्ये साजरा केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.संस्कृत साहित्यात माघ शुक्ल पंचमीला मदनोत्सव साजरा केला जात असल्याची सुरेख वर्णने आहेत. सुगंधित केशर व कुंकवाच्या सड्यांनी सर्व नगर, रस्ते सुगंधित केले जात असत. त्या पीत-आरक्त वर्णाने सारे नगर जणू सुवर्णमयी भासत असे. सर्व जाती, लिंग, वय, श्रेणीचे लोक आपापसातले भेद विसरून ह्या वसंतोत्सवात सामील होत असत. नृत्य, गायन, वाद्यसंगीत, नाट्य इत्यादींचा आस्वाद घेत असत. केसांमध्ये फुले माळून हळद, कुंकू व तांदळाचे चूर्ण विखरून रंगांचा खेळ खेळत असत. वसंत विहारात स्त्रिया फुले, पाने गोळा करत; त्यांच्या आकर्षक माळा गुंफत; आम्रमंजिरी तोडत, केशर-कुंकुमाचे तिलक लावून कधी आपल्या प्रियतमाच्या कानावर फूल खोचून त्याला दृढालिंगन देत. उद्यानयात्रांत, वन-विहारांत स्त्री-पुरुष एकत्रितपणे मद्यपान करीत असत. सर्व स्तरांचे नागरिक वसंतोत्सवात सामील होत असत. रमणी, सुंदर स्त्रियांनी अशोक वृक्षाला लत्ताप्रहार करून त्याला 'फुलविण्या'चाही खास सोहळा असे. हिंदोळ्यांवर झुलणे हा ही वसंत ऋतूतील एक अविभाज्य भाग! त्यावेळी म्हणे 'हिंदोल' राग गायला जाई.
वसंतात व ग्रीष्मात पाण्यात वाळा, नागरमोथा, सुगंधी पुष्पे घालून तसे सुगंधित पाणी प्यायले जात असे. दुपारीही सर्वांगाला चंदनाची उटी लावून, अंगावर तलम वस्त्रे लेऊन, पंख्याचा वारा घेत रमणी विश्राम करीत असत. एका वर्णनात वसंत ऋतूतील सायंकाळी अभिजन आपला वेळ कसा व्यतीत करत ह्याचे फार मनोहर चित्र रंगविले आहे. सायंकाळी सौधावर सुगंधित जलाचे सडे घालून पांढर्‍या शुभ्र बैठकी मांडल्या जात. तिथे किंवा नगराबाहेरच्या उपवनांत, आम्रवाटिकेत सर्व अभिजन गायन, नृत्य, वादन, काव्य-श्रवण इत्यादी कलांचा आस्वाद घेत, मधुर फळांचे थंड रस अथवा सुरा नक्षीदार रजतपात्रांमधून प्राशन करत असत. त्याअगोदर सायंकाळी शीतल, सुगंधित पाण्याने स्नान करून, तलम मलमलीची वस्त्रे परिधान करून, गळ्यात मोगरा - जाई-जुई सारख्या शीतलता प्रदान करणार्‍या पुष्पांच्या माळा घालून, अंगाला चंदन-केशराची उटी, तिलक लावून ते ह्या सायंकालीन कार्यक्रमास सज्ज होत. मनोरंजन, तांबूलसेवन, शुकसारिका यांद्वारे रंजन अशा विविध मार्गांनी वसंत ऋतूमधील सायंकाळी व्यतीत होत असत.
आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत अशी वर्णने वाचूनही मन उल्हसित होते. मदनोत्सव, दोलोत्सव, रंगोत्सव एवढ्या रसिकतेने साजरे करणारे हे लोक आपल्यापेक्षा एका परीने विचारांनी व आचरणाने प्रगत व अभिरुचीसंपन्नच म्हणावे लागतील ह्यात शंकाच नाही!
-- अरुंधती

Wednesday, March 10, 2010

वीजेची जादू!

लहान असताना जादूच्या समस्त प्रयोगांनी मला जबरदस्त मोहिनी घातली होती. माणसाचे कबूतर होते, कबुतराची फुले होतात, फुलांचे रंगीबेरंगी रूमाल होतात.... आणि ह्या सगळ्या भरात मूळ कोणती वस्तू गायब झाली हेच तुम्ही विसरून जाता. जादूगार खूष, तुम्हीही खूष! पैसा वसूल!! पण गायब झालेली वस्तू मिळते का हो परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते. जादूच्या ह्या नियमाला शिरोधार्थ मानणारी मी....
त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे.


आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. फक्त लहानपणीच्या कथांमधील जादूने गोष्टी गायब करणार्‍या जादूगाराची जागा आश्वासनं देणारे मंत्री, सरकार, प्रशासन यांनी घेतली आहे. लोक काहीही म्हणोत! मात्र मी त्यांच्यावर आणि त्यांनी गायब केलेल्या वस्तूंवर विश्वास ठेवायचं सोडलं नाही हां!
आमच्याकडे बाजारात बर्‍याच गोष्टी गायब होत असतात. पण आम्ही स्वतःला सवय लावली आहे. एखादी गोष्ट गायब झाली म्हणून स्वतःचे फारसे अडू द्यायचे नाही. त्या वस्तूशिवाय जगायला शिकायचे. मग पुन्हा ती वस्तू बाजारात नव्या किमतीने अवतीर्ण होते तेव्हा ठरवायचे की त्या वस्तूला पुन्हा घ्यावे की नाही? न जाणो, उद्या पुन्हा गायब झाली तर अडायला नको हो! असं आपलं आमचं साधं सोपं मानसशास्त्र!
गेली दोन-तीन वर्षे आमच्याकडे उन्हाळ्याची चाहूल लागली की वीज आणि पाणी हुतुतू, खो खो, लपंडाव सुरू करतात. आधी वीज गायब, मग पाणी गायब!! आह्हे ना ज्जादू?!! पाऊस पडो अगर न पडो, जलाशय - धरणे भरोत अगर न भरोत... गरजेपेक्षा पाण्याचा साठा कायम कमीच भरतो. पण तरीही आमचे सर्व मंत्री आश्वासने द्यायचं सोडत नाहीत बरं का!! कसले खेळकर आहेत ना आपले सर्व मंत्री?!! Tongue
वर्षभर भारनियमनमुक्तीच्या चर्चा, आश्वासने आम्ही श्रद्धेने ऐकतो. ह्याही वर्षी ऐकली. भक्तिभावाने इतरांनाही ऐकवली. पण सगळे थोडेच आमच्यासारखे सश्रद्ध! आमच्या भोळ्या भाबड्या चर्येकडे तुच्छ कटाक्ष टाकून, नाकपुड्या फेंदारून ते आमच्या भारनियमनमुक्तीच्या भावस्वप्नांना वास्तववादाची डूब देऊन भंग करण्यास आसुसलेले असतात. आमचे दादा, ताई निवडणुकांपूर्वी आणि नंतरही, आम्हाला ठासून सांगतात की ह्या वर्षापासून ते आमच्या भागाला भारनियमनमुक्त करणार म्हणजे करणार म्हणजे करणारच!!! आम्हीपण लग्गेच वर्तमानपत्रांत बातम्या छापून आणून कौतुकाचे पेढे सर्वांना भरवतो. हो, उगाच कुणाचं तोंड गोड करायचं राहिलं म्हणून त्यांनी नंतर कडूजहर मनाने आमच्या तोंडाचे पाणी (शब्दशः) पळवलं असं नको व्हायला! ह्या वर्षीचा उन्हाळा गारगार बरं का.... डोक्यावर फॅन गरगरणार, नळाला पाणी येणार, फ्रीज चालू राहणार, ए. सी. ची हवा झुळूझुळू वाहणार.... अहो, कसलं ते थंड हवेच्या ठिकाणांचं कौतुक करून राहिलात!! आमचं घर हेच आमचं थंड हवेचं ठिकाण होणार, बरं का!
उन्हाळ्याची सुरुवात तर चांगली होते. आश्वासनांच्या सुखस्वप्नांत आम्ही नेहमीप्रमाणेच गाफील असतो. वर्तमानपत्रांत कलिंगड, काकड्या, लिंबू सरबत, ऊसाच्या रसाची विक्री करणार्‍यांचे फोटो 'उन्हाळ्याची चाहूल' देत छापून यायला लागले की आम्हालाही उन्हाळ्याची चाहूल लागते. सालाबादप्रमाणे घरात ए. सी. घ्यावा की नाही ह्यावर चर्चा झडते. गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे सर्व ए. सी. कांक्षी गृहसदस्यांच्या योजनांना अडसर बनण्याचे सोडून आम्हीही उत्साहाने ए. सी. घ्यायलाच पाहिजे इत्यादी इत्यादी चर्चेत समरसून भाग घेतो.
दुसर्‍याच दिवशी घरात सकाळपासूनच विजेने पोबारा केलेला असतो. पण आम्ही मनाची समजूत घालतो.... केबलमध्ये बिघाड असेल.... ट्रान्स्फॉर्मर उडाला असेल..... दुरुस्ती चालली असेल.... नाहीतर अशी पूर्वसूचना न देता ऐन परीक्षेच्या मोसमात वीजकपात मायबाप सरकार नक्कीच करणार नाही!
दुपारी घराजवळच्या भव्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दालनाकडे आमची पदकमले वळतात. बघतो तो काय, सारे दुकान अंधारात, दुकानातले नोकर हवा खात दुकानाच्या पायर्‍यांवर चकाट्या पिटत बसलेले आणि दुकानात मालक इमर्जन्सी दिव्याच्या प्रकाशात लुकलुकताना दिसतात.
"अहो, काय हो हे? " अस्मादिकांचा मूर्ख प्रश्न!
दुकानाचा एक आगाऊ नोकर दात विचकतो, "ह्यँ ह्यँ ह्यँ.... तुम्हाला माहीत न्हाय का ताई..... पावरकट हाय आजपासून.... आता रोज दुप्पारच्याला आसंच बसायचं.... " अमादिकांच्या फुग्यातली हवाच फुस्स गुल होते! अस्मादिक दाणकन भूतलावर आपटतात!
हाय रे माझ्या ए. सी. विरोधी दैवा! असा कसा तू अवसानघात केलास!! आता मी गारव्याच्या आशेने कोणाकडे पाहू? भर दुपारच्या उकाड्यात जर ए. सी. नाही चालला तर मग त्याला विकत घेऊन काय करणार कप्पाळ??!!
निराशेने घेरलेल्या मनाने मी दुसर्‍या दुकानी जाते. तिथेही तीच तर्‍हा!!! एवढ्या सुंदर, भव्य दालनात कितीतरी कंपन्यांचे ए. सी. मांडलेले असताना सर्व दुकान व दुकानमालक मात्र उकाडा व अंधाराच्या खाईत! काय हा विरोधाभास!! हा हन्त.... हा हन्त.... तेथून वीजमंडळाच्या कार्यालयात धडक मोर्चा..... तिथे तर कर्मचारी जांभया देत, हातातल्या वर्तमानपत्राने स्वतःला वारा घालत आणि आजूबाजूच्या माशा उडवत समस्त जगताकडे तुच्छ कटाक्ष टाकत बसून असतात. "वीज कधी येणार? भारनियमनाचे टाईमटेबल तरी द्या... " अशा सवालांना टेबलवर बसलेल्या माशीच्या सहजतेने उडविले जाते. मम पदरी/ ओढणीत घोर निराशा.....
वृत्तपत्राच्या कार्यालयात तरी आपल्या दु:खाला कोणीतरी वाचा फोडेल ह्या अंधुक आशेने आम्ही एका वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये डोकावतो. संपादकांसकट सर्व वार्ताहर, कर्मचारी...कोणालाच आमच्या दु:खाची कदर वाटत नाही.
"अहो ताई, तुमच्याकडे दुपारचे चार-पाच तास वीज जाते म्हणून तुम्ही डोकं धरून बसलात, मग ग्रामीण भागातील शेतकर्‍यानं काय करायचं? तिथे तर बारा - बारा तास वीज जाते.... सगळं शेतीचं काम खोळंबतं....किती नुकसान होतं माहीत आहे?" वर्तमानपत्राच्या ग्रामीण पुरवणीचे संपादक गरजतात. अस्मादिकांना उगीचच अपराधी वाटू लागतं. आम्ही वीजबिल नियमित भरतो, खाडे करत नाही, वीजचोरी करत नाही....याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सरकारने दिलेल्या आश्वासनांना आपला हक्क समजावा....
घरचे लोक ह्याही वर्षी ए.सी. खरेदीचे बेत कॅन्सल करतात. शेवटी ए.सी. चालायला वीज तर हवी ना!
पण अजूनही मी आस सोडलेली नाही.... घरच्या, दारच्या अंधाराला व उकाड्याला कंटाळून जनरेटर बॅक-अप असलेल्या वातानुकूलित मॉल्स व मल्टिप्लेक्सची वाट धरलेली नाही! रोज वर्तमानपत्रांत 'आज तरी भारनियमनाची बातमी देणार का' असे पुटपुटत सर्व निवेदने, जाहिराती, श्रद्धांजल्या नीट कसून वाचणे सोडलेले नाही. न जाणो, कोठे ती बातमी छोट्या प्रिंटमध्ये छापली असली तर......!!!! मन्त्रीबोवांनी कोणत्या तरी भाषणात भारनियमनमुक्तीच्या नव्या आश्वासनांची हवा आमच्या जनतेच्या मनांत भरली असली तर?
तर अशा ह्या वीजलपंडावामुळे हैराण झालेल्या जीवांनो, असे गप्प बसू नका. खेळकर बना! आजच थंड हवेच्या स्थळांच्या सहलीचे बुकिंग करून (बे)जबाबदार अधिकार्‍यांना खो द्या. [मोर्चे, घेराव, धरणी, आंदोलने करून काहीही साध्य होत नाही... म्हणून! ] किंवा माझ्यासारखे लेखनाचे माध्यम स्वीकारून आपल्या घोर आशावादाला साजरे करा! Wink
-- अरुंधती

Monday, March 08, 2010

बीटी पोर!



आमच्याकडे सध्या नवा वाद रंगलाय.
आमच्या ओळखीचे एक शेतकरी दादा परवा तावातावाने घरात शिरले.
त्यांच्या व माझ्या भावामधला हा संवाद!

"तुम्ही ते बीटी वांग्याचं, बीटी भाज्यांचं आमच्या बायकूकडं येवढं कवतिक का हो करून राहिला भाऊ? "
"का? काय झालं? मी तर वर्तमानपत्रातल्या बातम्या मोठ्यानं वाचत होतो!"
"अहो, तुमचं वाचन आमच्या बायकूनं आयकलं आन आमच्या 'हिच्या' डोक्यात तवापास्नं किडा वळवळाया लागलाय बघा... म्हनत्ये की भाजीत जर त्या ब्यॅक्टेरियाचा जीन टाकता येतो तर मग मानसात का नाही?"
"म्हणजे? मी नाही समजलो... "
"अहो, आता बघा, त्यो जीन घालून पिकवल्येलं वांगं म्हने कीड, रोगाला जवळ फटकू द्येत न्हाय... त्येला दवा-औषध काय लागत न्हाय असं आमचे दादा म्हनून राह्यले...म्हंजे त्ये आसं त्यांच्या भाषनात म्हनाले आसं तुमीच सांगितलं! "
"बरं... मग? "
"तर आता आमची 'ही' म्हनतिया की फुडचं प्वार बीटी प्वारच पायजेल! "
"आँ? "
"आरं भाऊ, तिचं म्हननं जर बीटी वांग्याला कीड, रोग लागत नसंल, दवापानी कराया लागत नसंल तर तसंच मानसाच्या पोराला का नको? मानसात पन घालायचा असलाच कंचा तरी जीन आन मग होऊन जाऊ द्ये पटापटा हवी त्येवढी पोरं! "
"अरे बाबा, पण त्याला कायद्यानं मान्यता हवी ना! आणि तेवढं तंत्रज्ञानही विकसित व्हायला हवं! "
" पर कायदा का म्हनून नाकारेल अशी बात? जर त्यानं समद्यांचा फायदा होत आसंल, भलं होत आसंल तर मग कायदा त्या बाजूनंच हवा की हो राव! आन तुमी ते तंत्रज्ञानाचं काय पन सांगू नकासा! फारीनला ते गोरे लोक जर डुप्लिक्येट मानूस बनवून राह्यले तर ह्ये तर येकदम सोप्पं काम हाय! मस्त चार-पाच पोरं झाली की कारभारनी माझं टकुरं खानं बंद करंल!"
"अरे, पण एवढ्या पोरांना तू खायला काय घालणार? त्यांचा कसा सांभाळ करणार? "
"आवं आसं काय बोल्तासा, हायेत की मंग आपली बीटी वांगी, बीटी धान्य आमच्या बीटी पोरास्नी पोसाया....जास्त पोरं म्हंजे शेतात कामास्नी येत्याल, आन आजारी पन पडणार न्हाय.... "
आता आमच्या ह्या शेतकरी भाऊना काय बरे उत्तर द्यावे?
त्यांना आता बीटी पोर हवे आहे. भारत सरकार त्यांना मदत करेल काय?

-- अरुंधती



Friday, March 05, 2010

माठाय तस्मै नमः |


होळी जळाली, थंडी पळाली की उन्हाचा प्रखर ताप जाणवू लागतो. हिवाळ्यात मऊसूत वाटणारे ऊन अंगाची कल्हई करू लागते. आणि पावले मग आपोआपच कुंभारवाड्याकडे वळतात. तऱ्हेतऱ्हेच्या आकाराचे, घाटाचे, मातीचे माठ तिथे तुमच्या प्रतीक्षेतच असतात. अगदी छोट्याशा मडक्या, सुगडांपासून ते गरगरीत डेऱ्यांपर्यंत आणि नळाच्या तोट्या असलेल्या सुबक घड्यांपासून ते उभट रांजणांपर्यंत वैविध्याने नटलेली ही मृत्तिकापात्रे तुमची तहान भागविण्यासाठी सज्ज असतात. तुम्हाला हव्या त्या माठापाशी बसकण ठोकायची, माठ उभा - आडवा - तिरपा करून सर्व कोनांतून चौफेर पडताळून झाला की त्यावर बोटे वाजवून येणारा नाद तपासायचा, पुन्हा त्याला उलटा-पालटा करून न्याहाळायचा.... अशा सूक्ष्म तपासणीनंतर तोंडाने 'हम्म... ' असे काहीसे आवाज काढत आपल्या घासाघिशीच्या ठेवणीतल्या आवाजात विक्रेत्याला साद घालायची....

पुढची पाच-दहा मिनिटे सुखेनैव घासाघीस - भाव करण्यात घालवल्यावर मनासारखी किंमत मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर तसूभरही दिसू न देता आक्रसलेल्या कपाळाने पैसे देऊन माठ ताब्यात घ्यायचा, वर 'गळका निघाला ना तर आहे तस्सा परत करीन, ' अशी सज्जड धमकीवजा सूचना करून पाय घराकडे वळवायचे. [एवढे ओझे घेऊन कोण शहाणा/णी इकडे-तिकडे उंडारेल? ] मग रस्त्याने 'घट डोईवर, घट कमरेवर' असले कसलेसे गाणे गुणगुणत, माठाला मिरवत ठुमकत ठुमकत विजयी मुद्रेने जायचे.....

... पण कायमच अशी परिस्थिती नसते बरं का! ह्या माठाने मला काय काय दिवस दाखवले आहेत, काय सांगू!

एके वर्षी कुंभारवाड्यात जायला जमले नाही म्हणून घराजवळ आलेल्या हातगाडीवरून माठ आणला. दोन दिवस त्याला चांगला पाझरवला. तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रेमाने त्याच्यात पाणी भरले. वाळ्याची जुडी आत सोडली. वरून जुन्या बनियनचे ओले केलेले फडके लपेटले. आज दुपारी भर उन्हात आपल्याला गारेग्गार वाळ्याचे पाणी प्यायला मिळणार ह्याची सुखस्वप्ने रंगविते तोच...... स्वयंपाकघरात घोर हाहाःकार माजला! पाण्याने भरून ठेवलेला माठ कोणतीही पूर्वसूचना न देता अलगद मधोमध दुभंगला होता. त्याच्या भग्नावशेषांत वाळ्याची जुडी पोरकेपणाने तरंगत होती. ओटा, फरशी डोळे गाळीत होते. माझ्याही घशात दुःखातिरेकाने हुंदका दाटून आला. त्या दुर्दैवी माठाचे और्ध्वदेहिक उरकल्यावर दोन दिवस तसेच सुतकात गेले. पण तिसऱ्या दिवशी प्रखर उन्हाचे चटके स्वस्थ बसू देईनात.

एव्हाना आमची शोकगाथा शेजाऱ्यापाजाऱ्यांना कळली होती. [आमचीच टकळी! दुसरे काय?!!] दुःखी चेहऱ्यावरचा आपला कुत्सित आनंद कसाबसा लपवत सख्या शेजारणी सांत्वनपर चौकशी करत, माठ कसा - कोठून -किती रुपयांपर्यंत खरेदी करावा, ह्याबद्दल अनाहूत सल्ले देत कलकलाट करून गेल्या.

मनाचा हिय्या करून मी शिफारस केल्या गेलेल्या जवळच्या विक्रेत्याकडून दुसरा माठ खरेदी करून घेऊन आले. आधीचा उत्साह, आनंद यांची जागा नव्या माठाच्या भवितव्याच्या चिंतेने घेतली होती. ''ह्या खेपेस माठ नीट नाही मिळाला तर सगळ्या मेल्या शेजारणी मलाच फिदीफिदी हसतील! म्हणतील, ''काय बावळट बाई आहे! हिला साधा माठही खरेदी करता येत नाही!! '' इति मी.

ह्याही खेपेस मोठ्या वात्सल्याने पहिले दोन दिवस मी माठाला न्हाऊ-माखू घातले, उन्हात शेकले, पाण्यात घालून - पाणी ठेवून 'बुड बुड गंगे' केले. मग सप्तनद्यांचे, गोमातेचे व कुळदैवताचे मनोभावे स्मरण करून त्या माठाची ओट्यावर प्रतिष्ठापना केली. धडधडत्या अंतःकरणाने त्यामध्ये पाणी ओतले, झाकण ठेवले व निकालाची वाट पाहत बसून राहिले.

दुपारी दबक्या पावलांनी स्वयंपाकघरात डोकावले -- माठ भरपूर पाझरत होता, पण अद्याप अभंग होता. माझा आनंद गगनात मावेना. ताबडतोब ही बातमी जिने माठवाल्याची शिफारस केली त्या शेजारणीला तिच्या वामकुक्षीचे पुरेपूर खोबरे कसे होईल ह्याची काळजी घेत ऐकवण्यात आली. आप्तसुहृदांना ''आमच्याकडच्या माठाचं थंडगार पाणी प्यायला यायचं हं! " असे साग्रसंगीत निमंत्रण देऊन झाले. मोठ्या खुशीत ''आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी'' च्या ओळी गुणगुणतच मी त्या गारगार माठातले गारगार पाणी प्यायला स्वयंपाकघरात प्रविष्ट झाले. माठाकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकत त्यातले पाणी घेण्यासाठी झाकणी बाजूला केली, हातातले ओगराळे आतल्या पाण्यात बुडवल्यावर त्याचा जो 'डुच्चदिशी' आवाज झाला तो ह्या कर्णरंध्रांत साठवून घेतला आणि पाण्याने आटोकाट भरलेले ओगराळे बाहेर काढणार तोच..... ह्या माझ्या चक्षूंसमोर तो अगस्तीमुनींचा तात - माझा माठ - भंगोनी गेला.... माझ्या हातात फक्त ओगराळेच उरले!!

घरात पुढचे काही दिवस सामसूमच होती. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कोणीही आपापली रसवंती पाजळली नाही. शेजारणीदेखील दूर दूर फटकूनच राहू लागल्या. न जाणो माझी नजर त्यांच्या घरांतील माठांवर पडली तर!

एक दिवस ओळखीचे एक मामा आकाराने जरा लहान, पण बरा दिसणारा माठ अंगापोटावर वागवत घरी घेऊन आले. त्यांच्याच शुभहस्ते त्याला स्वयंपाकघरात बसविले. ते म्हणे आपल्या स्वतःच्या घरी त्या माठाची दोन दिवस 'ट्रायल' घेऊन आले होते. माठात पाणी भरून, त्याला ओल्या फडक्यात थापटून थोपटून, माझ्या हातचा चहा पिऊन, ''आता काळजी नको, '' असे बजावत मामांनी निरोप घेतला. मी मनातल्या शंका - कुशंकांना मोठ्या मुश्किलीने दाबत असताना कामवाली बाई पचकलीच, "आजा झाला, बिजा झाला, आता तिजा न्हाय झाला म्हंजे मिळवलं रे बाप्पा! "

त्या बाप्पाने बहुधा तिची व आमची लाज राखायचे ठरवले असावे. झिरपून झिरपून पाणी गाळत का होईना, तो माठ त्या उन्हाळ्यात आमचा त्राता ठरला. ह्यापुढे कोणतीही माठ-खरेदी कुंभारवाड्यात जाऊनच करायची हे मी एव्हाना मनाशी पक्के केले होते.

आता मी जेव्हा कुंभारवाड्यात जाते तेव्हा तेथील विक्रेत्यांशी विशेष ममत्वाने बोलते. फारशी घासाघीस करत नाही. फार चिकित्सा करत बसत नाही. आणि हो, येताना त्या माठाला नेहमीसारखा मिरवत न आणता ओढणीखाली लपवून आणण्याची दक्षता मात्र जरूर घेते. हसणारे हसतात. हसेनात का! त्यांना काय माहीत, एक माठ सलामत, तो उन्हाळा पचास!


-- अरुंधती 

Thursday, March 04, 2010

माझे संत्रापुराण

परवा घरी आलेल्या पाहुण्यांनी चांगली केशरी जर्द, रसरशीत दिसणारी स्टीकर लावलेली संत्री 'खाऊ' म्हणून आग्रहाने हातात कोंबली. ऐन उन्हाळ्यात, पारा ३६ डिग्रीज सेल्सियस च्या आसपास असताना अशी 'खाऊभेट' म्हणजे मनपसंतच! अस्मादिक एकदम खूषच! संत्र्यांचा रंग, रूप पाहूनच खूप छान वाटत होते.
काल दुपारी उन्हाने जीव हैराण झाला असताना अचानक त्या संत्र्यांची आठवण झाली. मोठ्या अधीरतेने त्यातली दोन संत्री सोलायला घेतली. पण काय हो! हे प्रकरण जरा अजब दिसत होते! ना त्या संत्र्याला तो चिरपरिचित सुवास, ना साल काढताना अंगावर - डोळ्यांत हमखास उडणारा व चुरचुरणारा रस....आणि एरवी पटकन सोलून होणारे संत्रे सालीला अंगाभोवती घट्टमुट्ट लपेटून बसलेले. एका झटक्यात साहेबजादे सोलले जाण्याचे नावच घेत नव्हते!
कशीबशी दात ओठ खाऊन ती संत्री सोलण्यात मी यशस्वी झाले मात्र, पण खरी कसोटी तर आता पुढेच होती. एरवी संत्रे सोलले की त्याच्या पाकळ्या आपोआप विलग होत. इथेही त्यांनी असहकार धोरण स्वीकारलेले. पुन्हा एकदा शक्ती देवतेला पाचारण करून मी त्या पाकळ्यांची फारकत केली.
एका बशीत त्या ओढाताणीत रुसलेल्या संत्र्याच्या पाकळ्या रचल्या....एक पाकळी अलगद तोंडात टाकली....आणि माझा चेहरा खरेच प्रेक्षणीय झाला.....
कोणीतरी माझी घोर म्हणजे घोर चेष्टा केली होती. मी जे संत्रे म्हणून खात होते ते संत्रे नव्हतेच मुळी! त्याला ना धड संत्र्याची चव होती, ना मोसंब्याची! ना ते माधुर्य, तजेला, आंबटगोड स्वाद, ना तोंडात रेंगाळणारा ताजेपणा.... हे कसले तरी संत्र्याच्या नावाखाली खपवलेले बेचव फळ होते.
म्हणायला बिया कमी म्हणजे अगदीच क्षुल्लक होत्या आणि आंबटपणा नावालाही नव्हता. प्रत्येक फळाची खास अशी चव ठरलेली असते. संत्रे म्हटले की ते आंबटगोड हे ठरलेले! पण अहो, त्याचा आंबटपणा अपेक्षितच असतो हो! ही तर संत्रे नावाखाली केलेली शुद्ध बेचव फसवणूक होती.
आज सकाळी बाजारात मला नेहमीचा फळ विक्रेता दिसल्यावर मी मुद्दाम मोर्चा तिकडेच वळवला.
"ही स्टिकर्स वाली संत्री म्हणजे काय भानगड आहे रे भाऊ?" माझा सवाल.
समोर हारीने रंग, रूपाने गोमटी दिसणारी स्टिकर्सवाली संत्री मांडून ठेवली होती.
"घ्या ना, ताई, एकदम मस्त, नवा माल आहे. जरा महाग आहे, पण चवीची ग्यारंटी! एकपण संत्रं आंबट निघालं तर पैसे परत!"
अर्थात कालच्या अनुभवाने शहाणी झालेली मी त्याच्या भुरळथापांना बळी पडणारी नव्हते.
"काय रे, खूप खपत असेल नै हा माल?" माझा निरागस प्रश्न.
"कसचं काय ताई, तुमच्यासारखी लोकं घेऊन जात्याती ह्ये असलं फळ. बाकी लोक आपला देशी, गावरान मालच पसंत करतात. परवडत न्हाय ना त्यास्नी! "
" आमच्यासारखी??"
"म्हन्जे गाड्यांमधून फिरनारी हो ताई! तेच लोक अशी स्टिकरवाली फळं नेतात. गरीबांना परवडत न्हाय असला माल. त्यांना देशी फळपण बघा, गोड लागतंय!"
"बरं बरं, मला त्या देशी संत्र्यातली अर्धा डझन चांगली संत्री दे निवडून लवकर! बघ, आंबट निघता कामा नयेत," माझी दमदाटी.
एव्हाना फळ विक्रेता माझ्याकडे "ह्या बाईला काय येड बिड लागलंय की काय" अशा मुद्रेने पाहत असलेला. एवढा वेळ त्याने स्टिकरयुक्त फळांची केलेली भलावण फुकट जाताना बघून त्यालाही कष्ट होणारच की हो! पण 'ग्राहक देवो भव' उक्तीला जागून त्याने मुंडी हालवत, फारसे सवाल न करता मी निवडून दिलेली संत्री एका कागदी पिशवीत कोंबली आणि पैसे खिशात घालून तो इतर ग्राहकांकडे लक्ष देऊ लागला.
मीही हातातल्या पिशव्या सांभाळत, समाधानी मनाने घराचा मार्ग धरला.
कधी नव्हे ते मला आपल्या देशी फळाची महती पटली होती. संत्र्याच्या आंबटपणाला नावं ठेवणारी मी आता त्याच आंबटपणावर विलक्षण खूष होते. कारण त्या संत्र्यात कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. होती ती फक्त आपल्या मातीची खुमारी आणि तोच तो, नाकाला मिरमिरणारा, मनाला उल्हसित करणारा चिरपरिचित सुगंध!
--- अरुंधती

Wednesday, March 03, 2010

शिव शिव जय हो!


रात्री आवरासवर करून मीनाताईंना झोपायला थेट साडेअकरा झाले. दमलेला, शिणलेला देह अंथरुणावर लोटून दिला तरी उकाड्याने झोप येत नव्हती. उघड्या खिडक्यांमधून वाऱ्याची झुळूक तर सोडाच, पण रस्त्यावरच्या लोकांचे, वाहनांचे आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होते. हलके हलके झापड येऊन त्यांना डोळा लागणार एवढ्यात कसल्यातरी गलक्याने त्या दचकून उठल्या.
रस्त्यावरून बऱ्याच बाइक्सचे एकसाथ येतानाचे, हलगीचे आणि कसल्या कसल्या घोषणांचे आवाज येत होते. आत्ता? रात्री साडेबारा वाजता? ह्या लोकांना काही काळवेळ आहे की नाही? अस्वस्थ मनाने मीनाताईंनी अंगावरची चादर दूर केली व खिडकीतून बाहेर रस्त्यावर डोकावल्या.
समोरून वीस-पंचवीस बाईकस्वार जोरजोरात घोषणा देत येत होते. दोघा-तिघांच्या मागे हलगी वाजवणारे तरुण उलट्या दिशेने तोंड करून बसलेले दिसत होते. कोणी शिट्ट्या मारत होते, कोणी घसा फोडून ओरडत होते...... "जय भवानी, जय शिवाजी! " "जय शिवाजी, जय भवानी! "
त्यांच्या सगळ्यांच्या त्या एकत्रित गलक्याने आधीच डोके ठणकत असलेल्या मीनाताईंच्या मस्तकात जोरात कळ गेली.
ह्या कार्ट्यांना कोणी कधी वेळेचे भान नाही का शिकवले?
अशी कशी रात्री बेरात्री, मवाल्यांसारखी रस्त्यावरून गोंधळ घालत हिंडत आहेत ही पोरटी?
ह्यांना काही घर-दार नाही का? आणि कसल्या कर्कश्श शिट्ट्या, किती घसा ताणून घोषणा, त्यात त्या हलगीची भर!
फ्लॅटचे दार उघडून मीनाताईंनी शेजारच्या पानसरेंची बेल दाबली. लगेच दार उघडले. दारात पानसरे काकू त्रस्त चेहऱ्याने, कपाळाला आठ्या घालून उभ्या होत्या. मीनाताईंना पाहताच त्यांनी, "ऐकलंत ना कसला धिंगाणा चाललाय बाहेर.... " अशाच शब्दांनी सुरुवात केली.
पानसरे काका शर्ट, लुंगी व सपाता अशा वेषात खाली काय चाललं आहे पाहायला निघाले पण होते!
मीनाताई व पानसरेकाकूंचे "कशी झोप डिस्टर्ब झाली" संभाषण चालू होते तेवढ्यात पलीकडच्या फ्लॅटमधील मारवाडीण दार उघडून, तिचा घुंगट सावरत सावरत प्रश्नार्थक चेहऱ्याने मीनाताई व पानसरेकाकूंकडे पाहत बाहेर आली.
"एटले, काय झाला? ते कसलं आवाज येती? " तिने तिच्या नेहमीच्या तोडक्या-मोडक्या मराठीत सवाल केला.
आता हिला काय आणि कसं समजावायचं ह्याचा दोघी विचार करत असतानाच पानसरे काका जिन्याच्या पायऱ्या चढत वर आले. त्यांच्या मागोमाग मारवाडणीचा शेटही आला. तिच्या "सू थयु? "वर त्याने तिला घरात चलण्याची खूण केली. "चला, आमी आता झोपायला जाते. तुमी बगा तुमाला ते आवाजात येते का झोप ते! आन त्ये लोगांचा काय पन भरोसा नाय हा, काका, तवा तुमी उगाच त्येंना काय सांगाया जाऊ नका. गुडनाईट! "
मारवाड्याच्या बोलण्यासरशी पानसरे काकूंनी काकांना हात धरून दाराच्या आतच ओढून घेतले. "काय म्हणत होता तो शेट? " काकूंचा धास्तावलेला प्रश्न.
"अहो, उद्या, म्हणजे -- आज, शिवजयंती! खाली चाललाय तो सगळा धिंगाणा त्या निमित्तानं बरं! ती खाली नाचताहेत ना, ती जवळपासच्या तरुणमंडळांची पोरं आहेत.... काहींनी तर 'लावली' पण आहे....तर्र झाली आहेत नुसती! आणि मग काय!! आधीच मर्कट.... तशातली गत! म्हणे रात्रभर हिंडणार आहेत आरोळ्या देत! आता ह्यांच्याबरोबर आपलीपण झोपमोड.... ह्यँ... काही खरं नाही! " पानसरे काका तणतणत आतल्या खोलीत निघून गेले.
मीनाताईही आपल्या घराकडे निघाल्या.
"बघा ना! " पानसरे काकू फणकारल्या, "ह्या मेल्यांना काही सोयरसुतक तरी आहे का, म्हणावं, दहावी-बारावीच्या परीक्षा चालू आहेत. घरात लहान बाळं, आजारी, म्हातारी माणसं आहेत. पण हे कसलं ऐकणार म्हणा! त्यांची अस्मिता, बाणा दुखावला जातो, म्हणे! आता शिवाजीमहाराज ह्यांच्या स्वप्नातच आले होते जसे काही सांगायला - माझ्या जयंतीला रात्रभर धुडगूस घाला रे रस्त्यावर, म्हणून! वाटतं, चांगला एक सोटा घ्यावा हातात आणि रपारप रट्टे घालावेत एकेकाच्या पाठीत! " काकूंचा चेहरा संतापाने लाल झाला होता. मीनाताईंनी त्यांना समजावल्यासारखे खांद्यावर थोपटले व आपल्या फ्लॅटमध्ये शिरून दरवाजा लावून घेतला.
खाली गोंधळ तसाच चालू होता. त्यात आता मोबाईलवर ढँ ढँ वाजणाऱ्या एमपी थ्री आयटेम गाण्यांची भर पडली होती.
पोलिसांना फोन लावावा का? मीनाताईंच्या डोक्यात एक विचार अचानक चमकून गेला.
"हॅलो, कंट्रोल रूम? आमच्या इथं काही तरुण मुलं दारू पिऊन गोंधळ घालताहेत. तुम्ही तुमची गस्तीची गाडी पाठवाल का? फार त्रास होतोय हो! डोळ्याला डोळा नाही.... " मीनाताईंनी आपला पत्ता, नाव, फोन नंबर इत्यादी सर्व तपशील दिले आणि पोलिसांची गाडी येण्याची वाट पाहत बसल्या.
जरा वेळानं अचानक बाइकस्वारांची पांगापांग झाली. त्यानंतर दोनच मिनिटांत पोलिसांची गाडी आली. जरा वेळ गाडीचं इंजीन तसंच चालू ठेवून तिथं थांबली, थोडा वेळ तिथे जवळपास घिरट्या घातल्या. तिथे रेंगाळणाऱ्या एक-दोन मुलांना हटकले व पुन्हा निघून गेली. त्यानंतर दहा - पंधरा मिनिटांतच सर्व बाइकजत्रा परत लोटली. पुन्हा एकदा हलगी, शिट्ट्या, घोषणांचा कानात दडे बसवणारा आवाज.... पुन्हा तेच अश्लील हावभाव.... शिवरायांचं नाव घेत ढोसलेली दारू....बेभान, बेधुंद!! हीच का आमची मराठी अस्मिता, मराठी संस्कृती आणि मराठी बाणा?
मीनाताईंनी मोठा निः श्वास सोडत कापसाचे चांगले दोन मोठे बोळे कानांत खुपसले, डोकेदुखीवरची गोळी घेतली आणि कपाळाला बाम चोळून, डोळे घट्ट मिटून रात्र संपायची वाट पाहत राहिल्या.
- अरुंधती